‘टोगो’ ऊर्फ टोगोलीस रिपब्लिक

  •  ‘टोगो’ ऊर्फ टोगोलीस रिपब्लिक

    ‘टोगो’ ऊर्फ टोगोलीस रिपब्लिक

    • 25 Feb 2021
    • Posted By : study circle
    • 102 Views
    • 0 Shares

     ‘टोगो’ ऊर्फ टोगोलीस रिपब्लिक

     
     
             ‘टोगो’ ऊर्फ टोगोलीस रिपब्लिक हा पश्चिम आफ्रिकेतला देश आहे. इतर बहुतांश आफ्रिकी देशांप्रमाणे गरीब व अविकसित असलेला हा देश जगातल्या अत्यंत अरुंद देशांपैकी एक आहे. याची सरासरी रुंदी केवळ 115 कि.मी. आहे.  आफ्रिका खंडात स्थित असलेल्या व संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिलेल्या देशांची एकूण संख्या आहे 55 आणि ती इतर कोणत्याही खंडापेक्षा अधिक आहे. या 55 पैकी साधारणत: 45 देश हे मागच्या शतकात सार्वभौम, स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आले. 

    • 27 एप्रिल 1960 रोजी स्वातंत्र्य मिळवून अस्तित्वात आलेल्या टोगोच्या सीमा पश्चिमेस घाना, पूर्वेस बेनीन, उत्तरेस बुरकिना फासो या देशांच्या सीमांना भिडलेल्या, तर दक्षिणेस गिनीचे आखात आहे. 

    भौगोलिक व आर्थिक माहिती-
    • टोगोची लोकसंख्या 71 लाख असून या देशात आफ्रिकन जमातींचा पारंपरिक धर्म पाळणारे 51 टक्के, ख्रिस्ती 35 टक्के आणि इस्लामधर्मीय 13 टक्के लोक आहेत. 
    • 30 वांशिक जमातींची टोगोमधील मूळची वस्ती असून, टोगोमध्ये सध्या राहणार्‍या परकीय लोकांमध्ये बहुतांश फ्रेंच आहेत. याशिवाय ब्राझिलियन आणि पोर्तुगीजांचीही तुरळक वस्ती आहे. व्यापाराच्या निमित्ताने हे लोक इथे स्थायिक झाले. 
    • टोगोची अर्थव्यवस्था तिथे मुबलक पिकणार्‍या कोको, कॉफी, भुईमूग व कापसाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. टोगोमध्ये कोको आणि कापसाचे पीक भरपूर येते. जर्मनांनी या पिकांवर मोठ्या प्रमाणात कर लादून आपला लाभ करून घेतला.
    • टोगोमध्ये फॉस्फेट्सचे मोठे साठे आहेत. खत-उत्पादनासाठी फॉस्फेट्सला मागणी असल्यामुळे टोगो जगातला सर्वात मोठा फॉस्फेट्स उत्पादक व निर्यातदार आहे. 
    • टोगोमधील सततच्या राजकीय व वांशिक संघर्षांमुळे अनेक नैसर्गिक संसाधने असूनही देशात औद्योगिक व व्यावसायिक विकास झालेला नाही. प्रत्येक निवडणुकीत हिंसाचारात 400-500 लोक बळी जातात, तसेच राष्ट्राध्यक्ष विरोधकांना तुरुंगात टाकतात. त्यामुळे इथली राजकीय परिस्थिती अस्थिर आहे. 
    • टोगोमध्ये अनेक गावांत 17 व्या शतकातल्या किल्ल्यांसारखी, विशिष्ट प्रकारची गोल छपरांची घरे असून ती  युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये ती समाविष्ट आहेत.

      इतिहास व राजनैतिक वाटचाल -
    • 11 व्या ते 16 व्या शतकादरम्यान या प्रदेशात, इतर आफ्रिकी देशांप्रमाणे अनेक वांशिक जमातींच्या टोळ्या वसल्या. टोगोमध्ये अशा 30 वांशिक समूहांची वस्ती आहे. त्यांपैकी एव आणि मिना या टोळ्या प्रबळ होत. इ.स.1490 मध्ये पोर्तुगीज इथे आले. 
    • 16 व्या शतकात इथे गुलामांचा व्यापार सुरू झाला आणि पुढची 200 वर्षे टोगोच्या किनारपट्टीवरचा गुलामांचा व्यापार हा तेजीचा व्यवसाय बनला. युरोपीय व्यापारी मोठ्या प्रमाणात गुलामांच्या शोधात टोगोच्या किनारी प्रदेशात आणि अंतर्गत भागात येऊ लागले. टोगोचे नावच झाले- ‘स्लेव्ह कोस्ट’.
    • 19 व्या शतकापर्यंत टोगोमध्ये अरब व युरोपियन लोकांना मुख्य आकर्षण होते ते गुलामांच्या व्यापाराचे आणि हत्ती व गेंड़याची शिकार करून हस्तिदंत आणि गेंड़याच्या शिंगांची चोरटी निर्यात करण्याचे. हे दोन्ही व्यापार पुढे कायद्याने बंद करण्यात आले. हस्तिदंत आणि गेंड़याची शिंगे यांची चोरटी निर्यात ही सर्व आशियाई देशांमध्ये दागिने आणि औषधांमध्ये वापरण्यासाठी होत असे.
    • 1884 साली जर्मन इथे आले. त्यांनी टोगोच्या किनारपट्टीवरच्या राजाबरोबर त्यांच्या प्रदेशाचे संरक्षक म्हणून करार केला. संरक्षणाच्या नावाखाली जर्मनांनी टप्प्याटप्प्याने टोगोच्या बर्‍याच मोठ्या प्रदेशावर कब्जा करून तिथे जर्मन वसाहत उभी केली.
    • 1905 साली या प्रदेशाचे नाव ‘जर्मन टोगोलॅण्ड’ झाले. जर्मनांनी या टोगोलॅण्डच्या विकासाला चांगली चालना दिली. आधुनिक तंत्रज्ञान वापरून कोको, कॉफी आणि कापसाची लागवड कशी करायची हे मागासलेल्या शेतकर्‍यांना दाखवून शेतमालाच्या निर्यातीसाठी त्यांनी रेल्वेसेवा सुरू केली आणि लोम या ठिकाणी बंदरही उभारले. पुढे लोम शहराचा विस्तार होऊन ते आधुनिक टोगोचे राजधानीचे शहर झाले. 
    • 1918 साली  पहिल्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी जर्मनीच्या अ‍ॅक्सिस आघाडीचा पराभव करून जर्मनीव्याप्त टोगोलँडवर ताबा मिळवला आणि टोगोवरील जर्मनीचा अंमल संपला. टोगोचा ताबा  युद्धातले जेते ब्रिटन आणि फ्रान्स यांच्याकडे संयुक्तपणे आला. ब्रिटन आणि फ्रान्सचा टोगोवरचा संयुक्त अंमल फार काळ टिकला नाही. 
    • 20 जुलै 1922 रोजी ब्रिटन आणि फ्रान्स या दोन्ही राष्ट्रांनी ‘लीग ऑफ नेशन्स’मार्फत टोगोच्या प्रदेशाची फाळणी केली. पश्चिमेकडील अर्धा प्रदेश ब्रिटनच्या मालकीचा झाला तर पूर्वेकडचा अर्धा भाग फ्रान्सच्या ताब्यात आला. 
    • जर्मन टोगोलँडचे ब्रिटिश टोगोलँड आणि फ्रेंच टोगोलँड हे दोन तुकडे झाले. 
    • दुसर्‍या  महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने सार्वमत घेतले. ब्रिटिश टोगोलँडच्या जनतेने आपला प्रदेश पश्रि्चम आफ्रिकेतील ‘गोल्ड कोस्ट’ या ब्रिटिश साम्राज्याच्या वसाहतीमध्ये समाविष्ट होण्यासाठी कौल दिला. 
    • 1957 साली गोल्ड कोस्ट आणि इतर काही प्रदेश मिळून घाना हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले. 
    • 1959 साली फ्रेंच टोगोलँडच्या जनतेने फ्रेंच टोगोलँड हा प्रजासत्ताक देश स्थापन केला. फ्रेंच टोगोलँड हा फ्रेंच युनियनचा सदस्य बनला. या देशाचे संरक्षण, परदेश संबंध आणि अर्थव्यवस्था यांची खाती फ्रेंच सरकारने स्वत:कडे ठेवली.
    • 27 एप्रिल 1960 रोजी फ्रेंच सरकारने फ्रेंच टोगोलँडच्या जनतेला स्वातंत्र्य प्रदान केले. फ्रेंच टोगोलँड हा  ‘टोगोलीस रिपब्लिक’ बनून एक स्वतंत्र नवदेश अस्तित्वात आला. 
    • 1963 साली, आफ्रिकन देशांना सततची यादवी, रक्तरंजित उठाव यांचा बहुधा शाप असल्याने स्वातंत्र्यानंतरचे पहिले राष्ट्राध्यक्ष ऑलिंपियस यांची  गोळी घालून हत्या झाली. 
    • 1967 साली लष्कराचे जनरल ग्नासिंग्बे याडेमा यांनी तत्पूर्वीचे सरकार उलथवून देशाची राज्यघटना, सर्व राजकीय पक्ष बरखास्त करून स्वत:ला टोगोचा राष्ट्राध्यक्ष घोषित केले. 

    ठळक नोंदी-
    • 1967 ते त्यांचा 2005 साली मृत्यू होईपर्यंत ग्नासिंग्बे याडेमा हेच 38 वर्षे टोगोचे राष्ट्राध्यक्ष बनून राहिले.
    • 2005 साली लष्कराने सत्ता हातात घेऊन ग्नासिंग्बे याडेमांचा मुलगा फाऊर ग्नासिंग्बे याला राष्ट्राध्यक्षाच्या गादीवर बसवले. पण यामुळे आंतरराष्ट्रीय दबाव येऊन फाऊरला सार्वत्रिक निवडणुकांचे नाटक करावे लागले. या निवडणुकीत शेकडो बळी गेले. 
    • 2010, 2015 व 2020 या वर्षांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्येही फाऊर याला बहुमत मिळून सध्या फाऊर यांच्या कडेच टोगोचे राष्ट्राध्यक्षपद आहे.
    • 2019 साली फाऊरने देशाच्या राज्यघटनेतच हवा तसा बदल करून घेऊन स्वत:ची 2030 पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी राहण्याची व्यवस्था केली. यावरून बरेच वादंग माजले, आंदोलने झाली. फाऊरने ती सर्व दडपून टाकली.
     

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 102