-
वेळासचा कासव महोत्सव
- 15 Jan 2021
- Posted By : vaishali
- 182 Views
- 0 Shares
वेळासचा कासव महोत्सव
वेळास हे गांव कासव संवर्धन प्रकल्पामुळे ते जगाच्या नकाशावर आले. येथे पर्यटक कासवांच्या समुद्रप्रवासाचा प्रारंभ अनुभवतात. समुद्र किनार्यावर सागरी कासवे रात्रीच्यावेळी खड्डा तयार करतात. त्यामध्ये 100 ते 150 अंडी घालून खड्डा बुजवतात. ही अंडी नैसर्गिरित्या उबून 45 ते 55 दिवसानंतर पिल्ले बाहेर पडतात. अंड्यातून बाहेर पडल्यानंतर 4-5 दिवसांनी ती वाळूतून बाहेर पडून समुद्राच्या प्रवासाला निघतात. अंडी घातल्यानंतर कासव कधीही घरट्याकडे परत येत नाही.
• कासव महोत्सव -
1) गावात दरवर्षी मार्च ते एप्रिल दरम्यान कासव महोत्सव होतो. वाळूवरील कासवांच्या पावलांच्या ठशांचा माग काढून काही लोक अंडी काढून त्यांची चोरी करत. स्थानिक ग्रामस्थ, वन विभाग तसेच सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या जनजागृतीने त्याला आळा बसला. त्यासाठी कासव महोत्सव सुरू केला. गावातील महिला बचत गटाच्या सदस्यांनाही कासव संवर्धन प्रकल्पातून चांगला रोजगार मिळतो.
2) 2006 सालापासून सागरी कासव संवर्धनाचे काम 14 वर्षे सातत्याने सुरू आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर या कामातून हजारहून अधिक घरटी संरक्षित केली असून, 50 हजारांपेक्षा अधिक पिल्ले समुद्रात सोडण्यात आली आहेत.
• ठळक नोंदी -
1) वेळास हे रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेकडील मंडणगड तालुक्यातील गाव, सावित्री नदीच्या मुखाशी व बाणकोट किल्ल्याला लागून आहे.
2) वेळासला समुद्रकिनारा असून जवळच बाणकोटची खाडीही असल्यामुळे पर्यटकांची चांगली वर्दळ असते.
3) नाना फडणवीसांचे मूळ घर आणि लक्ष्मी मंदिर येथे आहे.
4) वेळासपासून जवळच बाणकोट गाव आहे. गावाजवळून वाहणारी सावित्री नदी अरबी समुद्राला मिळते. येथे नदीचे खाडीत रूपांतर झाले आहे.
5) वेळासचा सागर किनारा, माड, काजू आणि पोफळीच्या बागा, आमराया, फणस, रातांबे, विहिरी व पारंपरिक शेती इथे येणार्या परदेशी आणि देशी पाहुण्यांना आकर्षित करते. कोकणी पदार्थ आणि वस्तू तसेच कासव स्मृतिचिन्हांच्या विक्रीतून तरूणांनाही उत्पन्न मिळते.