स्मार्ट फोनचा अतिवापर आणि धोका

  •  स्मार्ट फोनचा अतिवापर आणि धोका

    स्मार्ट फोनचा अतिवापर आणि धोका

    • 26 Jul 2021
    • Posted By : Study Circle
    • 56 Views
    • 0 Shares
     स्मार्ट फोनचा अतिवापर आणि धोका
     
    *   सध्याच्या काळात अनेक जण स्मार्टफोन आणि सोशल मीडियाला चिटकूनच असतात. किम कर्दाशिया, अ‍ॅना विंटूर, डॅनियल डे लेविस, वॉरेन बफेट यांच्यासारख्या पाश्र्चात्त्य सेलिब्रिटींनी स्मार्टफोनचा वापर सोडून बेसिक फोनचा वापर सुरू केला आहे. या पार्श्र्वभूमीवर आपण काय करायचे? कोणत्या दिशेला जायचे? याचा निर्णय अखेर आपल्यालाच करायचा आहे.
     
    1)  अति बोलणे चांगले नाही आणि अति मौन धरणेही चांगले नाही. ‘अति सर्वत्र वर्ज्यते’ असेही आपल्याकडे म्हटले गेले आहे; परंतु चांगले सल्ले न पाळणे हीच जणू आपली सवय होऊन बसली आहे. सध्याच्या काळात आपण मोबाईल फोनसंदर्भात विचार केला तर या म्हणीचा अर्थ आपल्याला उलगडू शकतो. कारण, आपल्या देशात सुमारे 120 कोटी मोबाईल फोनधारक आहेत. यातील 76 कोटी लोक स्मार्टफोनधारक आहेत. ज्या देशातील कोणत्याही शहरात लोकांना मुबलक वीज, रस्ते आणि पाण्याची सुविधा मिळत नाही, जिथे रोज 19 कोटी लोक उपाशीपोटी झोपण्याचा शाप भोगत आहेत. ‘प्रत्येक हाताला रोजगार, प्रत्येक शेतात पाणी’ अशा घोषणा केवळ जुमले म्हणूनच अस्तित्वात राहिल्या आहेत, अशा देशात मोबाईल फोन हे ‘अति’चे अचूक उदाहरण ठरते. विशेष म्हणजे, भारतीयांना मोबाईलच्या सर्व फीचर्सचा सरासरी केवळ 10 टक्केच वापर करणे जमते, अशा पार्श्र्वभूमीवर आपण दररोज पाच तास मोबाईलसोबत घालवतो. 2019 मध्ये हा आकडा सरासरी 3.30 तास एवढा होता.
     
    2)  लॅरी रोंजन यांनी 200 विद्यार्थ्यांवर एक प्रयोग केला. या प्रयोगाचे निष्कर्ष असे सांगतात की, तरुण सरासरी 60 वेळा आपला फोन अनलॉक करतात. अनेक तरुणांनी तर 80, 90, 100 वेळाही फोन अनलॉक केल्याचे लॅरी रोंजन यांना दिसून आले. मोबाईलविषयीची आसक्ती वाढत चालल्याचे हे द्योतक आहे. जेव्हा तरुणांना मोबाईलपासून वेगळे केले जाते, तेव्हा ते बेचैन होतात. मोबाईलचा अतिरेक वाढण्यापूर्वी सेक्स, आपल्या आवडती व्यक्ती किंवा आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ तरुणांना सर्वाधिक आकर्षित करीत असत. आता तंत्रज्ञान त्यांना सर्वाधिक आकर्षित करते. फोनला चिकटून राहण्याचे व्यसन नात्यांवरही दुष्परिणाम करीत आहे. फोन अंथरुणात ठेवून झोपण्याच्या सवयीमुळे झोप कमी झाली आहे.
     
    3)  ‘अ‍ॅडिक्शन बाय डिझाईन’ नावाचे पुस्तक नताशा नावाच्या लेखिकेने लिहिले आहे. सवयीचा भाग बनून जाणार्या तंत्रज्ञानामध्ये ई-मेलचाही समावेश केला जाऊ शकतो. फोनवर येणारी नोटिफिकेशनही आपल्याला उद्युक्त करीत राहतात. फेसबुक, ट्विटर आणि स्नॅपचॅट आपण उत्सुकतेने उघडतो. कारण, आपल्याला काय रिवॉर्ड मिळणार आहे, हे आपल्याला ठाऊक नसते. आपल्याला सवय लागावी, असे प्रत्येक कंपनीला वाटत असते. त्यामुळे फीचर्स आणि रिवॉर्डस् याबाबत कंपन्या नेहमी वेगवेगळे प्रयोग करीत असतात.
     
    4)  सुरुवातीला आपण कंटाळा घालविण्यासाठी त्यांचा वापर करतो. ऑनलाईन क्लासेस आणि व्यवसाय यामुळे मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर वाढला आहे. यामुळे डोकेदुखी, डोळे लाल होणे, डोळे सुजणे, नजर कमकुवत होणे, डोळे जळजळणे आदी समस्या वाढल्या आहेत. स्क्रीनटाईम वाढल्यामुळे आत्मसंयम आणि जिज्ञासा कमी होणे, भावनात्मक स्थिरता नसणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचणी, मित्र जोडणे सहज शक्य न होणे अशा समस्या उद्भवतात. मोठ्याने बोलण्याची आणि ऐकण्याची सवयही वाढते. जेव्हा कोरोनाकाळानंतर पुन्हा शाळा सुरू होतील तेव्हा मुलांच्या सवयी बदलण्यात पालकांना खूपच अडचणी येणार आहेत.
     
    5)  स्क्रीनविषयी वाटत आणि वाढत असलेले आकर्षण मुलांमध्ये नैराशय, सोशल एन्जायटी अशा आजारांना जन्म देत आहे. ‘हायपर अ‍ॅक्टिव्ह डिसऑर्डर’सारखे आजारही मुलांना जडत आहेत. अशा मुलांना सोशल मीडियावर लोकांना भेटणे आवडू लागते. कारण, तिथे लोक प्रत्यक्षात समोर दिसत नाहीत. अशी मुले घरात मिळून-मिसळून राहत नाहीत. मशिन लर्निंग अल्गोरिदम इतका सक्षम असतो की, आपल्याला कोणत्या उत्पादनांमध्ये रस आहे हे संबंधित कंपन्यांना समजते. हेच डिजिटल आयुष्य होय. डाटा हा इंधनासारखा असतो. जाहिरातदारांना तो एक व्यासपीठ मिळवून देतो. त्या मोबदल्यात कंपन्या पैसा कमावतात. आपल्या अ‍ॅपच्या वापरकर्त्या लोकांच्या आवडी-निवडी, जीवनशैली आणि राजकीय कल याविषयीची आकडेवारी जमा केली जाते. 2016 मध्ये अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी केंब्रिज अ‍ॅनालिटिका नावाच्या कंपनीने फेसबुककडून पाच कोटींपेक्षा अधिक वापरकर्त्यांची माहिती मिळविली होती. या माहितीचा उपयोग डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी करण्यात आला. भारतात फेसबुकचे 29 कोटी वापरकर्ते आहेत. ट्विटरचे 1.75 कोटी, इन्स्टाग्रामचे 12 कोटी, स्नॅपचॅटचे 7.43 कोटी आणि यू-ट्यूबचे 26.5 कोटी वापरकर्ते भारतात आहेत. सरासरी भारतीय माणूस दररोज 99 मिनिटे सोशल मीडियावर व्यतीत करतो.
     
    6)  ‘फादर ऑफ बिहेविअरिजम’ मानले जाणारे अमेरिकी मानसतज्ज्ञ व्ही. एफ. स्कीनर यांच्या म्हणण्यानुसार, बक्षीस किती मिळेल आणि कधी मिळेल हे माहीत नसेल तेव्हा बक्षीस मिळविण्याचे व्यसन जडते. एखादे बटण दाबल्यानंतर आपल्याला खायला मिळते, असे जर कबुतरांना समजले तर त्यांना जेव्हा भूक लागेल तेव्हाच ती कबुतरे ते बटण दाबतील; परंतु बटण दाबल्यावर एखाद्या वेळी खायला मिळते आणि एखाद्या वेळेला मिळत नाही, असे त्यांना समजले तर ते त्या बटणाला सतत चिकटूनच राहतील. स्मार्टफोन आणि सोशल मीडियाबाबत आपली स्थिती काहीशी अशीच झाली आहे.
     
    7)  मोबाईल आणि सोशल मीडियामुळे सध्या जडत असलेल्या आजारांपासून संबंधितांची मुक्तता करण्यासाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र विभाग उघडले जात आहेत. लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमध्ये असा विभाग सुरू केला आहे; परंतु अशा आजारांपासून मुक्तता मिळविण्यासाठी आपल्याला आपल्या स्तरावरही काही प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी फोनचे नोटिफिकेशन सेटिंग बदलू शकतो. ‘टाईम स्पेंट’चे रूपांतर ‘टाईम बेस्ट स्पेंट’मध्ये करण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. जगातील काही कंपन्या तंत्रज्ञानात छोटे-छोटे बदल करून आपली चिंता आणि स्क्रीनचे व्यसन दूर करण्यास मदत करीत आहेत. काहीजण स्मार्टफोन सोडून बेसिक फोनचा वापर सुरू करण्याचाही सल्ला देतात. किम कर्दाशिया, अ‍ॅना विंटूर, डॅनियल डे लेविस वॉरेन बफेट यांच्यासारख्या पाश्र्चात्त्य सेलिब्रिटींनी स्मार्टफोनचा वापर सोडून बेसिक फोनचा वापर सुरू केला आहे. या पार्श्र्वभूमीवर आपण काय करायचे? कोणत्या दिशेला जायचे? याचा निर्णय अखेर आपल्यालाच करायचा आहे..
     
    सौजन्य व आभार : दैनिक पुढारी
    15  जुलै 2021 / योगेश मिश्र, ज्येष्ठ पत्रकार-विश्र्लेषक

Share this story

Total Shares : 0 Total Views : 56