आंतरराष्ट्रीय सहकार दिन व रॉबर्ट ओएन

  • आंतरराष्ट्रीय सहकार दिन व रॉबर्ट ओएन

    आंतरराष्ट्रीय सहकार दिन व रॉबर्ट ओएन

    • 17 Jul 2021
    • Posted By : study circle
    • 292 Views
    • 1 Shares
     आंतरराष्ट्रीय सहकार दिन व रॉबर्ट ओएन
     
    *   दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी आंतरराष्ट्रीय सहकार दिन साजरा केला जातो. जगातील महत्वाच्या प्रश्‍न आणि मुद्यांवर सहकार्य करणे हा या दिनाचा उद्देश हा आहे. ३ जुलै २०२१ रोजी सदर दिन साजरा झाला.
     
    *   आपल्याकडे सहकार हा विचार येण्यापूर्वी  दोनशे वर्ष आधी ब्रिटनमध्ये सहकारातून विकास ही संकल्पना मांडण्यात आली. विशेष म्हणजे ही कल्पना मांडणारी व्यक्ती एक कारखानदार होती.  रॉबर्ट ओएन असे त्यांचे नाव. ’औद्योगिक स्पर्धेपेक्षा सहकार्यावर आधारित समाजरचना वास्तवात आली तरच समाजाचा सर्वांगीण विकास घडेल. कोणत्याही उद्योगात तुम्हाला नफा मिळवायचा असेल तर भांडवलाबरोबरच कामगार हाही अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या विकासातूनच निरोगी समाज घडेल’, असा विचार ओएन यांनी ब्रिटनसह युरोपला दिला. १८२५मध्ये त्यांनी अमेरिकेतील इंडियानामध्ये ३० हजार एकर जमिनीवर .‘न्यू हार्मनी’ नावाची जगातील पहिली ’सहकार’ वसाहत उभारली.  ब्रिटनमधील समाजवादाचे जनक अशीही त्यांची ओळख आहे.
     
        कामगार ते कारखानदार -
     
    *   रॉबर्ट ओएन यांचा जन्म १४ मे १७७१ मध्ये वेल्समधील माँगमरीशर प्रांतातील न्यू टाउन येथे झाला. त्यांचे पिता रॉबर्ट ओएन (सिनिअर) यांना एकुण सात अपत्य त्यातील रॉबर्ट हे सहावे. सिनिअर रॉबर्ट हे हार्डवेअर वस्तु विक्रीचा व्यवसाय करायचे. अवघ्या दहाव्या वर्षी रॉबर्ट हा स्टॅम्फर्ड गावातील एका कापड कारखान्यात कामगार  म्हणून रुजू झाला. मॅचेस्टर येथील कारखान्यातही त्याने काम केले. वयाच्या १९व्या वर्षी ओएन हे कापड कारखान्यात व्यवस्थापक झाले. यानंतर १०० पौंडचे कर्ज घेवून त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु केला. १७९३ मध्ये ओएन हे मॅन्चेस्टर लायब्ररी आणि  फिलॉसॉफी सोसायटीचे सदस्य झाले. नैतिकता आणि चांगुलपणा या गुणांवर विश्‍वास असणार्या रॉबर्ट यांची येथे खर्या अर्थाने विचारसरणी घडली. १७९४मध्ये त्यांनी मँचेस्टरमधील शॉर्लटन ट्विस्ट कंपनी भागीदारी घेतली. १७९९ मध्ये त्यांचा विवाह कारखानदार आणि उद्योगपती डेव्हिड डॉल यांची कन्या कॅरोलिन हिच्याशी झाला. 
     
    *   ओएन यांनी डेव्हिड डेल यांच्याकडून ग्लासगो शहरानजीक असणार्या ’न्यू लानार्क मिल्स’ हा कापड कारखाना विकत घेतला. या कारखान्यात दोन ते अडीच हजार कामगार होते. धक्कादायक बाब म्हणजे, यामध्ये कामगार म्हणून पाच वर्षांच्या मुलांचाही समावेश होता. या बालकामगारांकडून १३ तासांपेक्षा अधिक वेळ काम करुन घेतले जात असे. कापड कारखान्याचे मालक झाल्यानंतर ओएन यांनी सर्वप्रथम अनेक नियमांमध्ये  बदल केला.
     
        कामगार सहकार्यातून कारखानदारांचा विकास -
     
    *   मालक आणि कामगार यांच्या परस्पर सहकार्यातूनच कोणत्याही उद्योगाचा विकास होतो,असा विचार ओएन यांनी मांडला. त्याचबरोबर याची अंमलबजावणी आपल्या कारखान्यात केली. त्यांनी न्यू लानार्क येथे कामगारांच्या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी अनेक योजना राबविल्या. कामगारांच्या मुलांसाठी शाळा सुरु केल्या. दहा वर्षांच्या आतील मुलांना कारखान्यात काम करण्यास बंदी घातली. मात्र त्यांचे वेतन सुरुच ठेवले. त्यामुळे पालकांनी मुलांच्या शिक्षणाला विरोध केला नाही. कामगारांना नियमभंगासाठी देण्यात येणारी शिक्षाही त्यांनी रद्द केली. 
     
        आठ तास काम, आठ तास आराम आणि आठ तास मनोरंजन..
     
    *   ओएन यांनी कामगारांसाठी दर्जेदार वस्तु मिळाव्यात म्हणून दुकाने सुरु केली. हा जगातील पहिलाच प्रयोग होता. कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठीही आरोग्य योजना राबविली. १८१० मध्ये आपल्या कारखान्यातील कामगारांचे कामाचे तास १७ वरुन १०पर्यंत केले. यानंतर १८१७मध्ये त्यांनी कामगारांच्या कामाचे तास आठ केले. त्याचबरोबर एक घोषणाही केली ’आठ तास काम, आठ तास आराम आणि आठ तास मनोरंजन’. ओएन यांच्या कारखान्यात काम करणार्यांना कामगारांना याचा लाभ मिळाला. मात्र जगभरातील कामगारांसाठी हा नियम लागू होण्यास २०व्या शतकाची वाट पाहावी लागली. कामगारासाठी वेतन हा शब्दप्रयोग त्यांनी कधीच केला नाही. सर्वांसाठी जगण्याचा समान स्तर असावा, अशी त्यांची धारणा होती.
     
        भांडवलाबरोबरच कामगारही महत्त्वाचा घटक -
     
    *   १ जानेवारी १८१६ रोजी ओएन यांनी दिलेले हे भाषण ऐतिहासिक ठरले. ’लक्षाधीश  होण्यासाठी कोणत्या कल्पना लढवाव्या लागतात याची मला माहिती नाही; पण गुन्हेगारी, गरीबीमुक्त आरोग्यसंपन्न समाज कसा निर्माण होईल’, याची मला माहिती आहे, असे त्यांनी सांगितले. कोणत्याही उद्योगात भांडवलाबरोबरच कामगार हाही अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्या विकासातूनच निरोगी समाज घडेल. कामगारांना एक सक्षम नागरिक म्हणून जगता यावे, यासाठी त्यांचा आरोग्यासह शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकास होण्याची गरज आहे, हा विचार त्यांनी मांडला.
     
        विश्‍वकल्याणासाठी सहकार हाच मार्ग -
     
    *   विश्‍व कल्याणासाठी परस्पर सहकार हाच एकमेव मार्ग आहे, अशी त्यांची धारणा होती. त्यावेळी यावर प्रचंड टीकाही झाली. मात्र त्यांचा विचाराचा प्रसार केवळ ब्रिटनमध्येच नव्हे तर संपूर्ण युरोपमध्ये झाला. त्यांनी ’न्यू लानार्क मिल्स’ येथे सुरु केलेल्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना लक्षणीय यश लाभले. कारखान्याला मिळालेला नफा लक्षणीय ठरला. यामुळे ओएन यांची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी  अनेक उद्योगपती त्यांच्या कारखान्याला भेट देण्यासाठी येत. संसदेच्या निवड समितीसमोर भाषण करण्यासाठी त्यांना  निमंत्रण देण्यात आले होते.
     
        सहकार्यावर आधारित समाजरचना हवी -
     
    *   १८१३ मध्ये रॉबर्ट ओएन यांनी  ए न्यू व्ह्यू ऑफ सोसायटी अँड अदर राइटिंग्स हे पुस्तक लिहिले. १८२१मध्ये त्यांनी टु द काउंटी ऑल लानार्क या पुस्तकातून समाजवादी विचार त्यांनी मांडले. औद्योगिक स्पर्धपेक्षा सहकार्यावर आधारित समाजरचना वास्तवात आणण्याचे त्यांचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी सहकारी तत्वावर शेती आणि उद्योग अशी संयुक्त रचना असणारी गाव वसवली. या उपक्रमांमुळे अनेकांना रोजगार मिळाला.
     
        ३० हजार एकरवर उभारली ‘न्यू हार्मनी’ वसाहत -
     
    *   ओएन यांनी १८२५मध्ये त्यांनी सहकार तत्वातून अमेरिकेतील इंडियानामध्ये ३० हजार एकर जमीनीवर .‘न्यू हार्मनी’ नावाची वसाहत उभारली. मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्याकाळात हा महत्वाकांक्षी प्रकल्प होता. यासाठी ओएन यांनी दोन लाख डॉलर खर्च केले. या वसाहतीमध्ये १८० इमारती उभारल्या. सहकार तत्वातून उभारलेली ही पहिलीच वसाहत ठरली. ओएन यांनी समाजवादी विचारातून उभारलेल्या वसाहतीला अमेरिकेतील विचारवंतांसह काही संसद सद्स्यांनीही पाठिंबा दिला. विल्यम मॅक्युलर यांनाही ही वसाहत उभारणीसाठी अर्थसहाय केले. त्यांनी या वसाहतीमध्ये शास्त्रज्ञ शिक्षण प्रसारक आणि कलाकारांना निमंत्रण दिले.
     
    *   ऐक्य आणि परस्पर सहकार्यातून उभारलेले ही वसाहत होती. सहकाराच्या माध्यमातून सर्वांना समान न्याय देण्याचा हा एक प्रयत्न होता. या गावांमध्ये सहकारी तत्वावरच शेती आणि उद्योग करावेत. सर्व कुटुंबांकडे स्वत:च्या मालकीचे घर असेल पण अन्य गरजा या सहकारी तत्वाच्या माध्यातून पूर्ण करण्याचा प्रयत्न होता. शैक्षणिक सुधारणा, विविध शाखेतील संशोधन आणि कलाकारांना अभिव्यक्त होण्याचे व्यासपीठ अशीही .‘न्यू हार्मनी’ ओळख झाली. कालांतराने ओएन यांनी या वसाहतीची सर्व जबाबदारी आपला मुलांसह व्यावसायिक भागीदाराकडे सोपवली. आदर्श समाजरचेनची कल्पना मांडणारी ही वसाहत आर्थिक पातळीवर अपयशी ठरली. त्यामुळे ही वसाहत १८२८ मध्ये बंद झाली. सहकारी तत्वावरील एक आत्मनिर्भर गाव वसविण्याचा हा प्रयत्न काही वर्षात अपयशी ठरला असला तरी सहकारी तत्त्व जगासमोर मांडण्यास ओएन यांची कामगिरी ऐतिहासिक ठरली. इंडियानामधील वसाहत स्थापन करुन ओएन पुन्हा इंग्लंडमध्ये आले. यानंतर त्यांनी सहकारी  तत्वाच्या प्रसाराला वाहून घेतले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे इंग्लंडमध्ये सहकारी तत्वाचा प्रसार झाला. त्यांना  इंग्लंडमधील समाजावदाचे जनक म्हणूनही ओळखले जाते.
     
    *   १७ नोव्हेंबर १८५८मध्ये वयाच्या ८७ वर्षी आपले मूळ गाव वेल्स येथे रॉबर्ट ओएन अखेरचा श्‍वास घेतला. त्यांनी आपल्या विचार आणि कृतीतून ब्रिटनसह युरोपमध्ये सहकाराचा प्रसार केला. त्यांनी स्कॉटलंडमध्ये सहकार तत्वातून उभारलेले गाव आज जागतिक वासर स्थळ म्हणून जतन केले आहे. त्याचबरोबर त्यांनी मांडलेला ’सहकार’चा विचार आज जगभरातील अनेक देशांमध्ये रुजला आहे.
     
    सौजन्य व आभार : दैनिक पुढारी
    ३ जुलै २०२१

Share this story

Total Shares : 1 Total Views : 292