जैव वीज निर्मिती शेतीस मारक !

  •  जैव वीज निर्मिती शेतीस मारक !

    जैव वीज निर्मिती शेतीस मारक !

    • 15 Jul 2021
    • Posted By : study circle
    • 102 Views
    • 0 Shares
     जैव वीज निर्मिती शेतीस मारक !

         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ऊर्जा विज्ञान’ या घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात जैव वीज निर्मिती शेतीस मारक !व त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.


    सामान्य अध्ययन पेपर (४) : अर्थव्यवस्था, कृषि, विज्ञान व तंत्रज्ञान विकास

        राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक -
    ३.१   ऊर्जा विज्ञान :
        पारंपारिक ऊर्जा स्रोत - जिवाश्म इंधन आणि ज्वलन, औष्णिक, जलविद्युत शक्ती (भरती व लहरी शक्ती), आवश्यक द्रव गतीशास्त्र ऊर्जा रूपांतरण
        अपारंपारिक ऊर्जा स्रोत - परिचय, तत्त्व आणि प्रक्रिया - सौर, पवन, समुद्रलाटा, भूऔष्णिक, जैववस्तुमान, कचरा, जैववायू, पेट्रोप्लांट आणि इतर अपारंपारिक ऊर्जा स्रोत, उदा. ऊस पिक इत्यादिंचे उपउत्पादने, सौर साधने, सौर कुकर, पाणीतापक, सौरशुष्कयंत्र इत्यादी.
        भारतातील ऊर्जा संकट ः शासन धोरणे व ऊर्जा निर्मिती कार्यक्रम .....
        औष्णिक व जलविद्युत निर्मिती कार्यक्रम, वीज वितरण व विद्युत पुरवठा यंत्रणा - ऑफ ग्रीड आणि ऑन ग्रीड, सौर विद्युत घटप्रणाली, ऊर्जा सुरक्षा, संशोधन व विकास यामधील कार्यरत संस्था.
    ३.४.२  शेतीमध्ये (कृषी) जैवतंत्रज्ञान - प्रस्तावनाइतिहास, जैविक कीटकनाशक, जैविक खतेजैव इंधन, पर्यावरण विषयक स्वच्छता, जैविक उपचार, जैवविविधतेचे संवर्धन.

    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    जैव वीज निर्मिती शेतीस मारक !
     
    *   केंद्र सरकारने सेंद्रिय पदार्थ विकत घेऊन त्यापासून ऊर्जा निर्मिती करण्याचे नुकतेच संकेत दिले आहेत. या योजनेतून आपल्याला जरी वीज मिळाली तरी या सेंद्रिय पदार्थापासून आपल्या जमिनीची सुपीकता जी वाढते त्याच्यापुढे मोठे प्रश्नचिन्ह तयार होणार आहे.
     
    *   कोळसा आणि जलविद्युत निर्मितीसाठी मर्यादा असल्यामुळे अपारंपरिक ऊर्जा स्रोताचे बळकटीकरण करून विद्युत निर्मितीसाठी त्याचा उपयोग करण्यात येत असून त्याचाच एक घटक म्हणून पवन व सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प देशात राबविण्यात येत आहेत. आता यामध्ये सेंद्रिय पदार्थापासून ऊर्जा निर्मिती करण्याची सरकारची योजना आहे.
     
    *   देशात आजही ५५ टक्के पेक्षा अधिक लोक शेती व्यवसायावर अवलंबून असून बदलत्या हवामानामुळे कोरडवाहू शेती सात वर्षांपैकी पाच वर्ष तोटयात चाललेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने उत्पादन खर्चावर आधारित भाव देण्याचे मान्य केलेले आहे. या अनुषंगाने शेती मालास भाव देऊन १०० टक्के उत्पादित माल खरेदी करणे साठवणूक क्षमतेअभावी आणि मुक्त अर्थव्यवस्थेमुळे आजमितीस शक्य नाही. यातून मार्ग काढून बदलत्या हवामानात कोरडवाहू शेती अधिक किफायतशीर होण्यासाठी शेती पिकांचे अवशेष म्हणजे सेंद्रिय पदार्थ विकत घेऊन त्यापासून ऊर्जा निर्मिती करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिलेले आहेत.
     
    *   जैवविद्युत निर्मितीसाठी जे अवशेष वापरले जाणार आहेत ते सर्व सेंद्रिय पदार्थ असून जमीन सुपीकतेच्या दृष्टिकोनातून त्यास अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. ज्या जमिनीत २५ टक्के हवा, २५ टक्के ओलावा, ५ टक्के सेंद्रिय पदार्थ व ४५ टक्के मूलद्रव्ययुक्त माती असते तीच जमीन सर्वोउत्कृष्ट मानली जाते. या सर्व पाच घटकांचे नाते शेतजमिनीच्या सुपीकतेशी आहे. आणि त्यात सेंद्रिय पदार्थाची भूमिका महत्त्वाची आहे. या पदार्थामुळेच जमिनीत २५ टक्के हवा, २५ टक्के ओलावा स्थिर ठेवण्यास मदत होते. तसेच त्यात असलेली ऊर्जा ही सूक्ष्म जीवाणूचे ऊर्जा स्त्रोत असून यामुळेच त्यांची संख्या वाढून अन्नद्रव्य उपलब्धतेचे कार्य वेगाने चालते. म्हणजे हेच सूक्ष्म जीवाणू पीक पोषणाचे काम करत असतात. या सेंद्रिय पदार्थापासून जमिनीत सेंद्रिय कर्ब तयार केला जातो. उत्तम शेत जमिनीसाठी हे प्रमाण कमीत कमी ०.८ ते १.०० टक्के असावे लागते, असे भूसूक्ष्मजीवशास्त्रज्ञांचे मत आहे. सध्या हे प्रमाण कसेबसे ०.२ ते ०.५ टक्के एवढे आहे. सेंद्रिय पदार्थापासून तयार होणार्‍या सेंद्रिय कर्बात घट झाल्यामुळे जमिनीची गुणवत्ता ढासळत आहे. ती सुधारण्यासाठी मग पुन्हा नव्याने खर्च करावा लागत आहे. एकप्रकारे यामुळे उत्पादन खर्चात वाढ होत आहे. यामुळे नगदी नफ्याचे प्रमाणही दिवसेंदिवस घटत आहे. जमिनीच्या चांगल्या पालनपोषणातील ही आव्हाने आज संपूर्ण शेती व्यवस्थेपुढीलच आहेत.
     
    *   हरितक्रांती पूर्वीच्या पीक उत्पादनाच्या उपलब्ध स्रोतातील आकडेवारीचे अवलोकन केले तर असे दिसून येईल की तामिळनाडूमध्ये भाताचे उत्पादन ५८ क्विटल प्रति हेक्टरी होते अशी नोंद आहे. यावरून हे स्पष्ट होते की रासायनिक खताचा वापर न करताही भाताचे उत्पादन आताच्या सरासरीपेक्षा जास्त होते. याला महत्त्वाचे कारण हरितक्रांतीपूर्वी पूर्वजांनी जमिनीत एखाद्या कायम ठेवीसारखे ठेवलेले सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण हे होते. त्यावेळी शेतजमिनीतील या सेंद्रिय कर्बाची पातळी तब्बल ४ टक्क्यांवर होती. रासायनिक खताच्या वापरामुळे हीच पातळी आज ०.२ ते ०.५ टक्क्यांपर्यंत खाली आलेली आहे.
     
    *   हा सर्व तपशील सांगण्याचे कारण असे, की नुकतेच केंद्र सरकारने सेंद्रिय पदार्थ विकत घेऊन त्यापासून ऊर्जा निर्मिती करण्याचे संकेत  दिलेले आहेत. भारतामध्ये प्रति वर्ष एकूण ५४०० लाख टन इतके जैविक पदार्थ उपलब्ध होत असून त्यापैकी ७०-७५ टक्के पदार्थ जनावरांना चारा म्हणून वापरला जातो. उरलेला सर्वसाधारणपणे १२०० ते १५०० टन जैविक पदार्थ ऊर्जा निर्मितीसाठी उपलब्ध होतो. याद्वारे साधारणपणे १८ हजार मेगावॅट विद्युत निर्मिती होऊ शकते, अशी ही योजना आहे. मात्र आपण जर सर्व सेंद्रिय पदार्थ असा वीज निर्मिती करण्यासाठी वापरला तर ही सध्याची सेंद्रिय कर्बाची ०.२ ते ०.५ टक्के ही पातळी ० टक्क्यांपर्यंत खाली येण्यास वेळ लागणार नाही. आणि ज्या वेळी जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी ० टक्क्यांपर्यंत खाली जाईल त्यावेळी पिके तर सोडाच, पण त्या जमिनीत गवतसुध्दा चांगले वाढू शकणार नाही. या एका निर्णयामुळे अवघी शेती धोक्यात येईल. भविष्यात या भल्या मोठया  लोकसंख्येची अन्नधान्याची गरज पूर्ण करणे खूप अवघड होऊन बसेल.
     
    *   वास्तविक सध्या असलेली जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी वाढविण्यासाठी सेंद्रिय पदार्थाचा वापर कसा करावा, याबाबत भविष्यात एखादा पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रॉजेक्ट) राबवण्याची गरज आहे. यासाठी शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. शेतकरी मेळावे, प्रात्यक्षिके, चर्चासत्रे, प्रदर्शन, प्रसार माध्यम, कार्यशाळेच्या माध्यमातून जनजागृती होणे आवश्यक आहे. सरकार आणि कृषितज्ज्ञांनी याबाबत महत्त्वाची भूमीका बजावण्याची गरज आहे. मात्र असे न होता,असलेले सेंद्रिय पदार्थ ऊर्जा निर्मितीसाठी पळवले तर ते खूप धोकायादायक ठरू शकेल.
     
    *   पंजाब कृषी विद्यापीठाने याबाबत प्रयोग केलेले असून त्यांनी पूर्व हंगामाच्या भात पिकाच्या अवशेषात त्यांनीच विकसित केलेल्या ‘हॅपी सीडर’द्वारे पेरणी केली असता २० टक्के उत्पादनात वाढ झाल्याचे वृत्त  प्रसिध्द झालेले आहे. अशाच प्रकारचा प्रयोग पिपळगाव (गाढे) (ता. परळी जि. बीड ) येथील प्रगतशील शेतकरी उमाकांत थोन्टे यांनी २०१३ मध्ये केला. त्यांनी त्या वर्षी शेतातील ऊसाचे पाचट न काढता ते शेतात तसेच कुजवले. एकप्रकारे या पाचटापासून त्या जमिनीला उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत मिळाले.  यानंतर त्यांनी त्या जमिनीत कापसाचे पीक घेतले. हे पीक एवढे जोमात आले, की तो कापूस तोडण्यासाठी चक्क कु र्‍हाडीचा वापर करावा लागला. ही दोन्ही उदाहरणे सेंद्रिय पदार्थाचा योग्य वापर केल्याने वाढलेले उत्पादन दर्शवतात.
     
    *   या पद्धतीमुळे जमिनीत सेंद्रिय कर्बाची पातळीत वाढ होते. यामुळे शेती उत्पादनात वाढ होते. दुसरीकडे जमिनीचा पोत नैसर्गिकरित्या वाढवल्यामुळे तो सुधारण्यासाठी कराव्या लागणार्‍या खर्चात बचत होते. एकीकडे उत्पादनात वाढ आणि दुसरीकडे खर्चात बचत यामुळे शेतकर्‍याच्या एकूण उत्पन्नात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.
     
    *   दरम्यान, या सेंद्रिय कर्बाचा फायदा केवळ एवढयापुरताच नाही. तर या सेंद्रिय कर्बामुळे जमिनीची जलसंधारण क्षमताही वाढते. तसेच नैसर्गिकरीत्या मृदसंधारण होते. जमिनीची निचरा प्रणाली सुधारुन पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण वाढते. आज शासन, स्वयंसेवी संस्थांद्वारे जल व मृदसंधारणासाठी जो कोटयवधी रुपये खर्च करत आहे, तो खर्च सुध्दा जमिनीतील सेंद्रिय पदार्थाची पातळी आपण ५ टक्के स्थिर ठेवू शकलो तर करण्याची आवश्यकता पडणार नाही. यामुळे कूपनलिका, विहिरींच्या पाण्यावर पातळीत वाढ होऊन सिंचन क्षेत्रात सुध्दा वाढ होण्यास मदत होईल. केवळ एका गोष्टीच्या प्रामाणिक आणि जास्तीतजास्त वापरामुळे हे यश शक्य आहे.
     
    *   आज शेतीत रासायनिक खताचा दुपटीने वापर करूनही पीक उत्पादनात वाढ होत नसल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. बदलत्या हवामानामुळे उशिरा व अवेळी पडणार्‍या पावसामुळे शेतिप्रधान भारतातला ४० टक्के तरुण शेतकरी शेती सोडत पर्याय शोधत आहे. हे टाळण्यासाठी शेती व्यवसायात शाश्वतता येणे काळाची गरज आहे. शेती व्यवसायात शाश्वतता येण्यासाठी जमिनीच्या सुपीकतेस महत्त्व आहे. आणि या जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय पदार्थापासून तयार होणार्‍या सेंद्रिय कर्बास महत्त्व आहे. आपण आपल्या हृदयाची जशी काळजी घेतो, तशी जमिनीची काळजी घेणे आवश्यक आहे. या सर्व प्रवासात ज्याला महत्त्व आहे, त्या सेंद्रिय पदार्थाचे नाते जर आम्ही शेतीपासून तोडणार असू तर त्याने आम्ही आमची शेतीच धोक्यात आणणार आहोत.
     
    *   तेव्हा सर्व शेतकरी बांधवाना माझे कळकळीचे आवाहन आहे, की जमीन ही आपली काळी आई आहे. या काळ्या आईचे पोषण फक्त आणि फक्त सेंद्रिय पदार्थाद्वारेच होते. ज्या काळ्या आईने आपले आजपर्यंत पोषण केले त्याच आईला आपण सेंद्रिय पदार्थ विकून जर उपाशी ठेवले तर तिच्यापासून अधिक पीक उत्पादनाची अपेक्षा करणेही चुकीचे ठरेल. आणि एक दिवस आपणा सर्वानासुध्दा उपाशी राहण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.
     
    सौजन्य व आभार : दैनिक लोकसत्ता
    ६ जुलै  २०२१ / डॉ. गुरुनाथ थोन्टे

Share this story

Total Shares : 0 Total Views : 102