दादासाहेब फाळके पुरस्कार / अभिनेते रजनीकांत

  •  दादासाहेब फाळके पुरस्कार / अभिनेते रजनीकांत

    दादासाहेब फाळके पुरस्कार / अभिनेते रजनीकांत

    • 03 Apr 2021
    • Posted By : study circle
    • 114 Views
    • 0 Shares

     दादासाहेब फाळके पुरस्कार / अभिनेते रजनीकांत 

             1 एप्रिल 2021 रोजी अभिनेते रजनीकांत यांना सिनेसृष्टीतील सर्वात मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार (67 वा पुरस्कार) जाहीर झाला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची घोषणा केली. दादासाहेब फाळके पुरस्काराचे हे यंदाचे 51 वे वर्ष आहे. पुरस्काराचे वितरण 3 मे रोजी.  आशा भोसले, मोहनलाल, विश्र्वजित चटर्जी, शंकर महादेवन आणि सुभाष घई या पाच ज्युरींनी रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्याची शिफारस केली होती.

    रजनीकांत यांच्याबाबत ठळक  नोंदी -
     
    1) मूळचे मराठी असणारे रजनीकांत दक्षिणेत थलैवा (थलैवाचा इंग्रजी अर्थ ’लीडर’) बनले. त्यांनी तमिळसोबत हिंदी चित्रपटांतून अफाट लोकप्रियता मिळवली. 

    2) बस कंडक्टरपासून थलैवापर्यंतचा प्रवास केलेल्या रजनीकांत ऊर्फ शिवाजीराव गायकवाड यांना सुरूवातीच्या काळात सहाय्यक खलनायक, बलात्कारी, चोर अशा भूमिका वाट्याला आल्या.

    3) मणिरत्नम यांच्यासोबतचा दलपती सिनेमा हा रजनी यांच्या चित्रपटातील सर्वोत्तम सिनेमा मानला जातो. 

    4) रजनीकांत सुपरस्टार होण्यामागे त्याच्या भन्नाट स्टाइल्सचा वाटा मोठा आहे - पाय फिरवून वावटळ उठवणारा, सिगरेट पेटवण्याची स्टाईल, नाणे हवेत फेकणे, गळ्यातला मफलर हवेत उडवून पुन्हा गळ्यात अडकवण्याची स्टाईल, गॉगल घालण्याची स्टाईल लोकप्रिय ठरली. चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी रजनीकांत त्यांच्या घराजवळ असलेल्या रामा हनुमान मंदिरात स्टंट्सची प्रॅक्टिस करत असत. बंगळूर बस ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसमध्ये कंडक्टर (वाहक)  असताना त्यांची तोंडाने शिट्टी वाजविण्याची कला लोकप्रिय झाली होती. 

    5) रजनीकांत असे एकमेव अभिनेते आहेत ज्यांचा सीबीएसई अभ्यासक्रमात उल्लेख केला गेला. अनेकजण त्यांची पूजा करत असले तरी ते स्वत: मात्र कमल हसन यांचे मोठे चाहते आहेत.

    6) प्रत्येक चित्रपटानंतर रजनीकांत काही काळासाठी ब्रेक घेऊन हिमालयात जातात. त्यांच्या प्रत्येक भेटीत ऋषिकेश येथील हॉटेलमध्ये त्यांची नेहमीची ठरलेली खोलीच त्यांना दिली जाते. 

    7) 1978 साली आलेल्या ‘भैरवी’ या चित्रपटाने रजनीकांत यांना थेट सुपरस्टार पदावर नेले. या चित्रपटाची इतकी चर्चा झाली की दिग्दर्शक एम. भास्कर यांनी रजनीकांत यांचे 35 फूटांचे पोस्टर चेन्नईमध्ये लावले होते.

    8) 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ’शिवाजी द बॉस’ या तमिळ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले.  या चित्रपटाकरिता त्यांना 26 कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. 

    9) रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत. 

    10) रजनीकांत यांनी साकारलेल्या भूमिकांमधील विशेष बाब म्हणजे त्यांनी साकारलेल्या पात्राचा कधीही चित्रपटात मृत्यू झाल्याचे दाखवण्यात आलेले नाही. रजनीकांत यांच्या चाहत्यांच्या आक्रोशाला सामोरे जाण्याच्या भीतीपोटी दिग्दर्शक पात्राचा मृत्यू दाखवत नसल्याची चर्चा चित्रपटसृष्टीत आहे.

    11) रजनीकांत यांची इतर नावे - रजिनी, थलैवा, सुप्परस्टार ,बॉस.

    12) कार्यक्षेत्र - अभिनय (कन्नड, तेलुगू, तमिळ, हिंदी, मल्याळम, इंग्लिश, बंगाली)

    13) प्रमुख चित्रपट - शिवाजी द बॉस, बिल्ला, दलपती, चंद्रमुखी, बाशा, मुतू, हम, पडैयप्पा

    14) अभिनय कारकीर्द -
    मद्रास फिल्म इंस्टिट्यूटमध्ये अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण : 1973-74 
    सह अभिनेता : 1975-77
    प्रमुख भूमिकेत : 1978-89
    कारकिर्दीचे शिखर : 1989-99

    रजनीकांत यांचे चरित्र
    शिवाजीराव गायकवाड अर्थात रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळूर येथे एका महाराष्ट्रीय मराठा हेन्द्रे पाटील समाजात झाला.  त्यांचे मूळ गांव पुणे जिल्ह्यातील, पुरंंदर तालुक्यातील मावडी कडेपठार हे सांगितले जाते. जेजुरीचा खंडेराया त्यांचे कुलदैवत. कोल्हापूर व जुन्नर या ठिकाणी असलेल्या नातेवाइकांमुळे त्यांचे बालपण महाराष्ट्रात गेले.

    त्यांच्या वडिलांचे रामोजीराव गायकवाड आणि आईचे जिजाबाई गायकवाड असे आहे. गायकवाड कुटुंबियांच्या चार अपत्यांपैकी रजनीकांत सर्वात धाकटे आहेत. रजनीकांत ह्यांना सत्यनारायण राव गायकवाड आणि नागेश्र्वर राव गायकवाड हे दोन मोठे भाऊ आणि एक अश्रि्वनी बाळुबाई गायकवाड नावाची एक बहिण ही आहे. रजनीकांत ह्यांच्या सहचारिणी लता रंगाचारी ह्या असून त्यांना ऐश्र्वर्या  आणि सखुबाई ऊर्फ सौंदर्या  ह्या दोन मुली आहेत. त्यांचे वडील रामोजीराव गायकवाड हे  बंगळुरू येथे पोलिस कॉन्स्टेबल होते आणि आई गृहिणी होती. रजनीकांत 9 वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले.

    लहानपणापासून त्यांनी रामकृष्ण मठातर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायला सुरुवात केली. अनेक नाटकांमध्ये आणि नृत्य, गाण्याच्या कार्यक्रमात प्राविण्य दाखवले. महाभारतावरील एका नाटकात त्यांना एकलव्याच्या मित्राची भूमिका करण्याची संधी मिळाली. ही भूमिका दुय्यम होती. तरीही त्यांनी आपली छाप सोडली. कन्नड कवी डी. आर. बेंद्रे यांनी रजनीकांत महानायक होणार, असे भविष्य वर्तवले होते.

    बंगळूर येथील आचार्य पाठशाळा ह्या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले आणि रामकृष्ण मिशनच्या बंगळूरमधील महाविद्यालयात त्यांचे उच्चशिक्षण पूर्ण झाले.  शाळेतील अनेक नाटकांमधून त्यांनी खलनायकाची भूमिका केली. रावणाची व्यक्तिरेखा साकारायला त्यांना फार आवडायचे.

    1968-71 दरम्यान रजनीकांत मद्रास आणि बंगळूर मध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळी कामे केली. शालेय शिक्षण सुरू असताना रजनीकांत यांनी सुतारकाम, गवंड्याच्या हाताखाली मजूर, ओझेवाला अशी अनेक मेहनतीची कामे केली.  

    1971 साली वयाच्या 21 व्या वर्षी त्याने बंगळूर परिवहन वाहतूक सेवेमध्ये (बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन) त्यांची कंडक्टर म्हणून नियुक्ती झाली. नोकरी सुरू असताना त्यांना ’टोपी मुनियप्पा’ यांनी आपल्या नाटकांमध्ये काम करण्याची संधी दिली.

    1973 साली राज बहाद्दूर या मित्राकडून आर्थिक मदत घेऊन रजनीकांत यांनी मद्रास चित्रपट संस्था येथून अभिनयाचे शिक्षण घेतले. या संस्थेत शिकत असताना तमिळ चित्रपट भाषा शिकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पुढे रजनीकांत तमिळ बोलायला लागले.  

    1975 साली रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीतील सर्वात पहिला ब्रेक वयाच्या 25 व्या वर्षी मिळाला.  एका कर्करोग्याची भूमिका असलेल्या तमिळ भाषेतील ’अपूर्वा रागंगल’ असे या चित्रपटात (कमल हसन यांची मुख्य भूमिका) त्यांची रागीट नवर्‍याची केवळ 15 मिनीटांची भूमिका छोटी भूमिका होती. हा चित्रपट कथानकामुळे वादग्रस्त ठरला. तीन पुरस्कार मिळाले. रजनीकांतच्या छोट्या पण, प्रभावी कामाचे खूप कौतुक झाले व या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

    त्यांचा दुसरा चित्रपट ’अंथुलेनी कथा’ हा तेलगू भाषेत होता. नंतर त्यांचे ’थोडर कथाल’ या नावाने तमिळ रुपाने करण्यात आले. यातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. पुढील पाच वर्षे रजनीकांत यांनी खलनायकाच्या भूमिकेतील अवरगाल आणि मूंद्रू मुडीचू असे चित्रपट साकारले. फक्त तमिळमध्ये नव्हे तर कन्नड, तेलगू, मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटांत त्यांनी काम केले. 

    1977 साली तेलुगु चित्रपट ’शिलगम्मा चेंपिडी’मध्ये रजनीकांत यांना पहिली मुख्य भूमिका मिळाली. तसेच मुथुरामन यांच्या भुवन ओरु केलवीकुरी या चित्रपटात त्यांना पहिली सकारात्मक भूमिका मिळाली. ’बालूजेनू आवरगल,’ ’वय धिनीलली,’ इत्यादी चित्रपटात त्यांना छोट्या-मोठ्या भूमिका मिळाल्या. यातील बहुतेक चित्रपट ’बालचंदर’ यांनी दिग्दर्शित केले होते. रजनीकांत बालचंदर यांचा उल्लेख आपली आई असा करतात.या जोडीने 1990 पर्यंत 25 चित्रपट एकत्र केले. 

    1978 साली भैरवी या चित्रपटाने रजनीकांत यांना सुपरस्टार बनवले. 1978 पासून रजनीकांत यांच्या चित्रपटाचा सपाटा सुरू झाला. या एका वर्षांत त्यांनी 20 तमिळ, तेलुगु आणि कन्नड चित्रपटात नायकाच्या भूमिका साकारल्या. हा त्यावेळी एक विक्रमच होता. याचदरम्यान, तमिळ निर्मात्यांनी अमिताभ बच्चन यांच्या हिंदी चित्रपटांचे तमिळ रिमेक बनवण्यास सुरू झाली होती. यावेळी रजनीकांत यांनी अमिताभ यांची भूमिका त्या-त्या चित्रपटात केली होती. ’नान वझवयीपेन’ हा चित्रपट ’मजबूर’ या नावाने हिंदी रिमेक बनला. 

    1980 साली डॉनचा रिमेक आल्यानंतर रजनीकांत यांना साऊथचा अमिताभ अशी ओळख मिळाली.

    1980-90 या 10 वर्षांत रजनीकांत 3 भाषांमध्ये सुमारे 100 चित्रपटात प्रमुख भूमिका गाजवल्या.  ’गरजनायी,’ ’नेत्रिकन’ हे चित्रपट त्यांनी केले.  बिल्ला या धमाकेदार चित्रपटातून त्यांनी पुनरागमन केले. पदयप्पा हा त्यांचा 150 वा चित्रपट भव्य यश ठरला.

    1983 मध्ये त्यांनी ’अंधा कानून’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ’सिगप्पू,’ ’मनीथाम,’ ’मिस्टर भारत,’ ’वलईकरण,’ ’गुरुशिष्यन,’ ’धर्मखीन थलईवन’ असे अनेक चित्रपट त्याने केले. 

    1985 मध्ये सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत बेवफाई या चित्रपटामध्ये त्यांनी निगेटिव्ह भूमिका साकारली.

    1988 साली ब्लडस्टोन नावाच्या हॉलिवूडपटात रजनीकांत यांनी काम केलं.

    1991 मध्ये अमिताभ यांच्यासोबत हम या चित्रपटामध्ये काम केलं. 

    2000 पर्यंत रजनीकांत यांचा गोल्डन पीरियड होता. 2002 पासून 2010 पर्यंत फारस यश मिळालं नाही. पण त्यांनी आपली लोकप्रियता टिकवून ठेवण्यात यश मिळवलं. मेरी अदालत, जॉ जॉनी जनार्दन, वफादार, गिरफ्तार, दोस्ती-दुशमनी, खून का कर्ज, फरिशते, आतंक ही आतंक, फूल बने अंगारे अशा चित्रपटांमध्ये रजनीकांत यांनी दुय्यम भूमिका साकारली. 

    2007 मध्ये शिवाजीः द बॉस या चित्रपटासाठी रजनीकांतने सर्वांत जास्त शुल्क आकारले होते. त्यानुसार आशियातील सर्वाधिक मानधन घेणार्या अभिनेत्यांमध्ये जॅकी चैननंतर रजनीकांत दुसरे ठरले होते.

    रजनीकांत यांनी वेळोवेळी तमीळ लोकांकरिता आणि लोकाधिकारांकरिता उपोषणे केली. शासनावर दबाव टाकण्याकरिता त्यांनी नेहमीच समाजघटकांना मदत केली. रजनीकांत त्यांच्या दानशूरतेसाठी ओळखले जातात.

    31 डिसेंबर 2017 रोजी चेन्नईमधील श्रीराघवेन्द्र मण्डपम ह्या ठिकाणी रजनीकांत ह्यांनी एका भव्य सभेमध्ये पत्रकार आणि रसिकांसमक्ष आपण सक्रिय राजकारणात प्रवेश करत असल्याचे, तसेच 2018 मध्ये रीतसर पक्षस्थापना करुन संपूर्ण तमिळनाडू राज्यातील येत्या निवडणूका लढविण्याचे घोषित केले होते. मात्र 2021 मध्ये त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुले राजकारणात प्रवेश करण्याचे नाकारले. 

    रजनीकांत यांना मिळालेले पुरस्कार व बहुमान 
    1) 1982 - तामीळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार उत्कृष्ट अभिनेता
    2) 1984 - फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता (तमिळ)
    3) 1995 - आध्यात्मिकतेकरिता ओशो बिस्मित पुरस्काराने सन्मानित.
    4) 1995 - तमिळ तमिळनाड राज्य चित्रपट पुरस्कार उत्कृष्ट अभिनेता
    फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता (तमिळ)
    5) 1999 -तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार उत्कृष्ट अभिनेता
    6) 2000 - पद्मभूषण ह्या नागरी गौरवाचे मानकरी.
    7) 2005 - तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार उत्कृष्ट अभिनेता
    8) 2007 - महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार (राज कपूर पुरस्कार)
    9) 2007 - तमिळ तमिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कार उत्कृष्ट अभिनेता
    फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता (तमिळ)
    10) 2014 - 45 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामध्ये रजनीकांत यांना सेंटेनरी अ‍ॅवॉर्ड फॉर इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द ईयरने सन्मानित करण्यात आले होते. 
    11) 2014 - 6 तामिळनाड़ू स्टेट चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यापैकी 4 सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि 2 स्पेशल अ‍ॅवॉर्ड्स फॉर बेस्ट कॅरॅक्टरसाठी देण्यात आले होते. 
    12) 2016 -  पद्मविभूषण बहुमान
    13) 2019  - दादासाहेब फाळके पुरस्कार 
    14) जर्मनीतील सर्वोच्च नागरी सन्मान/पुरस्कार द फ्युरिअरने सन्मानित.
    15) जपानचा एमटीव्ही सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, जागतिक चित्रपटातील योगदानाबद्दल.
    16) टाईम्स मॅगझीनने रजनीकांत ह्यांना जगातील सर्वात प्रभावी 100 व्यक्तींच्या यादीत स्थान दिले आहे.
    17) आशिया खंडातील चित्रपट उद्योगात जॅकी चॅननंतरचे सर्वात अधिक मानधन मिळविणारे कलाकार.
    18) आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात सर्वाधिक प्रसिद्धीबद्दल गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद.(सर्वाधिक जागतिक चाहते असणारा कलाकार)
    19) 9 वेळा (सर्वोत्कृष्ट अभिनेता) सिनेमा एक्सप्रेस चित्रपट पुरस्कार विजेता
    20) 10 वेळा फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता 
    21) भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्तम कामगिरीचा शेव्हलियर शिवाजी गणेशन पुरस्कार विजेता.

    रजनीकांत चित्रपट कारकीर्द 
    महत्त्वाचे चित्रपट - 
              काला, दरबार, 2.0, कबाली, रोबोट, बाबा, बुलन्दी, आगाज़, क्रांतिकारी, आतंक ही आतंक, इंसानियत के देवता, चोर के घर चोरनी, त्यागी, दलपति, फूल बने अंगारे, हम, खून का कर्ज़, फरिशते, किशन कन्हैया, चालबाज़, भ्रष्टाचार, तमाचा, उत्तर दक्षिण, असली नकली, दोस्ती दुशमनी, भगवान दादा, वफ़ादार, आज का दादा, बेवफ़ाई, महागुरु, गंगवा, मेरी अदालत, ज़ुल्म की ज़ंजीर, इंसाफ कौन करेगा, आखिरी संग्राम, जॉन जानी जनार्दन, अंधा कानून, राम रॉबर्ट रहीम, जॉनी, प्रिया, गायत्री, मूंदरू मुदिचू .
     
    दादासाहेब फाळके पुरस्कार 
    1) भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणार्‍या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. 
    2) 1969 मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. 
    3) हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो.
    4) दरवर्षी भरवल्या जाणार्‍या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते.
    5) दादासाहेब फाळके या सरकारी पुरस्काराव्यतिरिक्त याच नावाचा पुरस्कार इतर संस्थांद्वारेही देण्यात येतो.

    •    1969 पासून दिल्या जात असणार्‍या दादासाहेब फाळके  पुरस्काराची रक्कम  -
    1969 - 1972 ढाल, शाल व 11,000 रुपये
    1973 - 1976 सुवर्णपदक, शाल व  20,000
    1977 - 1983 सुवर्णपदक, शाल व  40,000
    1982 - 2002 सुवर्णकमळ, शाल व  1 लाख रुपये
    2003 - 2005 सुवर्णकमळ, शाल व  2 लाख रुपये
    2006 पासून सुवर्णकमळ, शाल व  10 लाख रुपये
     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 114