तेजस : स्वदेशी लढाऊ विमान
- 16 Jan 2021
- Posted By : Study Circle
- 485 Views
- 0 Shares
तेजस : स्वदेशी लढाऊ विमान
भारतीय हवाई दलात 73 लढाऊ आणि 10 शिकाऊ अशा एकंदर 83 ‘तेजस’ विमानांचा समावेश केला जाणार आहे. जानेवारी 2021 मध्ये केंद्र सरकारच्या ‘संरक्षणविषयक मंत्रिमंडळ समिती’ने 45,696 कोटी रुपये खर्चून एकंदर 83 विमानांच्या खरेदीस मंजुरी दिली. 1 तेजस विमान 550 कोटी रुपयांहून महाग असले तरी एका ‘राफेल’ची नवी किंमत सुमारे 1670 कोटी रुपये आहे. LC- तेजसच्या MK1- व्हेरिएंटमध्ये 50% ऐवजी 60% स्वदेशी उपकरणे आणि तंत्रज्ञान वापरले जाईल. LC-तेजस भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील कणा होणार आहे. यामुळे हवाई दलाच्या सामर्थ्यात लक्षणीय वाढ होईल.
तेजस संदर्भातील घटनाक्रम -
• ‘तेजस’ विमानाची निर्मिती प्रक्रिया मंदगतीची असली, तरी भारताला अभिमान वाटावा असे हे विमान आहे. बहुउद्देशीय मोहिमांसाठी ते प्रभावीपणे वापरता येते. अतिशय चपळतेने हल्ला चढविण्याची त्याची क्षमता आहे. हवाई युद्धासह टेहळणी, युद्धनौका विरोधातील कारवाईस सक्षम ठरेल, या दृष्टीने ते विकसित करण्यात आले आहे. शत्रूच्या विमानासह जमिनीवरून डागल्या जाणार्या क्षेपणास्त्राची पूर्वसूचना देणारे जे संवेदक विमानात बसविलेले आहेत ते भारतीय बनावटीचे आहेत. हवेत इंधन भरण्याची क्षमता असल्याने ते प्रदीर्घ काळ कार्यरत राहू शकते.
• ‘उडत्या शवपेट़या’ म्हणून मिग विमानांची कुख्याती झाल्यानंतर ‘तेजस’सारखे विमान हवाई दलासाठी आवश्यक होते. माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांची कारकीर्द 2006 ते 2014 अशी दीर्घ होती आणि या काळात ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ने ‘तेजस’च्या निर्मितीला वेग दिला होता. पण अँटनी यांच्या काळात संरक्षण खात्याने अनेक बाबींवर निर्णय घेण्याचे टाळले, तसेच तेजस विमानांबाबतही झाले.
• 2010 साली नौदलाच्या विमानवाहू तुकड़यांत ‘तेजस’चा समावेश करण्याचा निर्णय, जाहीर झाला होता.
• 2011 मध्ये ‘तेजस’साठी ‘कावेरी’ हे भारतीय इंजिन वापरावे का, ते वापरल्यास कुणाच्या सहकार्याने बनवावे, फ्रेंच कंपनीचे साह्य त्यासाठी घ्यावे काय, हे सारे मुद्दे अनिर्णित राहिले होते.
• 2014 मध्ये जगातील सर्वात लहान आणि वजनाने हलके असे तेजस हे लढाऊ विमान अखेर नौदलासाठी तयार झाले होते.
• 2015 मधील नवा राफेल करार आणि त्यानंतर खासगी कंपन्यांना संरक्षण उत्पादनात प्राधान्य देण्याची भूमिका या गदारोळात तेजसचा हा समावेश मागे पडला.
• 13 जानेवारी 2020 रोजी ‘आयएनएस विक्रमादित्य’वर ‘तेजस’ दिमाखात उतरले.
• तेजसचे वैशिष्ट्य -
1) तेजस भारतात विकसित केलेले हलके आणि मल्टीरोल फायटर जेट आहे.
2) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने तेजस विकसित केले आहे.
3) चौथ्या पिढीतील या विमानाचे वजन 12 टन असून लांबी 13.2 मीटर आहे.
4) स्वनातीत वेगाने ते मार्गक्रमण करते. ते ताशी 2200 किलोमीटर वेगाने मार्गक्रमण करू शकते.
5) या एक आसनी विमानात इंजिन देखील एकच आहे.
6) विविध प्रकारच्या मिश्र धातूंचा वापर केल्यामुळे त्याचे वजन कमी करणे शक्य झाले आहे. तेजस 42% कार्बन फायबर, 43% अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण आणि टायटॅनियमपासून बनविलेले आहे.
7) या विमानाचे वेगळेपण म्हणजे त्याचे पंख. ते त्रिकोणी आहेत.
8) तेजसला नेहमीच्या लढाऊ विमानांसारखा शेपटीचा भाग नाही.
9) रडारवर त्याचे अस्तित्व अधोरेखित होणार नाही, याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात आले आहे.
10) वैमानिकाला डिजिटल प्रणालीने संचालन करता येईल, अशी संपूर्ण व्यवस्था त्यात कार्यान्वित आहे.
11) त्यात अत्याधुनिक रडार यंत्रणा व संगणकीय प्रणाली समाविष्ट आहे.
12) तेजस हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मिसाइल सोडू शकते. तेजसमध्ये अँटीशिप मिसाइल, बॉम्ब आणि रॉकेट देखील ठेवता येते.
13) हवाई दलाबरोबर नौदलाच्या गरजा भागविण्यासाठी तेजसला तयार केले जात आहे.