Date : 26/10/2020
टी-90 भीष्मटँक
भारत आणि चीनदरम्यान सुरु असणार्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने सीमेरेषेजवळ आधुनिक रणगाडे, युद्ध विमाने तैनात केली आहेत. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. भारताने या सीमेवर टी-90 भीष्म टँकची फौज तैनात केली आहे.
1. टी-90 हा रशियाचा सध्याचा मेन बॅटल टँक (एमबीटी) असून तो जगातील सर्वोत्तम रणगाडयांपैकी एक आहे. त्यापूर्वीच्या टी-72 या रणगाडयाची ही सुधारित आणि अत्याधुनिक आवृत्ती आहे. रशियाचे टी-80 हे रणगाडे अद्ययावत असले तरी त्यांची रचना आणि निर्मिती प्रक्रिया काहीशी गुंतागुंतीची होती. त्याच्या तुलनेत टी-90 ची रचना सोपी आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनास सुटसुटीत आहे.
2. 1993 साली टी-90 रणगाडे रशियन सैन्यात दाखल झाले. भारताने 2001 साली 310 टी-90 रणगाडे विकत घेतले असून त्यांचे नाव भीष्म असे ठेवले आहे. आता भारतीय सैन्यातील टी-90 रणगाडयांची संख्या 1200 च्या वर गेली आहे.
3. टी-90 रणगाडयांची मुख्य खासियत म्हणजे त्यांची तिहेरी संरक्षण प्रणाली. यात पहिल्या स्तरावर रणगाडयाचे कॉम्पोझिट आर्मर (चिलखत) आहे. त्यावर तिसर्या पिढीतील कॉन्टॅक्ट-5 हे एक्स्प्लोझिव्ह रिअॅक्टर आर्मर (ईआरए) आहे. ईआरएमध्ये धातूच्या थरांमध्ये स्फोटकांचा थर लावलेला असतो.
4. शत्रूचा तोफगोळा किंवा रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र त्यावर धडकले की त्यातील स्फोटकांचा बाहेरील बाजूला स्फोट होऊन शत्रूचा तोफगोळा बाहेर ढकलला जातो आणि मुख्य चिलखत सुरक्षित राहते. या रणगाडयाच्या पृष्ठभागावर जे विटांसारखे भाग दिसतात ते ईआरए आहे.
5. तिसर्या संरक्षक स्तरात श्टोरा (पडदा) नावाची खास रशियन प्रणाली आहे. त्यात इलेक्ट्रो-ऑप्टिकल डॅझलर किंवा अॅक्टिव्ह इन्फ्रारेड जॅमर आहेत. ते शत्रूने आपल्या रणगाडयावर लेझर किरणांनी नेम धरला की कर्मचार्यांना संभाव्य हल्ल्याची आगाऊ सूचना देतात. त्यानंतर इन्फ्रारेड जॅमर आपल्या दिशेने येणार्या शत्रूच्या क्षेपणास्त्राची दिशादर्शन प्रणाली जॅम करतात आणि त्याला आपल्या रणगाडयापासून बाजूला वळवतात.
6. तसेच रणगाडयाच्या सभोवताली स्मोक ग्रेनेड्स (धूर पसरवणारे बॉम्ब) फेकले जातात. त्यानेही शत्रूचे तोफगोळे किंवा क्षेपणास्त्रे लक्ष्यापासून भरकटतात. याशिवाय अन्य रशियन रणगाडयांप्रमाणे टी-90 चे डिझाइनही बसके (उंचीला कमी) असल्याने शत्रूच्या हल्ल्यापासून वाचण्याची त्याची क्षमता अधिक आहे.
7. टी-90 ची 125 मिमीची स्मूथ बोअर मुख्य तोफ नेहमीच्या तोफगोळ्यांसह 9एम119एम रिफ्लेक्स रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र डागू शकते. रिप्लेक्स क्षेपणास्त्र शत्रूच्या रणगाडयांचे 37 इंच जाडीचे पोलादी कवच भेदू शकते आणि कमी उंचीवरील हेलिकॉप्टरही पाडू शकते.
8. याशिवाय लेझर आणि इन्फ्रारेड रेंज फाईंडर, बॅलिस्टिक कॉम्प्युटर, गन स्टॅबिलायझेशन आदी यंत्रणाही आहेत. टी-90 ताशी 65 किमी वेगाने 650 किमीची मजल मारू शकतो. त्यात वातानुकूलन यंत्रणाही आहे.