चक्रीवादळांची वाढती संख्या

  • चक्रीवादळांची वाढती संख्या

    चक्रीवादळांची वाढती संख्या

    • 02 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 159 Views
    • 1 Shares
     चक्रीवादळांची वाढती संख्या
     
       महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ’वारे, वायुदाब व वादळे ’ घटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. सदर लेखात ’चक्रीवादळांची वाढती संख्या ’ व त्यावर येऊ शकणारे प्रश्‍न याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
     
    सामान्य अध्ययन पेपर (१) : भूगोल (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)
     
    २.२ हवामानशास्त्र : 
     
        * हवेचा दाब - वारे, ग्रहीय व स्थानिक वारे.
     
    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    चक्रीवादळांची संख्या वाढत आहे का?
     
    *   गेल्या पाच वर्षांमध्ये भारतच्या समुद्रकिनार्‍यांना चक्रीवादळांचे बसणारे तडाखे वाढलेले दिसतात. भारताच्या पूर्व व पश्रि्चम किनारपट्टीने एकूण ७५१६.५ किलोमीटर अंतर व्यापले आहे. भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आणि पश्रि्चमेकडे अरबी समुद्र यामधून बर्‍याचशा उष्णकटिबंधीय चक्रीवादळाची निर्मिती होते. भारत हा चक्रीवादळाच्या दृष्टीने जगातील सर्वांत जास्त प्रभावित क्षेत्रांपैकी एक आहे. जगातील जवळजवळ सहा टक्के चक्रीवादळे दर वर्षी किनारपट्टीला तडाखा देतात. चक्रीवादळाचा परिणाम देशाच्या संपूर्ण किनारपट्टीवर होत असला, तरी मुख्यत: बंगालच्या उपसागरातून पूर्व किनारपट्टीला आणि अरबी समुद्रातून गुजरातच्या किनारपट्टीला अधिक धोका आहे.
     
    *   नॉटसन व भारतीय हवामान विभाग यांच्या मते मागील पाच वर्षांत चक्रीवादळांच्या संख्येत ३५ टक्के वाढ झाली आहे. ही धोक्याची सूचना आहे. सततची येणारी चक्रीवादळे हवामानात होणार्‍या बदलांमुळे आहेत, हे नक्की! हवामान बदलांमुळे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढणे, चक्रीवादळे अधिक शक्तिशाली बनू शकतील, अशा अनेक मार्गांनी होणारे नुकसान वाढवित आहे. वादळादरम्यान पावसाची तीव्रता आणि समुद्र पातळी वाढत आहे. परंतु, मागील दशकाच्या तुलनेत गेल्या पाच वर्षांत झालेली तीव्र वाढ ग्लोबल वार्मिंगच्या संकटमय दुष्परिणामांसाठी चिंताजनक ठरू शकते. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रामध्ये प्रत्येक वर्षी सरासरी ५ ते ६ उष्णकटिबंधीय चक्रीवादळे तयार होतात. त्यापैकी २ ते ३ तीव्र स्वरूपाचे किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेचे चक्रीवादळे धडकत आहेत.
     
        उष्णकटिबंधीय चक्रीवादळे कशी तयार होतात?
     
    *   समुद्रात कमी दाबाच्या प्रदेशाभोवती चहू बाजूंनी येणार्‍या वार्‍यांमुळे वादळ तयार होते. वातावरणातील उष्ण व आर्द्र हवेचा सततचा पुरवठा हे चक्रीवादळाच्या निर्मितीचे प्रमुख कारण आहे. समुद्राचे तापमान हा चक्रीवादळाच्या निर्मितीचा मोठा घटक ठरतो. समुद्रात २६ डिग्री अंश सेल्सिअंश तापमान ६० मीटर खोलीपर्यंत असणे, हे त्यासाठी पोषक ठरते. जेथे महासागराचे पाणी खूपच उबदार आहे तेथे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ क्रियाशील असतात. जेथे महासागर थंड आहेत, तेथे उष्णकटिबंधीय चक्रीवादळे कमी असतात. कमी दाब केंद्र विकसित करण्यासाठी पुरेसे कोरिओलिस किंवा रोटेशन फोर्स असणे आवश्यक आहे. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला +/-५० अक्षांश (सुमारे ५५० किलोमीटर) वर कोरिओलिस फोर्स नाही, म्हणून या प्रदेशात कोणतीही उष्णकटिबंधीय चक्रीवादळे तयार होत नाहीत.
     
    *   जानेवारी १८९१ ते मे २०२१ या कालावधीमध्ये ताशी ८८ ते ११७ किलोमीटर वार्‍याचा वेग असलेली ’तीव्र चक्रीवादळ’ ते तासाला २२२ ते त्यापेक्षा अधिक किलोमीटर वेग असलेली ’महा चक्रीवादळ’ अशी एकूण १२९ चक्रीवादळे देशाच्या किनारपट्टीला धडकली आहेत. उष्णकटिबंधीय चक्रीवादळे साधारणत: मे-जून आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येतात. २०१५ ते २०२१मध्ये आलेल्या तीव्र चक्रीवादळांमध्ये तौक्ते, निसर्ग, अम्फान, कयार, महा, हिक्का, फनी, बॉब ०३, बुलबुल आदींचा समावेश आहे. २०२०मध्ये अति तीव्र स्वरूपाची तीन चक्रीवादळे भारताला धडकली आहेत. २०२१मध्ये आत्ताच तौक्ते चक्रीवादळ येऊन गेले असून, ’यास’ चक्रीवादळही धडकले आहे. म्हणजेच मान्सून येण्याआधीच दोन अति तीव्र स्वरूपाची चक्रीवादळे २०२१मध्ये आली.
     
        चक्रीवादळांची संख्या का वाढत आहे?
     
    *   उष्णकटिबंधीय चक्रीवादळ दुर्मीळ घटना आहे. त्यास पर्यावरणीय परिस्थितीचे नाजूक संयोजन आवश्यक आहे. ज्यात महासागरात विशिष्ट प्रमाणात उष्णता, वातावरणातील आर्द्रतेचे विशिष्ट वितरण आणि क्षैतिज वायू मंडलाच्या वार्‍यांची वेगळी रचना समाविष्ट आहे. अरबी समुद्रामधील समुद्राचे तापमान वर्षाकाठी जास्त प्रमाणात उष्णकटिबंधीय चक्रीवादळाच्या विकासासाठी पुरेसे उबदार असले, तरी हा भाग तुलनेने निष्क्रिय असतो. दर वर्षी केवळ दोन किंवा तीन घटना घडतात. तथापि, मागील १५ वर्षांत मान्सूनपूर्व उष्णकटिबंधीय चक्रीवादळाच्या वाढीस कारणीभूत ठरणारे पर्यावरणातील बदल जबाबदार आहेत. प्रक्षेपित वाढ ही प्रादेशिक हवामानात व्यापक प्रमाणात बदल होण्याचा एक भाग असू शकते. जी मानवनिर्मित आहे यात शंकाच नाही. नॉटसन यांच्या अभ्यासानुसार, मागील पाच वर्षात चक्रीवादळांच्या संख्येत ३५ टक्के वाढ झाली आहे. यामध्ये ग्लोबल वार्मिंग हा महत्त्वाचा घटक आहे. दोन डिग्री तापमानवाढ झाल्याने साधारणत: पाच टक्के (१ ते १० टक्के) वार्‍याचा वेग वाढतो. हा अंदाज थर्मोडायनामिकशी सुसंगत असून वादळाची संभाव्य तीव्रता सिद्धांत वापरून ठरविली जाते. तथापि, भविष्यातील ग्रीन हाउस तापमानवाढ अपेक्षेपेक्षा जास्त असण्याची शक्यता असल्याने अधिक तीव्र उष्णकटिबंधीय चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे.
     
    *   दक्षिण आशियाच्या बर्‍याच भागांमध्ये, मानवनिर्मित हवा प्रदूषणामुळे वातावरणातील ’ब्राउन क्लाउड’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या धुराचे जाड थर तयार झाले आहेत. जीवाश्म-इंधन वापर आणि बायोमास ज्वलन हे प्रदूषणाचे मुख्य स्रोत आहेत. ते वातावरणात काळा कार्बन साठवतात. मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम करतात. वाढत्या प्रदूषणामुळे सूक्ष्म तरंगकणांचे तापमान वाढत आहे. यामध्ये लहान कण, धूळ कण, बारीक ब्लॅक कार्बनचे बिट्स आदी घटक असतात. वातावरणात तरंगत असताना ते संपूर्ण ऊर्जा संतुलन बदलतात. मानवी क्रियेतून बर्‍याच प्रकारचे सूक्ष्म तरंगकण तयार होतात. यामध्ये जीवाश्म-इंधन जळण्यामुळे निर्माण होणारे कण, ग्रीन हाऊस वायू आदींचा समावेश आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून तापमानात वाढ होताना दिसते.
     
    *   इव्हान यांच्या अभ्यासातून समोर आले, की या ’ब्राउन क्लाउड’चा उष्णकटिबंधीय चक्रीवादळावरील वातावरणावर मोठा प्रभाव आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर येणार्‍या सौर ऊर्जेचे प्रमाण रोखून ’ब्राउन क्लाउड’ भूमध्य रेषेच्या तुलनेत उबदार अरबी समुद्राचे तापमान प्रभावीपणे कमी करू शकतात. उत्तर आणि दक्षिणेकडील समुद्राच्या पृष्ठभागाच्या तपमानातील हा फरक, उष्णकटिबंधीय चक्रीवादळ ’उर्ध्व वायू प्रवण’चे (व्हर्टिकल विंड शेअर) प्रमाण कमी करू शकेल. हवामान बदलाने काही उष्णकटिबंधीय चक्रीवादळांशी निगडित पाऊस, वारा, आणि समुद्राची पातळी यामध्ये वाढ झाली आहे. ज्यामुळे चक्रीवादळे वाढली असल्याचे दिसतात. आता प्रत्येक वर्षी कमीत कमी चार तीव्र स्वरूपाची चक्रीवादळे येतील, यात काही शंका नाही. आता यासाठी तयारी ठेवणे गरजेचे आहे. जीवितहानीबरोबरच मालमत्तेचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होतो, हे लक्षात आले पाहिजे. ’ट्रॉपस्याक’सारख्या ’वेब बेस सॉफ्टवेअर’मार्फत एखाद्या जागेवर चक्रीवादळ किती व त्याचे स्वरूप कसे असेल याचा अंदाज बांधता येतो. अश्या ’वेब बेस सॉफ्टवेअर’चा वापर वाढवून वित्त व जीवितहानी नक्की कमी करता येईल.
     
    सौजन्य व आभार :  महाराष्ट्र टाइम्स
    अधिक माहितीसाठी पाहा -
     
     
     
    ’तौक्ते’ वादळानंतरचा किनारा
     
    *   ’तौक्ते’ वादळानंतर केरळ, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी खडकांचे भाग उघडे पडल्याचे वृत्त आहे. काही भागांतील खडकाळ सागरतट मंचांवर चिखलाचे जाड थर दिसले. रायगड किनार्‍यावर चिखलाचे गोळे, तर अनेक ठिकाणी खाडीत असलेल्या खारफुटीच्या झाडांवर डांबर चिकटल्याचे आढळले.
     
    *   गेल्या वर्षीच्या ’निसर्ग’ आणि आत्ताच्या ’तौक्ते’सारख्या उष्ण कटीबंधीय वादळांनंतर किनार्‍यावरील भूपर्यावरणावर मोठे परिणाम होतात. काही भागांत ते लगेचच दिसतात; पण अनेक ठिकाणी त्यासाठी काही काळ जावा लागतो. पुळणी, खाड्या, वाळूच्या टेकड्या आणि किनार्‍यालगतचा समुद्राचा पृष्ठभाग, त्याचे तापमान, तटीय प्रवाह आणि समुद्रतळाची जमीन आणि त्याचा उतार यावर होणार्‍या अशा परिणामांकडे मुळातच लक्ष जावे, अशी परिस्थिती वादळाच्या वेळी नसते. जीवित आणि वित्तहानी किती झाली हे प्राधान्याने पाहावे लागते आणि ते आवश्यकही असते; मात्र, किनार्‍याची अनेक बाबतीत झालेली हानी अभ्यासणेही गरजेचे असते. त्यामुळे वादळ संपल्यावर भविष्यात किनार्‍याची बदललेली पाारिस्थितिकी (इकॉलॉजी) स्थानिकांना किती उपयुक्त राहिली असेल, याचा अंदाज येतो.
     
    *   अशा वादळांनंतर किनारा, खाड्या आणि नजीकचा समुद्रतळ येथील गाळाचे प्रमाण वाढणे किंवा झीज होऊन गाळ कमी होणे किंवा इतरत्र वाहत जाणे, किनार्‍याची मोठ्या प्रमाणावर झीज होणे असे अनेक प्रमुख भूरूपीय बदल होतात. ते लगेचच किंवा काही दिवसांनी किनारपट्टीवर दृश्य रूप घेऊ लागतात.
     
    *   वर्ष २०१९च्या १० आणि ११ नोव्हेंबर या दिवशी अरबी समुद्रात आलेल्या आणि महाराष्ट्राच्या किनार्‍याला ताशी ८० किलोमीटर वेगाने तडाखा दिलेल्या ’फयान’ वादळाच्या वेळी आणि त्यानंतर काही दिवसांनी असेच परिणाम झाल्याचे नंतरच्या अभ्यासात लक्षात आले होते. वर लिहिलेल्या परिणामांपैकी काही परिणामांबरोबरच इतरही काही बदल झाले होते. वादळाच्या वेळी वेगवान वार्‍यांमुळे समुद्रपृष्ठाच्या तापमानात मोठी घट झाली होती. समुद्रतळ ढवळला गेल्यामुळे उथळ समुद्रतळावरील गाळ, अन्नद्रव्ये समुद्रपृष्ठावर आली होती आणि समुद्रातील हरितद्रव्यांत (क्लोरोफिल) मोठी वाढ झाली होती.
     
    सौजन्य व आभार :  महाराष्ट्र टाइम्स
    अधिक माहितीसाठी पाहा –
     
    धडा ‘तौक्ते’ वादळाचा
     
    *   आजकाल दरवर्षी वादळात मोठ्या प्रमाणात भूस्खलन आणि इतर प्रकारची हानी होणे ही पूर्व आणि पश्रि्चम किनारपट्टीवरील नित्याची बाब ठरत आहे. वैज्ञानिकदृष्ट्या ही सार्वत्रिक उष्मा आणि हवामान बदलाच्या वास्तवाची सूचक आहे. त्यामुळे तौक्ते वादळाने दिलेल्या शिकवणीचा बोध करून घेणे गरजेचे आहे. कारण पाच राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीचा विचार करता, भविष्यकालीन खबरदारीच्या दृष्टीने ते अत्यावश्यकदेखील आहे. अरबी समुद्रातील वादळांचा  विचार करता हे पाचव्या क्रमांकाचे सर्वाधिक संहारक वादळ होते, मुंबईपासून अवघ्या १४० किलोमीटरवरून हे वादळ सरकले हे बरे, अन्यथा महाआपत्ती ओढवली असती. २०१९ मध्ये डॉक्टर अ‍ॅडम सोबेल या शास्त्रज्ञाने केलेल्या एका अभ्यासानुसार, समुद्राची पातळी वाढल्यास वादळाच्या स्थितीत बदल घडून तिसर्‍या श्रेणीतील वादळाने मुंबईला फटका बसू शकतो. त्यांनी हवामान बदलाचे परिणाम म्हटले नसले तरी, धोका आहेच.
     
    *   पुण्याच्या भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेतील (आयआयटीएम)  शास्त्रज्ञ रॉक्सी मॅथ्यू कोल यांच्या मते, तौक्ते वादळासंदर्भातील एक वेगळी बाब म्हणजे किनार्‍यावर थडकल्यावरदेखील वादळी स्थिती पुढे १६ ते १८ तास टिकली. सागराकडून त्याला प्राप्त होणारी उष्णता आणि बाष्प मिळणारी प्रक्रिया सर्वसाधारणपणे वादळ किनार्‍यावर थडकल्यावर थांबते आणि मग ते मंदावत जाते. परंतु यावेळी ही प्रक्रिया घडली नाही. परिणामी, ते वादळ दीर्घकाळ त्याच वादळी स्थितीत राहिले.
     
    सौजन्य व आभार : दैनिक लोकमत
    अधिक माहितीसाठी पाहा -
     
     
    तौक्ते चक्रीवादळ
     
    *   ३ जून २०२० ला निसर्ग आणि १७ मे २०२१ ला तौक्ते. हे काय चालले आहे? हे आहेत एका बाजूने पृथ्वी अधिकाधिक गतीने तापत असण्याचे परिणाम, आणि दुसर्‍या बाजूने भारतात आज राबत असलेल्या विकृत विकास वासनेच्या वक्रगतीचे चक्राकार आविष्कार.
     
    *    आज जगाचे वातावरण सुमारे एक अंश सेल्सिअसने गरम झाले आहे. पाणी हवेपेक्षा सावकाश तापते. याशिवाय सागरात पाण्याचा प्रचंड साठा आहे. तरीही आता हा जलनिधी इतका तापला आहे, की त्यातून मोठे बदल होऊ लागले आहेत. गेली काही वर्षे अरबी समुद्रावर चक्रीवादळे येण्याचे प्रमाण वाढत होते, परंतु तीव्र चक्रीवादळे आपल्या किनार्‍यापासून दूर पश्रि्चमेकडे जात होती. गेल्या वर्षी प्रथमच ‘निसर्ग’ हे तीव्र चक्रीवादळ आपल्या पश्रि्चम किनार्‍यावर येऊन धडकले. याची पुढची पायरी म्हणजे तौक्ते हे अतितीव्र चक्रीवादळ आहे. परिणामी तौक्तेमुळे ‘निसर्ग’हूनही मोठ्या प्रमाणात जीविताची, मालमत्तेची हानी झाली आहे.
     
    सौजन्य व आभार : दैनिक सकाळ

     

Share this story

Total Shares : 1 Total Views : 159