अहिल्यादेवी होळकर

  • अहिल्यादेवी होळकर

    अहिल्यादेवी होळकर

    • 02 Jun 2021
    • Posted By : study circle
    • 244 Views
    • 1 Shares
     अहिल्यादेवी होळकर
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात समाजसुधारणाघटकावर अनेक प्रश्‍न विचारले जातात.  सदर लेखात ’कल्याणकारी राज्यकर्त्या अहिल्यादेवी’ यांच्याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
     
    सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास (महाराष्ट्राचा विशेष संदर्भ)
     
    १.३ प्रबोधन काळ :
     
    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    कल्याणकारी राज्यकर्त्या अहिल्यादेवी
     
    *   ३१ मे १७२५ साली अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या साठ-सत्तर घरांच्या गावी अहिल्यादेवींचा जन्म झाला. वडील माणकोजी शिंदे गावचे पाटील. अत्यंत सामान्य धनगर कुटुंबात जन्मलेल्या चुणचुणीत व बाणेदार अहिल्या मराठेशाहीतील इंदूरचे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या दृष्टीस पडली आणि त्यांनी अहिल्येस आपला एकुलता मुलगा खंडेरावासाठी मागणी घातली. अवघ्या आठव्या वर्षी अहिल्येचा विवाह शनिवारवाड्यावर थाटामाटात झाला. पुढे याच अहिल्येने मराठेशाहीच्या विस्तारासाठी सासरे सुभेदार मल्हाररावांसोबत ३३ वर्षे व त्यांच्या निधनानंतर तब्बल २५ वर्षे स्वतंत्रपणे कारभार केला.
     
    *   अहिल्यादेवींच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटे आली. त्यांनी पती खंडेराव, सासरे मल्हारराव, मुलगा मालेराव, मुलगी मुक्ता, जावई यशवंतराव फणसे, सासू गौतमाबाई यांचा मृत्यू उघड्या डोळ्यांनी पाहिला. प्रजेला पुत्र मानून, नातेवाईक समजून, सर्व सुखांचा त्याग करत त्यांनी आदर्श राज्य चालविले. १८ व्या शतकातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यादेवींनी केलेले सामाजिक कार्य आजही  पथदर्शक व प्रेरणादायी आहे.
     
    *   मल्हाररावांना छत्रपतींच्या गादीबद्दल अभिमान आणि आदर होता. ते स्वतःला गादीचा सेवक समजत. तोच वारसा अहिल्यादेवींनी त्यांच्या निधनानंतर पुढे चालविला. आपण राजे नाही तर मराठेशाहीचे विश्वस्त आहोत, या भावनेने त्या राज्यकारभार करीत. त्याकाळी सर्वाधिक श्रीमंत इंदोर संस्थान होते. तरी संस्थानातील पैशाचा त्यांनी अपव्यय केला नाही, भ्रष्टाचार होऊ दिला नाही. त्यांनी पती खंडेरावांनादेखील २५ मोहरा दंड ठोठावला व तो त्यांच्या खासगीतून वसूलही केला. इतक्या त्या आर्थिक शिस्तीच्या होत्या.
     
    *   अहिल्यादेवींनी मंदिरे, घाट, धर्मशाळाविहिरी बांधल्या, बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार केला. रस्ते  बांधले, पांथस्थांसाठी रस्त्याच्या कडेला झाडे लावली. तसेच मशिदी, दर्गे, चर्चही बांधले. खजराना महालात पीर नाहर सय्यद यांची मशीद आजही अहिल्यादेवींच्या सर्वधर्मसमभावाची साक्ष देत आहे. अहिल्यादेवी धार्मिक होत्या.परंतु; अंधश्रद्धाळू नव्हत्या. कर्मकांडांवर त्यांचा विश्वास नव्हता. कुटुंबीयांचे श्राद्धांचे पाणी त्यांनी स्वतःच सोडले. त्यांनी सती प्रथा, बालविवाहाला विरोध केला, विधवा विवाहाला मान्यता दिली. स्वतःची मुलगी मुक्ताचा विवाहही १८ वर्षांची झाल्यानंतरच केला. शुभकार्याची सुरुवात बळी देऊन करण्याऐवजी नारळ फोडून करण्यास सुरुवात केली. राज्यात हुंडाबंदी केली. रूढीनुसार दत्तकाचा विचार केला नाही.
     
    *   अहिल्यादेवींच्या राज्यात दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला होता. प्रजेचे चिंतीत चेहरे पाहून अहिल्यादेवींनी दरोडेखोरांचा जो कोणी बंदोबस्त करील त्याच्याशी माझी मुलगी मुक्ताचा विवाह लावला जाईल अशी दवंडी दिली, आणि दरोडेखोरांचा बंदोबस्त करणार्या भिल्ल यशवंतराव फणसे यांच्याशी मुक्ताचा विवाह केला.  त्या स्वत: प्रजेचे म्हणणे ऐकून घ्यायच्या. न्यायदानात त्यांनी कधी आप-परभाव ठेवला नाही. इंदोरचे सुभेदार तुकोजी होळकरांच्या मुलास त्यांनी तुरुंगात डांबले होते.
     
    *   जमलेला संपूर्ण महसूल त्या जनकल्याणासाठी खर्च करायच्या. स्वतःचा संपूर्ण खर्च खासगीतूनच करायचा, असा अहिल्यादेवींचा नियम होता. राज्यातील पक्ष्यांसाठी त्या शेतकर्यांकडून शेती पिके विकत घेत. वृक्षतोड करणार्यास त्यांनी शिक्षेची तरतूद केली व प्रत्येक शेतकर्याने २० झाडे लावलीच पाहिजेत, असा वटहुकूम काढला. शेतीला मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात जलसंवर्धन व जलवितरण विभाग स्थापन केला. राज्यातील मोकाट जनावरांसाठी चारा पाण्याची व्यवस्था केली. सर्व जातीधर्माच्या भुकेलेल्यांसाठी अन्नछत्रे उभारली. तेथे सर्व जातीधर्मीय एकत्र जेवत असत. 
     
    *   अहिल्यादेवी जेवढ्या प्रेमळ, दयाळू, कनवाळू होत्या तितक्याच कठोर, निर्भीड, हजरजबाबी होत्या. स्त्री राज्यकर्ती म्हणून राघोबादादा, महादजी शिंदे यांनी त्यांना भीती घालण्याचा प्रयत्न केला. सैन्यासह इंदोरवर आक्रमण करण्यासाठी आलेल्या राघोबादादांना त्यांनी, ‘माझी युद्धाची तयारी आहे, तुम्ही हरलात तर एका स्त्रीकडून हरलात म्हणून तुमची नामुष्की होईल असा निरोप पाठवला. त्यामुळे राघोबादादांना नमते घ्यावे लागले. ‘तुम्ही एक बाई आहात, आम्ही तुमच्या विरोधात उभे राहिलो तर तुमचे काय होईल असे महादजी शिंदेंनी म्हणताच, ‘याद राखा! ही अहिल्या अबला नाही, प्रेमाने आलात तर हत्तीवरून मिरवणूक काढेल आणि वेगळे काही केलात तर त्याच हत्तीच्या पायाखाली चिरडेन असे त्यांनी महादजींना बजावले.
     
    *   अठराव्या शतकात सलग २५ वर्षे राज्यकारभार करणार्या, स्त्रियांचे सैन्य उभारणार्या, रयतेसाठी राबणार्या अहिल्यादेवी शिवरायांच्या विचारांच्या वारसदार आहेत.
     
    सौजन्य व आभार : दैनिक पुढारी
     

Share this story

Total Shares : 1 Total Views : 244