आचार्य बाळशास्त्री जांभेकर

  • आचार्य बाळशास्त्री जांभेकर

    आचार्य बाळशास्त्री जांभेकर

    • 19 May 2021
    • Posted By : study circle
    • 2698 Views
    • 8 Shares
     आचार्य बाळशास्त्री जांभेकर
     
         महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात महाराष्ट्रातील समाजसुधारक या विषयावर अनेक प्रश्‍न विचारले जातात. ६ जानेवारी १८३२ रोजी मराठी वृत्तपत्रसृष्टीची सुरुवात ‘मुंबई दर्पण’ या वृत्तपत्राने करणार्‍या बाळशास्त्री जांभेकर यांची १८ मे २०२१ रोजी १७५ वी पुण्यतिथी पार पडली. त्यांचे विचार आणि कार्य, परीक्षेत विचारले गेलेले प्रश्‍न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल.
     
    सामान्य अध्ययन पेपर (१) : इतिहास व भूगोल
     
    *   राज्यसेवा (मुख्य) परीक्षेतील अभ्यासक्रम घटक :  
     
    १.१२ महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक - त्यांची विचारप्रणाली व कार्य -
     
    *   गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, न्या. म. गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षि कर्वे, राजर्षी शाहू महाराज, महर्षि विठ्ठल शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, पंडिता रमाबाई, दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख, न्या. का. त्र्यं, तेलंग, डॉ. भाऊ दाजी लाड, आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेठ, गोपाळ कृष्ण गोखले, काळकर्ते शिवराम महादेव परांजपे, विष्णूशास्त्री चिपळूणकर, धो. के. कर्वे, र. धो. कर्वे, विनोबा भावे, विनायक दा. सावरकर, अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नाना पाटील, लहूजी साळवे, कर्मवीर भाऊराव पाटील, विष्णुबुवा ब्रह्मचारी, सेनापती बाबट, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाबा आमटे, संत गाडगेबाबा.
     
    (एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात  नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व  चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)
     
    आचार्य बाळशास्त्री जांभेकर (१८१२-४६)
     
         विद्वान प्राध्यापक व पुरातत्त्व संशोधक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी अवघ्या ३४ वर्षांतील आयुष्यात उत्तुंग कामगिरी केली. ‘दर्पण’ साप्ताहिक व ‘दिग्दर्शन’ मासिकाचे ते संस्थापक होते. शिक्षण, पुरातत्त्वविद्या, ग्रंथसमीक्षा अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपली छाप उमटवली. वसतिगृह आणि सार्वजनिक वाचनालये आदींची पहिल्यांदा संस्थात्मक उभारणी त्यांनी केली.
     
    •*   ६ जानेवारी रोजी दर्पण वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला, हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो.
     
    *•   बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस हा महाराष्ट्र सरकारतर्फे ’दर्पण दिन’ अथवा ’वृत्तपत्र दिन’ म्हणून साजरा होतो.
     
    *   आचार्य बाळशास्त्री जांभेकरांबद्दल न्यायमूर्ती ना. ग. चंदावरकर यांनी म्हटले आहे की, ”बाळशास्त्री अव्वल इंग्रजी अंमलातील एक थोर विद्वान तसेच ज्ञानाच्या विविध क्षेत्रात लिलया संचार करणारे पंडित होते.
     
    *   बाळशास्त्री जांभेकरांबद्दल आचार्य प्र. के. अत्रे यांनी खूपच महत्त्वपूर्ण अशी टिपणी केली आहे. ते लिहितात की, ”बाळशास्त्री जांभेकर हे बोलके नव्हे तर कर्ते सुधारक होते. केवळ प्राध्यापक म्हणून अध्ययनच न करता बाळशास्त्रींनी आपल्या दर्पण मधून सामाजिक सुधारणेवर भर दिला. बाळशास्त्री जांभेकर हे आद्य मराठी पत्रकार आणि आद्य समाजसुधारक होते. त्यांच्यासोबत त्यांना आद्य प्राध्यापकही संबोधिले जाते.
     
    बाळशास्त्री जांभेकरांचे जीवनचरित्र
     
    •*•   (६ जानेवारी) २० फेब्रुवारी १८१२ - बाळशास्त्रींचा जन्म पोंभुर्ले (देवगड तालुका, सिंधुदुर्ग) येथे झाला. त्यांची नक्की जन्मतारिख उपलब्ध नसली तरी २० फेब्रुवारी १८३० साली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत नोकरीचा अजर् करताना आपलं वय १७ असल्याचे त्यांनी नमूद केलं होतं. त्यांचे वडील गंगाधरशास्त्री हे पंडित तर आई सगुणाबाई धार्मिक आणि धर्मपारायणवादी होती. त्यांनी बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. त्यांचे वडील गंगाधरशास्त्री त्या काळचे एक नावाजलेले पुराणिक होते. त्यांची धर्मनिष्ठा, उदारपणा आणि संस्कृत पांडित्य यामुळे लोक त्यांचा खूप आदर करत असत. सावंतवाडीमध्ये त्यांचे अनेक भाऊबंद होते. उतारवयात त्यांचे वास्तव्य प्रामुख्याने पोंभुर्ले- राजापूर येथे असे. ‘भारत-भागवत’ इत्यादी ग्रंथांचे पुराण सांगण्यासाठी त्यांची परिसरात कीर्ती होती.  
     
    *•   १८१८ चा काळ हा पेशवाईच्या अस्ताचा होता. मुंबईचा हा काळही परिवर्तनाचा होता. मुंबई इलाख्याची सर्व प्रशासकीय सूत्रे पहिला ब्रिटिश गव्हर्नर माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन याच्याकडे आली होती. अतिशय दूरदर्शी, ब्रिटिश साम्राज्यवादाबरोबरच स्थानिक प्रजेचे हित जपणारा इत्यादी विविध गुणांचे मिश्रण अशीच त्याची ओळख होती. पेशवाईचा अस्त झाल्यामुळे राजधानी म्हणून पुण्याचे महत्त्व संपुष्टात आले होते आणि मुंबईचे महत्त्व वाढू लागले होते. परिणामी पुण्यातील अनेक विद्वान व महत्त्वाकांक्षी तरुण मुंबईकडे स्थलांतर करू लागले होते. ब्रिटिश राजवटीशी संबंध ठेवायचे असतील तर इंग्रजीतून शिक्षण घेतले पाहिजे, याची जाणीव स्थानिक तरुणांना होऊ लागली होती आणि इंग्रजांनाही दुय्यम दर्जाच्या; पण इंग्रजी जाणणार्‍या नोकरवर्गाची गरज होती.
     
    •*•   १८२० - वयाच्या आठव्या वर्षी  बाळशास्त्री मराठी लेखन, वाचन, व्यावहारिक गणित, तोंडी हिशेब, रामदास, तुकाराम, वामन, मोरोपंत इत्यादी प्रसिद्ध कवींच्या निवडक कविता, रामायण, महाभारत आणि इतिहासामधील महापुरुषांच्या चरित्रकथा, मराठ्यांच्या इतिहासातील काही बखरी इत्यादी अभ्यासात पारंगत झाले होते. जांभेकरांनी वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत वेदपठण, संस्कृत स्तोत्रे आणि भगवद्गीता यांच्या पाठांतराबरोबरच अमरकोश, लघुकौमुदी, पंचमहाकाव्ये इत्यादी संस्कृत अध्ययन  पूर्ण केले. अभ्यासाबरोबरच नियमित व्यायाम व सूर्यनमस्कार यामुळे त्यांची शरीरसंपदा चांगली होती.
     
    •*•   १८२४ - त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले. त्यांच्या भगिनीचे म्हणजे लाडूबाईचे यजमान रामशास्त्री जानवेकर हे (द बॉम्बे नेटिव्ह स्कूल सोसायटी) शाळेचे तपासनीस होते. त्यांच्याकडे बाळशास्त्रींची निवास व्यवस्था झाली. मुंबईस येऊन जांभेकर सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांजकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. त्यांची अध्यापक मंडळी कौतुकाने त्यांना ‘बाळबृहस्पती’ म्हणून संबोधत.
     
    *•   १८२५ - विद्यार्थिदशेत असतानाच गणिताचे अध्यापक म्हणून दरमहा रुपये १५ मानधनावर ते काम करू लागले.
     
    *•   १८२७ - ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमावले. अल्पावधीतच त्यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला होता. बापू छत्रे यांनी त्यांच्या निवृत्त जागी बाळशास्त्रींची नेमणूक करण्यास सांगितले.
     
    *•   १८३० ते १८४६ या अवघ्या १६ वर्षांच्या काळात त्यांनी प्रचंड असे काम केले.
     
    *•   २० फेब्रुवारी १८३० - नेटिव्ह सेक्रेटरीच्या पदासाठी बाळशास्त्रीनी सोसायटीचे सेक्रेटरी कॅप्टन जर्व्हिस यांच्या नावे  इंग्रजीमध्ये पत्र लिहिले. मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या भाषांचे, त्याचबरोबर गुजराती, बंगाली व फार्सी या भाषांचेही काही प्रमाणात ज्ञान प्राप्त झाले. त्यांनी अंकगणित, बीजगणित, भूमिती, महत्त्वमापन, लॉगरिथम्स इत्यादी विषयांमध्ये प्रावीण्य मिळवले. अर्जात आपली ही सारी गुणवत्ता त्यांनी लिहिली होती.
     
    *•  १८३० मार्च - सोसायटीचे नवीन सेक्रेटरी रॉबर्ट कॉटन मनी (मुंबई सरकारचे पर्शियन सेक्रेटरी) यांनी बाळशास्त्री अल्पवयीन असल्याने, त्यांची  प्रथम ‘डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरी’ म्हणून दरमहा ५० रुपयांवर नेमणूक केली.
     
    *•  ६ जानेवारी १८३२ - जांभेकरांनी ‘द बॉम्बे दर्पण’ या नावाचे पश्‍चिम भारतात पहिले अँग्लो-मराठी नियतकालिक सुरू केले. मराठी वृत्तपत्रसृष्टीची सुरुवात त्यांनी मुंबईच्या काळबादेवी भागातून केली. भाऊ महाजन यांच्या सहकार्याने मराठी, तर स्वत: बाळशास्त्री इंग्रजी मजकुराची बाजू ’दर्पण’ साठी सांभाळत. त्यामुळे ’दर्पण’ तील मजकुराचा दर्जा उच्च स्वरुपाचा होता.
     
    *•  १८३२  मार्च - बाळशास्त्री जांभेकरांची हुषारी व कर्तृत्व लक्षात येताच १०० रुपये मासिक वेतनावर बापू छत्रे यांच्या जागी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत ‘नेटिव्ह सेक्रेटरी’ म्हणून नेमणूक झाली.  बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या त्या काळातील कारभारी (कार्यकारी) मंडळामध्ये मुंबईतील उच्च युरोपीय अधिकारी, विद्वान पारशी, हिंदू, मुसलमान इत्यादी सद्गृहस्थांचा समावेश होता.
     
    *•  ८ जानेवारी १८३३ - पासून अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक म्हणून त्यांनी २० महिने उत्तम काम केले. आपल्या सौजन्यपूर्ण व विनयी स्वभावामुळे ते सर्वांना प्रिय झाले होते, असा उल्लेख अक्कलकोटचे पोलिटिकल एजंट कॅप्टन जेम्सन यांनी केला होता. १८३२ मध्ये बाळशास्त्री यांच्या जीवनात एक महत्त्वाची घटना घडली. अक्कलकोटचे राजेभोसले हे सातारकर छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचे मांडलिक होते. अक्कलकोटचे राजेभोसले यांचे अल्पवयीन राजपुत्र शहाजी भोसले यांना चांगले शिक्षण देण्याकरता सातारच्या छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी आपल्या रेसिडेंटार्फत मुंबई सरकारकडे एका हुषार शिक्षकाची मागणी केली होती. मुंबई सरकारने त्या जागी दरमहा १२० रुपये वेतनावर बाळशास्त्रींची नेमणूक केली. त्यानुसार आपल्या मूळ पदावर परत येण्याचा हक्क राखून बाळशास्त्री १३ डिसेंबर १८३२ रोजी सातार्‍यास श्रीमंत प्रतापसिंहांच्या पुढे रुजू झाले. त्यावेळी दरबारचे रेसिडेंट कर्नल लॉडविक यांनी बाळशास्त्री यांना श्रीमंतांच्या समक्ष स्वकर्तव्याची जाणीव करून दिली.
     
    *•  १८३४ -  मुंबईत ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’च्या स्थापनेच्या कार्यात या सोसायटीचे सदस्य नसतानाही त्यांनी खूप मदत केली. भारतीय विद्वानांना या सोसायटीचे सदस्य होता येत नव्हते.
     
    *•  १८३४ - एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय साहाय्यक प्रोफेसर या पदावर जांभेकरांची मासिक १५० रुपये पगारावर नियुक्ती झाली. नवीन पदावर हजर होण्यासाठी त्यांनी अक्कलकोट सोडले.
     
    *•  १८३५ - एल्फिन्स्टन कॉलेजची मुंबईमध्ये स्थापना झाल्यानंतर अधिव्याख्यात्यांची सोय टाऊन हॉलच्या इमारतीमध्ये केली होती.  त्यावेळी माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी प्रा. ए. बी. ऑर्लेबर  यांची गणित व विज्ञान शाखेचे मुख्य अध्यापक म्हणून, तर जॉन हॉर्कनेस यांची इंग्रजी वाङ्मय आणि तत्त्वज्ञान या विषयासाठी प्रोफेसर म्हणून, विलायतेतून नियुक्ती केली होती.  ततपूर्वी १८२७ मध्ये गव्हर्नर लॉर्ड माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन सेवानिवृत्त होऊन, विलायतेस गेले. त्यावेळी त्यांच्या स्मरणार्थ मुंबई शिक्षा मंडळीने २.५० लाख रुपये गोळा करून सार्वजनिक स्मारक म्हणून ‘एल्फिन्स्टन स्कूल’ सुरू केले होते.
     
    *•  १८३८ - ‘बॉम्बे टाइम्स’ हे वृत्तपत्र दर्पणनंतर सहा वर्षांनी सुरू झाले. परंतु त्यांची वाचकसंख्या ही ५०० च्या पुढे गेली नाही. यावरून दर्पणची लोकप्रियता आपल्या लक्षात येते.
     
    *•  १ मे १८४० - त्यांनी ‘दिग्दर्शन’ हे पहिले मराठी मासिक मुंबईतून सुरू केले.
     
    *•  २६ जून  १८४० - दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.
     
    *•  २८ सप्टेंबर १८४० - मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर जेम्स कार्नाक यांनी, त्यांचा जस्टीस ऑफ पीस असा किताब देऊन गौरव केला.  त्या काळात हा मान मिळवणारे ते एकमेव होते.  जे. पी. ना सुप्रीम कोर्टाच्या ग्रँड ज्युरींमध्ये बसण्याचा अधिकार प्राप्त होत असे. या नात्यानेही बाळशास्त्री यांनी जे प्रशंसनीय कार्य केले त्याचा अत्यंत हार्दिक व गौरवास्पद निर्देश त्या कोर्टाचे न्यायमूर्ती सर अर्स्किन पेरी यांनी त्यांच्या निधनानंतर भर कोर्टात केलेला आढळतो.
     
    *•  १८४० - मुंबईमध्ये ‘बॉम्बे जिऑग्राफिकल सोसायटी’ची स्थापना झाली. ती लंडनमधील रॉयल जिऑग्राफिकल सोसायटीची शाखा होती. बाळशास्त्री यांची त्या सोसायटीचे सदस्य म्हणून नेमणूक झाली. सोसायटीच्या कायम १२ सदस्यांपैकी ते एक होते. १८४२ ते १८४६ या काळात त्यांची प्रत्येक वर्षी सोसायटीचे अधिकारी म्हणून निवड झाली होती.
     
    *•  १८४१ पर्यंत एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर पदावर काम करणारे बाळशास्त्री हे पहिलेच व एकमेव भारतीय होते.  भारतामधील त्या काळातील गणित आणि भविष्यशास्त्राचे नामवंत प्रोफेसर ऑर्लेबर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे भाग्य त्यांना लाभले. कला आणि विज्ञान शाखेधील विद्यार्थ्यांना शिकवण्याची त्यांची क्षमता वाखाणण्याजोगी होती.
     
    *•  १८४१ मध्ये एशियाटिक सोसायटीचे नियतकालिक प्रकाशित होण्यास सुरुवात झाली आणि या नियतकालिकाच्या एकूण अकरा अंकांपैकी त्यांच्या आयुष्याच्या कालावधीतील आठ अंकांमध्ये जांभेकराांनी संशोधनपर लेख प्रसिद्ध केले. बाळशास्त्री यांनी या जर्नलमधून भारतीय कोरीव लेखांविषयी मौलिक लेखन केले आणि बोधवाक्यावरील संशोधन पेपरचे वाचनही केले. त्या काळात अखिल भारतात अशा प्रकारचे लेख लिहून प्रसिद्ध करणारे ते एकटे एतद्देशीय पंडित होते. परिणामी खर्‍या अर्थाने बाळशास्त्री यांना ‘भारतीय ऐतिहासिक संशोधनाचे’ जनक संबोधणे उचित होईल.
     
    *•  १८४२ एप्रिल पासून प्रोफेसर एबी ऑर्लेबर यांच्या अनुपस्थितीत बाळशास्त्री यांनी गणिताचे पूर्ण वेळ प्रोफेसर म्हणून काम केले. प्रोफेसर बाळशास्त्री यांचे गणितातील प्रभुत्व आणि कौशल्य त्यांच्या वरिष्ठ सहकार्‍यांइतकेच उच्च दर्जाचे होते.
     
    *•  १८४१ ते १८४५ या काळात दक्षिण मराठी राज्ये आणि कोकण प्रांतातील मराठी शाळा त्यांच्या आधिपत्याखाली होत्या. प्रोफेसरपदाच्या कार्यकाळात त्यांना मुंबई प्रांताचे सुपरिंटेंडंट म्हणून मराठी शाळांची तपासणी करण्याचे कामही देण्यात आले होते.
     
    *•  १८४५ - ज्ञानेश्‍वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी काढली.  त्यांनी बालव्याकरण, भूगोलविद्या, सारसंग्रह आणि नीतीकथा हे चार ग्रंथ लिहिले.
     
    *•  १८४५ - ते मुंबई राज्याच्या शिक्षण विभागाचे संचालक झाले. त्यांनी ’शून्यलब्धी आणि मूलपरिणती गणित’, ’इंग्लंड देशाची बखर’ यांसारखे ग्रंथ लिहिले.
     
    *•  १८४५ मध्ये स्थापन झालेल्या ‘बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी’चे ते एक संस्थापक सदस्य होते. त्यांनी नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटीची स्थापना केली आणि ते स्वत: संस्थेचे अध्यक्ष झाले.
     
    *•  १७ मे १८४६ - त्यांचे अल्पावधीच्या आजारानंतर मुंबईत निधन झाले.
     
    *•  आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी अनेक भूमिका उत्तमरीत्या बजावल्या -
    १)  ते पहिले मराठी ग्रंथसमीक्षक होते.
    २)  मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयातील पहिले मराठी प्रोफेसर होते.
    ३)  ते एशियाटिक सोसायटीमधील जर्नल्सचे पहिले भारतीय लेखक होते.
    ४)  ते ‘ज्ञानेश्‍वरी’ ग्रंथाचे शिळा प्रेसवरील पहिले प्रकाशक होते.
    ५)  त्यांना ‘आधुनिक महाराष्ट्राचे पहिले प्रबोधनकार’ म्हंटले जाते.
    ६)  ते कुलाबा वेधशाळेचे संचालक होते.
    ७)  ते तत्कालीन मुंबई प्रांत सरकार दरबारचे मुत्सद्दी सल्लागार होते.
    ८)  त्यांनी अनेक पाठ्यपुस्तके व १६ ग्रंथांचे लेखक व उत्तम भाषांतरकार होते.
    ९)  ते हिंदू धर्म चिकित्सक होते.
     
    *•   बहुभाषी आचार्य बाळशास्त्री जांभेकर -
    १)  संस्कृत, इंग्रजी, लॅटिन, ग्रीक, फ्रेंच, बंगाली, गुजराथी, हिंदुस्थानी, कन्नड, तेलगू आणि पारशी इत्यादी विविध भाषांचे ज्ञान तसेच गणित, ज्योतिष, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, वनस्पतिशास्त्र, नीतिशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र आणि न्यायशास्त्र या विषयांचीही बाळशास्त्री यांना चांगली माहिती होती.
    २)  बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या दहा भाषांचे ज्ञान होते. फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा सन्मान झाला होता.
    ३)  जांभेकरांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांच्यावर शोधनिबंध लिहिले.
    ४)  मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्‍वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हाती दिली.
    ५)  त्यांच्यात पांडित्य आणि अध्यापनपटुत्व या गुणांचा मिलाफ होता.
    ६)  गणित व ज्योतिष यांतही ते पारंगत असल्यामुळे त्यांची कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती. शिवाय त्यांना रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र या विषयांचे उत्तम ज्ञान होते.
    ७)  प्राचीन भारतीय शिलालेख व ताम्रपट याचे संशोधन करून त्यावर त्यांनी विद्वत्तापूर्ण लेखन केले. यासंबंधीचे त्यांचे शोधनिबंध रॉयल एशियाटिक सोसायटीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले होते 
     
    *•   मुंबई इलाख्याच्या शिक्षण विभागाचे अधिकारी -
    १)  अनेक विषयांचे ज्ञान आत्मसात केलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांची तत्कालीन सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण विभागाचे अधिकारी म्हणून नेमणूक केली. या काळामध्ये बाळशास्त्रींनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. शिक्षणाच्या संदर्भामध्ये मोलाची भूमिका बजावली.
    २)  महाराष्ट्रात शिक्षण प्रसाराचे सुरुवातीच्या अवस्थेत निरनिराळ्या विषयांवरील अभ्यासासाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचे अतिशय कठीण असे काम या काळामध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी केले.
    ३)  इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र अशा विविध विषयांवरील मराठी भाषेतील पहिली पाठ्यपुस्तके त्यांनी लिहिली.
    ४)  बाळशास्त्री वांग्मय व विज्ञान या दोन्ही शाखांमध्ये निष्णात होते. गणित व ज्योतिष शास्त्र या विषयातही त्यांचा अधिकार मोठा होता.
    ५)  त्यांनी मराठी भाषेत शून्यलब्धी हे पहिले पुस्तक लिहिले.
     
    *•  आचार्य बाळशास्त्री  जांभेकरांनी अनेक मानाच्या जागांवर त्यांनी काम केले होते-
    १)  ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’चे नेटिव्ह सेक्रेटरी
    २)  अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक
    ३)  एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये पहिले असिस्टंट प्रोफसर
    ४)  शाळा तपासनीस
    ५)  अध्यापनशाळेचे (नॉर्मल स्कूल) संचालक
    ६)  जस्टिस ऑफ पीस (१८४०)
     
    *•   १८४४ च्या शिक्षा मंडळाच्या अहवालामध्ये  प्रोफेसर ऑर्लेबर यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या अध्यापनाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत-
         “आमच्या सोसायटीचा भोगीलाल प्राणवल्लभदास हा सर्वसामान्य बुद्धिमत्तेचा विद्यार्थी फलज्योतिष शास्त्राची अतिशय अनिश्‍चितता असलेली परीक्षा उत्तीर्ण झाला. हायमरच्या म्हणण्याप्रमाणे ही फक्त दुसरी घटना होती की आपले विद्यार्थी गणितशास्त्रामध्ये फार पुढे आहेत. आणखी दोन विद्यार्थी आहेत ते म्हणजे आत्माराम पांडुरंग आणि दादाभाई नवरोजी जे ‘इंटिग्रल कॅलक्युलस’ आणि ‘अ‍ॅनालिटिकल जॉमेट्री’ या विषयांची परीक्षा समाधानकारकरीत्या उत्तीर्ण झाले. या सर्व विद्यार्थ्यांनी बाळशास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यास केला होता. ‘डिफ्रन्शियल कॅलक्युलस’ या विषयाच्या वर्गामध्ये सात विद्यार्थी होते आणि त्यांची प्रगतीसुद्धा चांगली होती. ट्रिग्नॉमेट्री (त्रिकोणमिती) या विषयाचे नऊ विद्यार्थी होते. त्या सर्वांना भूमितीय सूत्रांचा उपयोग करता येत होता. मी इंग्लंडध्ये असताना माझ्या अनुपस्थितीत बाळशास्त्री यांनी ज्या पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांची प्रगती केली त्याबद्दल, मी पूर्ण समाधानी आहे.
     
       आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची पत्रकारिता
     
    १)  मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असताना व समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. पारतंत्र्याने ग्रासलेला देश, याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्र्‍य, भाकड समजुती यामुळे एतद्देशीय समाज कसा व्याधिग्रस्त झाला आहे, या विचाराने ते चिंता करीत. केवळ महाविद्यालयात शिकवून उपयोग नाही; तर संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजेत. ते करायचे असेल तर समाजाचेच प्रबोधन करावे लागेल, असे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी वृत्तपत्र काढावे, असे त्यांना वाटू लागले. या जाणिवेतून आपले सहयोगी गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.
     
    २)  वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता.
     
    *•   दर्पण -
    १)  ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला. वृत्तपत्राची किंमत १ रुपया होती. . दर्पणची तिमाही वर्गणी ६ रुपये होती. १८३२ वर्षअखेरीपर्यंत ’दर्पण’ विकत घेणार्‍यांची संख्या ३०० पर्यंत गेली होती.
    २)  बाळशास्त्री जांभेकरांनी ६ जानेवारी १८३२ पासून २६ जून १८४० पर्यंत म्हणजे जवळपास साडेआठ वर्षे साप्ताहिक ‘दर्पण’चे संपादन केले.
    ३)  इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषांत प्रकाशित होणार्‍या या वृत्तपत्राच्या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक इंग्रजीत असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी होता.
    ४)  या वर्तमानपत्राचा उद्देश हा स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि लोकांना त्या देशांची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्र विचार करता व्हावा हा होता.
    ५)  दर्पण हे मासिक इंग्रजी विद्येचा मराठी सार सांगणारे ठरले. दर्पणच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण व मनोरंजन यांचा समन्वय साधला. सुरुवातीचा काही काळ ‘दर्पण’ हे एक पाक्षिक म्हणून प्रकाशित होत असे. परंतु वाचकांची मागणी आणि विनंतीवरून ते साप्ताहिक करण्यात आले.
    ६)  ४ मे १८३२ पासून साप्ताहिक म्हणून प्रकाशित होऊ लागले. दर्पणचे पहिले तीन अंक मेसेंजर प्रेसमधून प्रकाशित झाले.
    ७)  १७ फेब्रुवारी १८३२ पासून ते ‘कुरिअर’ प्रेसमधून छापून प्रकाशित होत होते. ही व्यवस्था पाच वर्षांपर्यंत सुरू होती. नंतर बाळशास्त्री यांनी स्वत:चा प्रेस काढला आणि तिथून दर्पण प्रकाशित होऊ लागले. दर्पणच्या प्रकाशनामुळे स्थानिक लोकांमध्ये सुधारणा होईल, या हेतूने तत्कालीन मुंबई सरकारने या नियतकालिकाच्या प्रकाशनास ५० रुपये करामध्ये सवलत दिली होती.
    ८)  जॉन विल्सन यांनी मुंबईत ख्रिश्‍चन धर्मप्रसार करण्यासाठी ‘ओरिएंटल ख्रिश्‍चन स्पेक्टेटर’ हे नियतकालिक सुरू केले. १८३३ च्या स्पेक्टेटरच्या अंकामध्ये ते दर्पणविषयी लिहितात, “दर्पण हे मराठी आणि इंग्रजीमधून प्रकाशित होणारे आणि जनाधार असलेले उपयुक्त वृत्तपत्र आहे. त्यामधून प्रकाशित होणारे काही निवडक लेख हे लोकांसाठी माहिती देणारे व त्यांच्या ज्ञानाची कक्षा रुंदावण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत.  
     
    *•  दिग्दर्शन -
    १)  १८४० साली दर्पण वृत्तपत्रासोबत मराठीतले पहिले मासिक ’दिग्दर्शन’ जांभेकरांनी सुरू केले.
    २)  या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी ५ वर्षे काम पाहिले.
    ३)  ’दिग्दर्शन’मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहास याविषयांवरील लेख व नकाशे आकृत्यांसह प्रकाशित करत.  भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी त्यांना या कामी मदत करत. या अभिनव माध्यमातून त्यांनी लोकांची आकलनक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला.
     
    आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे समाजकार्य
     
    १)  सार्वजनिक गंथालयांचे महत्त्व ओळखून ’बाँबे नेटिव्ह जनरल लायब्ररी’ या ग्रंथालयाची स्थापना जांभेकरांनी केली.
    २)  ’एशियाटिक सोसायटी’च्या त्रैमासिकात शोधनिबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते.
    ३)  १८४५ साली ज्ञानेश्‍वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी काढली.
    ४)  मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात ते हिंदुस्तानी भाषेचे अध्यापन करत.
    ५)  त्यांच्या प्रकाशित साहित्यकृतींमध्ये ’नीतिकथा’, ’इंग्लंड देशाची बखर’, ’इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप’, ’हिंदुस्थानचा इतिहास’, ’शून्यलब्धिगणित’ या ग्रंथांचा समावेश आहे.
    ६)  विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी बाळशास्त्रींनी ‘नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी’ची स्थापना केली.
    ७)  यातून पुढे ‘स्ट्युडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड यांसारखे दिग्गज कार्यरत झाले.
    ८)  विधवा विवाहासाठीचा शास्त्रीय आधार शोधून काढण्याची कामगिरी त्यांनी केली. त्यासाठी गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून त्यांनी त्याविषयीचा एक ग्रंथ लिहून घेतला.
    ९)  ख्रिस्त्याच्या घरात राहिल्यामुळे वाळीत टाकल्या गेलेल्या एका हिंदू मुलास (श्रीपतशास्त्री शेषाद्री प्रकरण) त्यांनी तत्कालीन सनातन्यांच्या विरोधास न जुमानता शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात (शुद्धी चळवळ) घेण्याची व्यवस्था केली.
     
    आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची विचारप्रणाली
     
    १)  जांभेकर यांनी तत्कालीन प्रतिकूल काळाच्याही पुढे जाऊन हिंदू धर्मातील जुन्या कालबाह्य रूढी, परंपरा, धर्मांध शक्तींना छेद देऊन समाजसुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. हे काम अवघड होते. राजा राममोहन रॉय यांनी पश्‍चिम बंगालमध्ये सतीची चाल बंद करणे, हिंदू विधवांचे केशकर्तन बंद करणे, विधवांसहित सर्वच स्त्रियांना वेदाभ्यास व अन्य शिक्षण देणे, इत्यादी ज्या सुधारणा केल्या होत्या, त्याचा आदर्श जांभेकरांनी आपल्या पत्रकारिता व अन्य कार्यातून जोपासला होता. ब्रिटिश राजवटीच्या प्रतिकूल काळात एक मराठी माणूस मुंबईतून मराठी वृत्तपत्रसृष्टीची मुहूर्तमेढ रोवतो, ही खूप मोठी कामगिरी होती.
     
    २)  सामाजिक व धार्मिक सुधारणांच्या बाबतीत बाळशास्त्री यांची वृत्ती ही पुरोगामी विचारांची राहिलेली आहे भारतीय समाजातील व हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथा बंद पडाव्यात किमान त्यांना आळा बसावा अशी त्यांची भूमिका होती त्यामुळे विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण यांचा त्यांनी पुरस्कार केला. त्यांचे विचार प्रगमनशील होते.  जांभेकरांनी जीवनवादाचा, सुधारणावादाचा किंवा परंपरानिष्ठ परिवर्तन वादाचा पाया घातला.
     
    ३)  ‘ दर्पण’ हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोकशिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला.
     
    ४)  त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्नाचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचा सातत्याने पुरस्कार केला. बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लिखाण केले. त्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर पुढे विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले.
     
    ५)  ज्ञान, बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत. उपयोजित ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा, ही त्यांची तळमळ होती.
     
    ६)  देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे, तसेच सामाजिक प्रश्‍नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे, याची जाणीव त्यांना झाली होती.  विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते. थोडक्यात, आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज त्यांना दोनशे वर्षांपूर्वीच अपेक्षित होता. त्या अर्थाने ते द्रष्टे समाजसुधारक होते.
     
    ७)  १८१८ साली मुंबई इलाख्यात इंग्रजी सत्ता स्थापन झाल्यावर अनेक लोकोत्तर माणसे स्वकर्तृत्वावर मोठी झाली. त्यांनी महाराष्ट्राच्या प्रबोधनामध्ये मोठी भर घातली त्यामध्ये बाळशास्त्री जांभेकर अग्रणी होते. त्यांना ‘पश्‍चिम भारतातील नवयुगप्रवर्तक आणि आधुनिक महाराष्ट्राचे जनक’ असे संबोधले जाते. बंगालमध्ये समाजप्रबोधनाची सुरुवात करण्याचा मान राजा राममोहन रॉय यांना दिला जातो, तोच मान महाराष्ट्राच्या बाबतीत बाळशास्त्रींना द्यावा लागेल. १८१२ ते १८४६ या अल्पकाळातील बाळशास्त्रींचे अनेक क्षेत्रांमधील कार्य थक्क करणारे होते.
     
    बाळशास्त्री जांभेकरांच्या मुंबईतील पाऊलखुणा
     
    १)  एल्फिन्स्टन महाविद्यालय - येथे पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली.
    २)  कुलाबा वेधशाळा - या वेधशाळेचे ते पहिले मराठी संचालक होते.
    ३)  टाउन हॉलमधील सेंट्रल लायब्ररी -  येथे ते लेखन, वाचन, संशोधन करीत असत.
    ४)  एशियाटिक सोसायटी - सोसायटीच्या आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांनी भारतीय पुरातत्त्वातील अनेक ताम्रपट, शिलालेख, वीरगळ इत्यादींचा अभ्यास करून ९० पानांचा इतिहास लिहिला आहे.
    ५)  मुंबई विद्यापीठ - या विद्यापीठात ‘आचार्य बाळ गंगाधरशास्त्री जांभेकर प्रोफेसर ऑफ मॅथेमॅटिक्स’ असे विद्यासन करण्याचा निर्णय १९६२ मध्ये झाला होता. त्यांचे चरित्रकार ग. गं. जांभेकर यांनी त्यासाठी अथक पाठपुरावा केला होता. पण ते सध्या सुरू नाही.
    ६)  काळबादेवी - या भागात  त्यांनी दर्पण व दिग्दर्शन वृत्तपत्रे सुरु केली. 
     
    *•   १६ जुलै १८४६ - बाळशास्त्रींच्या मृत्यूनंतर त्यांचा इष्टमित्र या नावाने ‘मुंबईचा चाबूक’ या वृत्तपत्रात बाळशास्त्री यांच्या चिरकालीन स्मारकासंबंधी सर्वप्रथम मागणी केली गेली होती.
     
    *•   १८५१ - ’हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास’ हा ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला. एलिफिन्स्टनकृत हिंदुस्थानांच्या आधारे त्यांनी इतिहास रचला होता.
     
    *•   २२ मे १९०९ - बाळशास्त्री यांची विद्वत्ता आणि व्यासंगी अध्यापन यांची छाप सर्व विद्यार्थ्यांवर पडत असे. त्यांचे शिष्य आणि नंतर भारताचे ग्रँडफादर म्हणून ज्यांची ख्याती होती त्या  दादाभाई नवरोजी यांनी वेसावा (मुंबई) येथून लिहिलेल्या एका पत्रामध्ये सुमारे ७० वर्षांनंतर आपल्या थोर गुरुजींसंबंधीची स्मृती अविस्मरणीय शब्दांमध्ये व्यक्त केली आहे. आपले गुरू म्हणूनच काय तो मी त्यांस ओळखतो आणि खरोखरच ते अतिशय बुद्धिमान, चतुर, सालस व सुज्ञ गुरू होते. आपल्या शिष्यांवर त्यांचे प्रेम असून त्यांच्याविषयी त्यांना कळकळ होती. आम्हांला त्यांच्या अष्टपैलू विद्वत्तेइतकाच त्यांच्या एकंदर चारित्र्याविषयी थोर आदर व कौतुक वाटे. व्यक्तिश: माझ्यावर त्यांचा अधिक लोभ असे.
     
    *•   १९८५ - महाराष्ट्रामधील पत्रकारांमार्फत बाळशास्त्री यांच्या जन्मगावी पोंभुर्ले येथे पहिल्यांदाच पत्रकारदिन साजरा करण्यात आला.
     
    *•   ६ जानेवारी १९९३ - पासून ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याणनिधी’ या संस्थेमार्फत पोंभुर्ल्यात प्रत्येक वर्षी पत्रकार दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यास प्रारंभ झाला.
     
    *•  ६ जानेवारी १९९४ - ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’ ने  पोंभुर्ले (जि. सिंधुदुर्ग) येथे बाळशास्त्री यांचा अर्धपुतळा, ग्रंथालय व छोटेसे सभागृह उभारले. या ठिकाणी १७ मे रोजी जांभेकर पुण्यतिथी साजरी करण्यात येते.
     
    *•  ओरोस (जि. सिंधुदुर्ग) येथे ‘सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघा’ने राज्य सरकारकडून साडेचार कोटी रुपयांचा निधी  मंजूर करून भव्य आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारक प्रकल्प साकारला आहे.
     
    *   बाळशास्त्री यांचे कायम सार्वजनिक स्मारक कार्यरत राहावे, यासाठी पत्रकार कल्याण निधीमार्फत राबवले जाणारे विविध उपक्रम-
    १)  महाराष्ट्रातील गरजू आणि आपदग्रस्त पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहकार्य करणे,
    २)  वृद्धावस्थेतील निराधार पत्रकारांना विशेष आर्थिक साहाय्य देणे,
    ३)  मराठी पत्रकारितेध्ये उल्लेखनीय कार्य करणार्‍या पत्रकारांना राज्यस्तरीय महसूल विभागामध्ये ६ आणि राज्याबाहेरील मराठी पत्रकारास १ असे ७ दर्पण पुरस्कार देणे.
    ४)  महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठवयोवृद्ध अशा एका संपादकास दर वर्षी बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ संपादक पुरस्कार देणे,
    ५)  मराठी पत्रकारांसाठी दर वर्षी राज्यस्तरीय खुली निबंधस्पर्धा आयोजित करून, त्यातील विजेत्यांना बाळशास्त्री जांभेकर निबंध पुरस्कार,
    ६)  मराठी पत्रकारितेचा दर्जा वाढवण्यासाठी राज्याच्या विविध भागांध्ये चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिराचे आयोजन,
    ७)  मराठी पत्रकारितेचा अभ्यास व संशोधन, संवर्धन यासाठी शिष्यवृत्ती
     

     

Share this story

Total Shares : 8 Total Views : 2698