दिल्लीतील वायू प्रदूषण

  • दिल्लीतील वायू प्रदूषण

    दिल्लीतील वायू प्रदूषण

    • 12 Nov 2020
    • Posted By : Study circle
    • 547 Views
    • 1 Shares

     दिल्लीतील वायू प्रदूषण

    दिल्लीला बाराही महिने वायू प्रदूषणाने ग्रासलेले असते, हिवाळ्यात त्याची तीव्रता वाढते. नोव्हेंबर 2020 च्या पहिल्या आठवड्यात दिल्लीच्या अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता अतिशय वाईट होती. दिल्लीच्या हवा गुणवत्तेचा निर्देशांक 443 इतका अत्यंत धोकादायक असा नोंद झाला होता. त्यामुळे नागरिकांना डोळ्यात आग होणे, डोकेदुखी आणि इतर समस्यांना सामोरे जावे लागले. दिल्लीत प्रदूषणामुळे दरवर्षी 25 ते 26 हजार नागरिकांचे अकाली मृत्यू होतात आणि 25 लाख विद्यार्थी श्वसनाच्या समस्येने ग्रासले जातात. स्वच्छ हवा हा महत्त्वाचा मूलभूत अधिकार; दिल्लीकरांपासून हिरावत गेला आहे.

    प्रदुषणाची कारणे-  

    1. वाहनांची अफाट संख्या-

      दिल्लीतील वाहनांची अफाट संख्या हे प्रदूषणाचे एक महत्त्वाचे कारण. गेल्या वीस वर्षांमध्ये वाहनांची संख्या लाखांवरून कोटींवर पोहोचली. एका अभ्यासानुसार - मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या तीन महानगरांची वाहनसंख्या एकत्रित केली तरी त्यापेक्षा दिल्लीच्या वाहनांची संख्या अधिक असेल. याशिवाय दिल्लीला खेटून असलेल्या राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेश, पंजाब आदी राज्यांतून दैनंदिन दिल्लीत येणारी वाहने वेगळी.

      मालवाहतूक करणार्‍या लाखो वाहनांना उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब किंवा राजस्थानात जाण्यासाठी दिल्लीला अनावशयक ओलांडून जावे लागते व त्यामुळे प्रदूषण वाढते. हे रोखण्यासाठी रिंग रोडच्या कामांना मोठी गती दिली गेली आहे.

    2. विकसित भागांमधील बांधकामे -

       वाहनांच्या अफाट संख्येबरोबर दिल्लीच्या प्रदूषणाचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे गुरुग्राम, नोएडा, फरिदाबाद आदी लगतच्या विकसित भागांमधील बांधकामे. त्या बांधकामांच्या राडारोड्यांनी, धुळींनी प्रदूषणात भर पडते.

    3. शेजारील राज्यातून येणार्‍या धुराचे  वाढते प्रमाण-

      बेशिस्त आणि अनागोंदीने दिल्लीची हवा अशी प्रदूषित झालेली असताना नोव्हेंबरमध्ये दिल्लीमध्ये शेजारील राज्यातून येणार्‍या धुराचे प्रमाण वाढते. या दिवसांत पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांनी भातपेंडींची अर्धवट रोपे जाळण्यासाठी शेतांमध्ये लावलेल्या आगींचा धूर वार्‍याने दिल्लीपर्यंत येतो आणि तिथेच थबकतो.

      भातपेंड्यांना आगी लावण्यास काही वर्षाआधी बंदी घातली होती; पण त्याने काडीचाही परिणाम झालेला नाही. दंड ठोठावला; पण तो कुणी भरत नाही. त्याचे कारण शेतकर्‍यांच्या अपरिहार्यतेत आहेत. पंजाब व हरयाणाच्या पट्ट्यांमध्ये भाताचे पीक घेतल्यानंतर शेतकर्‍यांना 15 नोव्हेंबरच्या आत गव्हाची पेरणी करावयाची असते. कारण 15 नोव्हेंबरच्या आत पेरा झाला नाही तर एप्रिलच्या वाढत्या तापमानामुळे गव्हाचे उत्पादन घटण्याची शक्यता असते. त्यामुळे धानाची कापणी केल्यानंतर उरलेला भातपेंडा कापण्याएवढा त्यांना अवधीच मिळत नाही आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्याइतपत त्यांच्याकडे आर्थिक ताकदही नसते. मग ते वेळ आणि पैसे वाचविण्यासाठी शेतांना आगी लावतात आणि त्याचा धूर दिल्लीकरांच्या मुळावर येतो.

    4. हिंवाळा-

      हिंवाळ्यातील धुक्यामुळे शेतांमध्ये लावलेल्या आगींचा धूर जास्तच विनाशाकारी ठरतो. तापमान उतरत चाललेले असते. वारा मंदावलेला असतो आणि त्यामुळे धुक्याचे आणि धुळीचे घातक मिश्रण बनते. दरवर्षी असे धुरके दिल्लीच्या आभाळात येतेच; पण यंदा त्याचे प्रमाण अतिधोकादायक पातळीवर गेले होते.

       उपाय योजना -

    1. सीएनजी इंधनाचा वापर -

      प्रदूषणाविरुद्धच्या लढाईत दिल्लीमध्ये सीएनजी या तुलनेने स्वच्छ इंधनाचा सुरू झालेला वापर लक्षणीय होता; पण दिल्लीला सीएनजीचे फायदे घेता आले नाहीत. कारण सीएनजी वापरापाठोपाठ अपेक्षित असलेल्या सुधारणा राबविल्या गेल्या नाहीत - पेट्रोल व डिझेलच्या किमती एकाच पातळीवर आणणे, वायूआधारित वीज प्रकल्पांची सक्ती करणे, फर्नेस ऑईल व पेट कोकवर बंदी घालणे अशा गोष्टींसाठी सरकारांनी पुरेशी इच्छाशक्ती दाखवायला हवी होती; पण तसे होत नाही.

    2. फटाक्यांवर बंदी -

       प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने फटाक्यांवर बंदी लागू केली. 2019 मध्ये दिवाळीत सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातली, तर उन्मादी लोकांनी त्याला धार्मिक स्वरुप देण्याचा प्रयत्न केला. पण सर्वसामान्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केल्यामुळे फटाके वाजविण्याच्या प्रमाण किमान 50-60 टक्क्यांनी घटले. हा दिलासा अल्पजीवी ठरला.2020 मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजस्थान, महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवण्यास मनाईचे आदेश आहेत.

    3. पर्यायी पीकपद्धतीला चालना-

       आगी कमी करायच्या असतील तर गव्हापासून शेतकर्‍यांना दूर न्यावे लागेल. त्यासाठी मका चांगला पर्याय ठरेल. त्यासाठी मक्यापासून इथेनॉल बनविण्याची संमती दिली पाहिजे. तसे झाल्यास आपोआप भातपेंड्यांच्या आगीचे प्रमाण कमी होईल. एकीकडे दिल्लीवर आलेले जीवघेणे धुरक्यांचे संकट, तर दुसरीकडे शेतकर्‍यांची अपरिहार्यता असा हा तिढा. त्यातून पुन्हा प्रश्न आंतरराज्य स्वरूपाचा. या तीनही राज्यांत वेगवेगळ्या पक्षांची सरकारे. पंजाबात काँग्रेसचे, हरयाणात भाजपचे आणि दिल्लीत आम आदमीचे.

    4. आरोग्य विभागाच्या सूचना-

      वायू प्रदूषणामुळे ज्या लोकांना श्वसनासंबंधित समस्या आहेत. त्यांनी घरातून बाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाकडून तसेच आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या. विना वॉल्व्हच्या एन-95 मास्कचा अधिकाधिक वापर करण्याच्या सूचना दिल्या गेल्या.


    प्रश्नमंजुषा (7)

    1.   कोणत्या पर्यायी पीकपद्धतीला चालना दिल्यास भातपेंड्यांच्या आगीचे प्रमाण कमी होईल ?

         1)   सोयाबीन

         2)   गहू

         3)   मका

         4)   ऊस

    2.   दिल्लीला प्रदूषणाविरुद्धच्या लढाईत सीएनजी या स्वच्छ इंधनाचेफायदे घेता आले नाहीत, कारण सीएनजी वापरापाठोपाठ अपेक्षित असलेल्या कोणत्या सुधारणा राबविल्या गेल्या नाहीत?

         अ)   पेट्रोल व डिझेलच्या किमती एकाच पातळीवर आणणे

         ब)   वायूआधारित वीज प्रकल्पांची सक्ती करणे

         क)   फर्नेस ऑईल व पेट कोकवर बंदी घालणे

         पर्यायी उत्तरे ः

         1)   फक्त अ  

         2)   फक्त अ आणि ब

         3)   फक्त ब आणि क

         4)   अ, ब आणि क

    3.   उत्तर भारतात किती तारखेच्या आत गव्हाचा पेरा झाला नाही तर एप्रिलच्या वाढत्या तापमानामुळे गव्हाचे उत्पादन घटण्याची शक्यता असते ?

         1)   15 नोव्हेंबरच्या आत

         2)   15 नोव्हेंबरच्या आत

         3)   15 नोव्हेंबरच्या आत

         4)   15 नोव्हेंबरच्या आत

    4.   हिंवाळ्यात कोणत्या राज्यातील शेतकर्‍यांनी भातपेंडींची अर्धवट रोपे जाळण्यासाठी शेतांमध्ये लावलेल्या आगींचा धूर वार्‍याने दिल्लीपर्यंत आल्याने प्रडूषणाची तीव्रता वाढढते ?

         अ.   उत्तर प्रदेश

         ब.   पंजाब

         क.   हरयाणा

         पर्यायी उत्तरे ः

         1)   विधाने अ, ब बरोबर        

         2)   विधाने ब, क बरोबर   

         3)   विधाने अ, क बरोबर       

         4)   सर्व विधाने बरोबर

    5.   एका अभ्यासानुसार कोणत्या तीन महानगरांतील वाहनसंख्या एकत्रित केली तरी ती दिल्लीतील वाहनांची संख्येपेक्षा कमी आहे ?

         अ.   कोलकाता

         ब.   पुणे

         क.   मुंबई

         ड.   चेन्नई    

         पर्यायी उत्तरे ः

         1)   अ, ब आणि क  

         2)   ब, क आणि ड

         3)   अ, क आणि ड  

         4)   अ, ब आणि ड

    उत्तरे : प्रश्नमंजुषा (7)

    1-3

    2-4

    3-2

    4-4

    5-3

Share this story

Total Shares : 1 Total Views : 547