माउंट एव्हरेस्ट / प्रश्नमंजुषा 49

  • माउंट एव्हरेस्ट / प्रश्नमंजुषा 49

    माउंट एव्हरेस्ट / प्रश्नमंजुषा 49

    • 10 Dec 2020
    • Posted By : Study Circle
    • 1569 Views
    • 0 Shares
    माउंट एव्हरेस्ट
     
            9 डिसेंबर 2020 - जगातील सर्वोच्च उंच शिखर म्हणून प्रसिद्ध असलेले माउंट एव्हरेस्ट, हे गृहित उंचीपेक्षा 86 सेंटीमीटरने अधिक असल्याचे चीन व नेपाळच्या नव्या सर्वेक्षणातून समोर आले. मात्र दोन्ही देशांनी ही संयुक्त घोषणा केलेली नसून, केवळ नेपाळकडून याबाबतची घोषणा करण्यात आली. एव्हरेस्टची उंची 8,848 मीटर असल्याचे मानले जात होते, ती आता  8,848.86 मीटर असल्याचे दिसून आले. भूकंपाबरोबरच ग्लोबल वॉर्मिंगमुळेही एव्हरेस्टची उंची कमी होईल, असे बोलले जात होते, त्याला या नव्या शोधामुळे छेद गेला.
    नेपाळ व चीन यांच्या संयुक्त मोहिमेतून हे सर्वेक्षण केले गेले. चीन व नेपाळमध्ये एव्हरेस्टच्या उंचीवरुन काही वर्षांपासून मतभेद होते. भारताने सर्वात आधी एव्हरेस्टची उंची मोजली होती. 1954 साली भारताने मोजलेली उंची ही प्रमाण मानली जात असल्याने, चीनने नेपाळला जोडीला घेत, उंची मोजून ती जास्त असल्यावर शिक्कामोर्तब केले. 
    • एव्हरेस्टची उंची मोजण्याच्या निमित्ताने, चीनने नेपाळला बरोबर घेताना एव्हरेस्ट शिखरावरील उंचीच्या प्रमाणाची भारतीय नाममुद्रा दूर केली. अशा मोहिमा अधिकृततेच्या दृष्टीने प्रातिनिधिक असल्या, तरी चीनने भू राजकीय वर्चस्वाच्या दृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकले.
    • 1954 मध्ये  ’सर्व्हे ऑफ इंडिया’ या संस्थेने केलेल्या मोजणीनुसार, एव्हरेस्टची उंची 8,848 मीटर निश्चित होऊन ती जगमान्य झाली होती. त्यानंतरही अनेकांनी उंची मोजण्याचा प्रयत्न केला. 
    • 1975 मध्ये चीनने प्रथम व 2005 मध्ये दुसर्‍यांदा उंची मोजली. ती अधिकृत समजावी, यासाठी नेपाळवर दबाव टाकला. मात्र उंची मोजतानाच्या पद्धतीविषयी या दोघांत मतभेद होते. 
    • 13 ऑक्टोबर 2019 ला नेपाळ आणि चीनदरम्यान माउंट एव्हरेस्टची उंची मोजण्याचा करार झाला होता. या अंतर्गत माउंट झूमलांगमा आणि सागरमाथाची उंची मोजण्याचे ठरले होते. 2019 मध्ये माउंट एव्हरेस्टची उंची मोजण्यासाठी एक पथक शिखरावर रवाना करण्यात आले होते. 2020 मध्ये तिबेटकडून एका पथकाला पाठवण्यात आले होते.
    • 2015 मध्ये नेपाळमधील भूकंपामुळे काही शिखरांची उंची कमी झाली. एव्हरेस्टचीही उंची कमी झाली असावी, असा मतप्रवाह पुढे आला. अखेर नेपाळने प्रथमच आपल्या भूसर्वेक्षण अधिकार्‍यांना प्रशिक्षण देऊन, हे शिखर सर करण्याची मोहीम सुरू केली. चीननेही त्यांच्या बाजूने मोजमाप सुरू केले. कोव्हिडकाळात अशी मोहीम करणारे ते एकमेव होते. 

    ट्रिम्बल जीएनएसएस -
    •• जीएनएसएस म्हणजे ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम. जीपीएस अर्थात ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम ही जीएनएनएस प्रणालीचाच भाग आहे. 
    •• जीएनएसएस ही सर्वांत अचूक व जगातील कोणत्याही कानाकोपर्‍यातून, कितीही उंचीवरील माहिती गोळा करण्याची सर्वांत अत्याधुनिक पद्धत आहे. 
    •• या प्रणालीवर आधारित विशेष यंत्रे बनविण्याचे काम ट्रिम्बल ही संस्था करत असून, गेली 30 हून अधिक वर्षे ते या व्यवसायात आहेत. त्यांच्या जीएनएसएस प्रणालीवर आधारित यंत्रांचा वापर करून नेपाळ सरकारने माउंट एव्हरेस्ट शिखराची उंची मोजली.

    माउंट एव्हरेस्टची भौगोलिक माहिती 
            माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे. हिमालय पर्वतातील ह्या शिखराची उंची 8,848 मीटर (29,029 फूट) इतकी असून ते नेपाळ व चीन (तिबेट) ह्या देशांच्या सीमेजवळ आहे. गिलगीटपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत पसरलेल्या हिमालयामध्ये जगातील सर्वोच्च 14 शिखरे आहेत.  ब्रिटीशांनी 18 व्या शतकात या शिखरपर्वतांची उंची मोजण्यासाठी ’द ग्रेट ट्रिग्नोमेट्रिक सर्व्हे ऑफ इंडिया’ची सुरुवात केली. 
    •• 1802 मध्ये या सर्व्हेला सुरुवात झाली. पुढे 70 वर्षांहून अधिक काळ याचे काम चालले. 
    •• 1840 ते 1856 पर्यंत या सर्व्हेअंतर्गत एव्हरेस्ट शिखराची उंची मोजण्यात आली. यातून एव्हरेस्ट हे 8840 मीटर उंचीचे असून, ते जगातील सर्वोच्च शिखर आहे, असा निष्कर्ष काढण्यात आला. पुढे वेळोवेळी एव्हरेस्ट शिखराची उंची मोजण्याचे काम अनेक संशोधक व शास्त्रज्ञांनी केले. 
    •• 1840 मध्ये सर जॉर्ज एव्हरेस्ट हे भारतीय त्रिमितीय सर्वेक्षण प्रकल्पाचे प्रमुख होते.
    •• 1841 मध्ये एव्हरेस्ट यांनी हिमालयातील पर्वत शिखरांना अतिउंच शिखरामध्ये समाविष्ट केले. त्यानुसार सर्वप्रथम त्याचे पीक बी असे नामकरण केले गेले.
    •• 1848 मध्ये मोजणीचे काम पुढे सरकल्यावर त्याचे पीक 15 असे नामकरण झाले. त्यावेळी कांचनगंगा पर्वताला सर्वात उंच शिखर मानण्यात येत होते. 
    •• 1852 मध्ये अ‍ॅन्ड्र्यू वॉ यांनी सर्वेक्षण उपकरणे वापरून शिखराच्या उंचीची प्राथमिक मोजणी केली व त्यानंतर डेहराडून व कोलकातामधील कार्यालयांनी गणिते केल्यावर पीक 15 ची उंची इतर कोणत्याही शिखरापेक्षा जास्त आढळली व त्यावर सर्वोच्च शिखर म्हणून शिक्कामोर्तब झाले. 
    •• 1856 मध्ये एव्हरेस्ट यांच्या कनिष्ठांनी या शिखराचे नाव माउंट एव्हरेस्ट ठेवावे असे सुचविले.
    •• 1856 मध्ये सर्वप्रथम अ‍ॅन्ड्र्यू वॉ यांनी घेतलेल्या सर्वेक्षणानुसार माउंट एव्हरेस्टची (तत्कालीन पीक 15) उंची 29,002 फूट इतकी निश्चित झाली होती. याकामी राधानाथ सिकदार यांच्यासह अनेक भारतीय गणितज्ञ गुंतले होते व अनेक वर्षे गणिते करून हे मापन मांडले होते. या सर्वेक्षणानंतर राधानाथ सिकदार यांनी सिद्ध केले की हिमालयाचे पीक 15 हे शिखर जगातील सर्वात उंच शिखर आहे. या कामगिरीसाठी ब्रिटिश सरकारने राधानाथांचा गौरव केला होता. 
    •• 1954 मध्ये केलेल्या सर्व्हेतून 8848 मीटर ही उंची निश्चित करण्यात आली. तेव्हापासून ही उंची ग्राह्य मानण्यात आली.
    •• 9 ऑक्टोबर 2005 रोजी चीनने केलेल्या मोजणीप्रमाणे पर्वताची उंची 8,844.43 मीटर +- 0.21 मीटर इतकी नोंदवण्यात आली. ही उंची एव्हरेस्टवरील बर्फाच्या लादीची उंची वजा जिथे खडक जेथे संपतो तेथवरून काढली आहे. चिनी मापनकर्त्यांना लादीची उंची साधारणपणे 3.5 मीटर इतकी आढळली. खडक व बर्फाची लादी या दोघांची मिळून एकत्र उंची 8,848 इतकी निश्चित करण्यात आली.

    एव्हरेस्टची विविध नावे -
    1) नेपाळी भाषेत एव्हरेस्टचे नाव सगरमाथा असे आहे. हा शब्द संस्कृत शब्द स्वर्गमाथाचा अपभ्रंश आहे. 
    2) तिबेटी भाषेत त्याला चोमोलुंग्मा (विश्र्वाची माता) असे म्हणतात. 
    3) चिनी भाषेत त्याला ”झुमुलांग्मा फेंग“ असे म्हंटले जाते.
    4) सुरुवातीला हे शिखर पीक बी (1841), नंतर पीक 15 (1848) ह्या नावाने ओळखले जात होते. 
    5) 1865 साली भारतीय सर्वेक्षण खात्याचे प्रमुख(सर्व्हेयर जनरल) अ‍ॅन्ड्र्यू वॉ होते. त्यांनी 1843 मध्ये निवृत्त झालेल्या त्यांच्या साहेबाचे, म्हणजे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव त्या शिखराला दिले. म्हणून त्या शिखराला 1865 पासून माउंट एव्हरेस्ट म्हणू लागले.
    6) या शिखराचे नाव बदलून त्याची अचूक उंची मोजणार्‍या राधानाथ सिकदार याचे नाव शिखराला द्यावे, असा एक ठराव, अटलबिहारी बाजपेयी हे भारताचे पंतप्रधान असताना (2000 साली) विचारात घेतला गेला होता. 

    • पर्वत शिखरांची तुलना -
    1) एव्हरेस्ट हे जगातील समुद्रसपाटीपासूनची सर्वोच्च जागा आहे. मात्र जगात अनेक पर्वत असे आहेत की ज्यांची बेस कँप पासूनची उंची ही एव्हरेस्टच्या बेसकँप पेक्षा जास्त आहे. 
    2) मौना की हा हवाईमधील पर्वत समुद्राच्या तळापासून उंचावतो व जवळपास 10,000 मीटर त्यांची उंची आहे, परंतु पाण्याखाली जवळपास 5,000 मीटर असल्याने प्रत्यक्षात समुद्रसपाटीवरील उंची एव्हरेस्टपेक्षा बरीच कमी आहे. ( 4,205 मीटर).
    3) जर बेसकँप पासूनची उंची ग्राह्य धरली तर अमेरिकेच्या अलास्का राज्यातील माउंट मॅककिन्ले हा पर्वत सर्वात उंच आहे. हा पर्वत त्याच्या तळापासून 5,600 मीटर इतका उंच आहे, परंतु त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची 6,193 मीटर इतकीच आहे. एव्हरेस्टची दक्षिण बाजूकडील बेसकँपपासूनची उंची 4,650 मीटर इतकी आहे, मात्र समुद्रसपाटीपासूनची उंची 8.848 मीटर इतकी आहे.

    एव्हरेस्ट चढाई -
            माउंट एव्हरेस्ट  हे अतिउंच शिखर असले तरी के 2 अथवा कांचनगंगा ह्या इतर शिखरांच्या तुलनेत कमी अवघड आहे. इतर कोणत्याही 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या शिखरांपेक्षा एव्हरेस्टवर सर्वाधिक गिर्यारोहण चढाया झाल्या आहेत, तरीही अतिउंचीच्या त्रासामुळे खराब हवामानामुळे अनेक गिर्यारोहक मृत्युमुखी पडतात. 1953 मध्ये या शिखरावर पहिली चढाई ब्रिटिश मोहिमेतील न्यूझीलंडचे एडमंड हिलरी व भारतीय-नेपाळी नागरिक शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी केली. त्यानंतर 2020 पर्यंत 2,436 गिर्यारोहकांकडून 3,679 चढाया झाल्या आहेत.
    •• माउंट एव्हरेस्टवर चढाईसाठी दोन प्रमुख मार्ग आहेत. नेपाळच्या हद्दीत असलेली आग्नेयेकडील पर्वत रांग व तिबेटच्या हद्दीतली ईशान्येकडील रांग. या दोघां मार्गांपैकी आग्नेयेकडील मार्ग जास्ती सोपा व सोईस्कर आहे. त्यामुळेच गिर्यारोहकांच्या जास्त पसंतीचा आहे.
    •• 1953 मध्ये ह्याच मार्गाने सर एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी पहिली चढाई केली होती. चीनचे पाश्रि्चमात्य देशांशी कटू संबंध यामुळे देखील नेपाळ मार्गाचा जास्त वापर होतो.
    •• एव्हरेस्ट चढाईसाठी सर्वोत्तम महिना मे हा गणला जातो. या काळात थंडी कमी झालेली असते. चढाईसाठी आवश्यक असलेला कडक बर्फ हिवाळ्यानंतर भरपूर असतो. तसेच हवामानातील बदलामुळे वार्‍याची दिशा उत्तरेकडची होते व त्यामुळे पर्वतावरील सोसाट्याचा वारा कमी होतो. 
    •• 1885 मध्ये आल्पाईन क्लबचे अध्यक्ष क्लिटंन थॉमस डेंट यांनी आपल्या पुस्तकात अबोव्ह द स्नो लाइन या पुस्तकात एव्हरेस्टवर चढाई करणे शक्य आहे हे नमूद केले होते.
    •• 1921 मध्ये जॉर्ज मॅलरी यांनी उत्तरेकडील मार्गाचा शोध लावला. ही एव्हरेस्ट काबीज करायची मोहीम नव्हती तर एव्हरेस्ट चढण्याचे मार्ग कुठून असण्याची शक्यता आहे हे पडताळण्यास होती. मॅलरी यांनी आपल्या शोधकार्यात एव्हरेस्टच्या शेंड्यापर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. मॅलरी ही पहिली अशी व्यक्ती होती की ज्यांनी नॉर्थ कोल (7,007 मी) वर पाऊल ठेवले. नॉर्थ कोलवरून त्यांनी पुढील रस्ता कसा असेल याची पडताळणी केली. त्यांची मोहीम इतक्या उंचीसाठी अद्ययावत नव्हती त्यामुळे त्यांना तेथून आवरते घ्यावे लागले.
    •• 1922 मध्ये ब्रिटिशांनी एव्हरेस्ट काबीज करायची मोहिम आखली. या मोहिमेत जॉर्ज फिंच यांनी भराभर चढत 8,000 मीटर पेक्षाही जास्त चढण केली व 8,000 मीटरपेक्षा अधिक चढाई करणारे ते पहिले ठरले. ही मोहीम जॉर्ज मॅलरी व ब्रिटिशांच्या अखिलाडू वृत्तीसाठी गाजली. मॅलरी व कर्नल फेलिक्स यांनी पुन्हा एकदा नॉर्थ कोलच्या बाजूने प्रयत्न केला. मॅलरी यांच्या चुकीमुळे हिमस्खलनामध्ये 7 स्थानिक वाहक मारले गेले.
    •• 1924 मध्ये मॅलरी यांनी पुन्हा ब्रिटिशांनी मोहीम आखली. या मोहिमेत सुरुवातील मॅलरी व ब्रूस यांचे प्रयत्न खराब हवामानाने फोल ठरवले. पुढील प्रयत्न नॉर्टन व सॉमरवेल यांनी केले त्यांना सुरेख हवामानाची साथ मिळाली व त्यांनी विना ऑक्सिजन प्रयत्न केले. नॉर्टन 8,558 मीटर पोहोचले असताना मॅलरी व इर्व्हिन ह्यानी ऑक्सिजन देण्यासाठी म्हणून पुढाकार घेतला. नॉर्टनला बेसकँपकडे परत पाठवले व स्वतः मोहीमे फत्ते करायचे ठरवले. 8 जून 1924 रोजी इर्व्हिन व मॅलरी चढाई करत असताना मरण पावले. 1 मे 1999 रोजी मॅलरी व इर्व्हिन फाउंडेशनच्या गिर्यारोहकांना एव्हरेस्ट शिखराच्या उत्तर बाजूला बर्फाच्या अस्तराखाली दफन झालेले मृतदेह शोधून काढण्यात यश मिळाले. शिखराच्या एवढे जवळ सापडलेल्या मृतदेहांमुळे इर्व्हिन व मॅलरी यांनी हिलरी व तेनसिंग नोर्गेच्या 24 वर्षे अगोदरच एव्हरेस्ट सर केले होते की काय अशा चर्चांना उधाण आले होते.
    •• 1952 मध्ये स्विस संघाने एव्हरेस्ट चढाईचे शर्थीचे प्रयत्न केले. या मोहिमेचे नेतृत्व एडवर्ड डुनाँ यांनी केले होते. डुनाँ यांना नेपाळकडून चढाईची परवानगी मिळाली होती. त्यांनी खूंबू हिमनदीमधून साउथ कोल 7,986 मीटर (26,201 फूट) उंचावर पोहोचण्याचा मार्ग शोधून काढला. या मोहिमेत रेमंड लँबर्ट व शेर्पा तेनसिंग नोर्गे यांनी 8,595 मीटर (28,199 फूट) इतकी उंची गाठली की तो नवा विक्रम ठरला. स्विस संघाला आल्प्समधील अनुभवाचा चांगलाच फायदा झाला तसेच त्यांचे शेर्पांशी वर्तन अतिशय खेळीमेळीचे असायचे. यामुळे स्विस संघाला पूर्वीच्या ब्रिटिश संघांपेक्षा चांगले यश मिळाले.
    •• 1953 मध्ये 9 वी ब्रिटिश मोहीम आखली गेली. या मोहिमेचे नेतृत्व अनुभवी ब्रिटिश अधिकारी जॉन हंट यांच्याकडे होते. यांनी पूर्वीच्या स्वीस मोहिमेच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठवायचे ठरवले. त्या अंतर्गत, तेनसिंग नोर्गे याला मोहिमेत समाविष्ट करण्यात आले. हंट यांनी गिर्यारोहकांच्या दोन जोड्या बनवल्या. पहिली जोडी टॉम बॉर्डिलॉन व चार्ल्स इव्हान यांनी चढाईचे शर्थीचे प्रयत्न केले. शिखरापासून 100 मीटरपर्यंत पोहोचण्यात 26 मे रोजी त्यांना यश मिळाले परंतु तोवर त्यांची फारच दमणूक झाली होती. परंतु त्यांनी बर्फात खोदलेले मार्ग, दोर व नेलेले ऑक्सिजनच्या नळकांड्या याचा फायदा तेनसिंग नोर्गे व न्यूझीलंडचे एडमंड हिलरी या जोडीला झाला. दोनच दिवसांनी नोर्गे व हिलरी या जोडीने शिखरावर साउथ कोलच्या दिशेने कूच केले.
    •• 29 मे 1953 रोजी सकाळी 11 वाजता सरतेशेवटी एव्हरेस्टवर मानवी पाऊल पडले. पहिले एव्हरेस्टवर कोण पोहोचले याचे हिलरी व नोर्गे जोडिने बरीच वर्षे गुपित कायम ठेवले होते. तेनसिंग नोर्गेने आपण हिलरींच्यानंतर पोहोचल्याचे काही काळाने मान्य केले. 
    •• एव्हरेस्ट सर केल्यामुळे ब्रिटिश संघाचे नेते जॉन हंट व हिलरी यांना सर या किताबाने सन्मानित करण्यात आले. 
    •• तेनसिंग नोर्गे यांना जॉर्ज या मेडलने सन्मानित करण्यात आले, तर हिलरी यांना न्यूझीलंडचा सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ न्यूझीलंड मिळाला. ऑर्डर ऑफ न्यूझीलंड मिळवणारे हिलरी हे पहिले नागरिक होते. 
    •• तेनसिंग नोर्गे यांना भारत सरकारनेही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

    विना ऑक्सिजनचे प्रयत्न -
    ••• 8 मे 1978 रोजी इटलीचे प्रसिद्ध गिर्यारोहक राईनहार्ड मेसनर यांनी ऑस्ट्रियाच्या पेतर हेबलर यांच्या साथीत एव्हरेस्टवर चढाई केली. या चढाईत कोणत्याही प्रकारच्या ऑक्सिजनच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला नाही. राईनहार्ड मेसनर यांनी पुन्हा 1980 मध्ये एव्हरेस्ट वर पुन्हा एकदा विनाऑक्सिजन एकट्याने चढाई केली.

    भारतीय चढाया -
    ••• पहिले चढाई करणारे तेनसिंग नोर्गे त्यानी नंतरच्या काळात भारतीय नागरिकत्व घेतले होते. 
    ••• बहुतांशी भारतीय चढाया ह्या भारतीय सैन्यदलातर्फे आखल्या गेल्या. पहिली भारतीय मोहीम 1960 मध्ये राबवली गेली. या मोहिमेचे नेतृत्व ब्रिगेडियर जी. सिंग यांच्याकडे होते. परंतु पहिले यश 1965 मधील तिसर्‍या मोहिमेत मिळाले.
    ••• 1984 मधील नागरी मोहिमेत बचेंद्री पाल ह्या एव्हरेस्ट सर करणार्‍या भारताच्या पहिल्या महिला गिर्यारोहक झाल्या. 
    ••• 19 मे 1998 रोजी पुण्याचे सुरेंद्र चव्हाण यांनी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली. हृषीकेश यादव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकातील सुरेंद्र चव्हाण यांनी 1998 मध्ये मोसमातील पहिल्या चढाईचा मान मिळवला. 
    ••• 2 मे 1992 रोजी डॉ. दीपक कुलकर्णी यांना चढाई करताना मरण आले. 
    ••• 19 मे, 2016 रोजी रफीक शेख यांनी हे शिखर सर केले.
     
    प्रश्नमंजुषा (49)
     
    1) डिसेंबर 2020 मध्ये जगातील सर्वोच्च उंच शिखर म्हणून प्रसिद्ध असलेले माउंट एव्हरेस्टची मोजली गेलेली उंची किती आहे ?
    1) 8,847.86 मीटर 
    2) 8,848.86 मीटर 
    3) 8,848.68 मीटर 
    4) 8,847.68 मीटर 
     
    2) माउंट एव्हरेस्ट संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    अ) भारताने सर्वात आधी एव्हरेस्टची उंची मोजली होती.
    ब) 1954 मध्ये  ’सर्व्हे ऑफ इंडिया’ या संस्थेने केलेल्या मोजणीनुसार, एव्हरेस्टची उंची 8,848 मीटर निश्चित झाली होती. 
    क) 13 ऑक्टोबर 2019 ला नेपाळ आणि चीनदरम्यान माउंट एव्हरेस्टची उंची मोजण्याचा करार झाला होता.
    ड) एव्हरेस्टची उंची मोजतानाच्या पद्धतीविषयी चीन व भारत या दोन्ही देशात मतभेद आहेत.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ, ब आणि क
    2) अ आणि ब
    3) क आणि ड
    4) फक्त क
     
    3) एव्हरेस्टच्या विविध नावासंबंधी खालील विधाने विचारात घ्या :
    अ) एव्हरेस्टचे सर्वप्रथम नाव ’पीक बी’ (1841)असे होते.
    ब) 1848 मध्ये मोजणी झाल्यावर त्याचे  नाव ’पीक 15’  असे झाले.
    क) 1856 साली पीक 15 शिखराला माउंट एव्हरेस्ट म्हणू लागले.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    4) खालील जोड्या जुळवा ः
    स्तंभ अ (शिखर)       स्तंभ ब ( स्वतंत्र भारतातील सर्वोच्च शिखर मानले जाते ते वर्ष)
    अ. नंदादेवी I. 1947
    ब. कांचनगंगा II. 1975
    क. गॉडवीन ऑस्टिन III. 1986
    पर्यायी उत्तरे :
    (1) II I III
    (2) I II III
    (3) III II I
    (4) II III I
     
    5) माउंट एव्हरेस्ट शिखराची उंची मोजण्यासाठी कोणती प्रणाली वापरली जाते ?
    1) जीपीएस
    2) जीआयएस
    3) जीएनएसएस
    4) वरील सर्व
     
    6) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ)  चीनमध्ये माऊंट एव्हरेस्टला ‘माऊंट झूमलांगमा फेंग ’ या नावाने संबोधले जाते.
    ब) नेपाळमध्ये माऊंट एव्हरेस्टला ‘सागरमाथा’  या नावाने संबोधले जाते.
    पर्यायी उत्तरे :
    1)  फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    7) 1856 साली  कोणी सिद्ध केले की हिमालयाचे एव्हरेस्ट ( तत्कालीन पीक 15)  हे शिखर जगातील सर्वात उंच शिखर आहे ?
    1) कर्नल फेलिक्स 
    2) सर जॉर्ज एव्हरेस्ट 
    3) राधानाथ सिकदार 
    4) अ‍ॅन्ड्र्यू वॉ 
     
    8) माउंट एव्हरेस्टबाबतची खालील विधाने विचारात घ्या व अचूक पर्याय शोधा :
    अ) माउंट एव्हरेस्ट हे अतिउंच शिखर असले तरी के2 अथवा कांचनगंगा ह्या इतर शिखरांच्या तुलनेत कमी अवघड आहे.
    ब) मौना की हा हवाईमधील पर्वत समुद्राच्या तळापासूनची उंची एव्हरेस्टपेक्षा कमी आहे.
    क)  बेसकँप पासूनची उंची ग्राह्य धरली तर अमेरिकेच्या अलास्का राज्यातील माउंट मॅककिन्ले हा पर्वत सर्वात  माउंट एव्हरेस्टपेक्षा उंच आहे.
    ड) एव्हरेस्ट हे जगातील समुद्रसपाटीपासूनची सर्वोच्च जागा आहे. 
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने अ, ब आणि क बरोबर
    2) विधाने ब, क आणि ड बरोबर
    2) विधाने अ, ब आणि ड बरोबर
    4) विधाने अ, क आणि ड बरोबर
     
    9) एव्हरेस्ट चढाई संबंधी खालील विधाने विचारात घ्या:
    a) 1953 मध्ये सर एडमंड हिलरी व तेनसिंग नोर्गे यांनी पहिली चढाई केली होती.
    b) 1978  साली इटलियनगर्यारोहक राईनहार्ड मेसनर यांनी ऑस्ट्रियाच्या पेतर हेबलर यांच्या साथीत सर्वप्रथम विना ऑक्सिजन एव्हरेस्टवर चढाई केली.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    1) फक्त (a)  
    2) फक्त (b) 
    3) (a) व (b) दोन्ही 
    4) दोन्हीही नाहीत 
    उत्तरे : प्रश्नमंजुषा 49
    1-2
     
    2-1
     
    3-2
     
    4-2
     
    5-3
     
    6-3
     
    7-3
     
    8-2
     
    9-3

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 1569