पुरस्कार / प्रश्‍नमंजुषा (44)

  • पुरस्कार / प्रश्‍नमंजुषा (44)

    पुरस्कार / प्रश्‍नमंजुषा (44)

    • 08 Dec 2020
    • Posted By : Study Circle
    • 376 Views
    • 0 Shares
    जागतिक अन्न पुरस्कार 2020

     

    डॉ. रतन लाल

     
     
            कृषी क्षेत्रातील मातीची गुणवत्ता वाढवून अल्पभूधारक शेतकर्‍यांना मदत करणे आणि अन्नधान्याचा जागतिक पुरवठा वाढवणे या कामी दिलेल्या योगदानासाठी भुईशास्त्रज्ञ डॉ. रतन लाल यांना ‘कृषी क्षेत्रातील नोबेल पुरस्कार’ अशी ओळख असलेला ‘जागतिक अन्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. रतन लाल यांनी मातीचे आरोग्य आणि जमिनीत असलेल्या सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढवण्यावर भर दिला आहे. गेल्या काही दशकांमध्ये मातीची सुपीकता आणि गुणवत्ता मोठया प्रमाणात ढासळल्याने त्याचा परिणाम अन्नधान्य उत्पादनावर आणि गुणवत्तेवर होत आहे. या समस्येवर जगभरातील शेतकर्‍यांना दिलासा देणारे संशोधन विख्यात मृदाशास्त्रज्ञ डॉ. रतन लाल यांनी केले. 
    1) पाकिस्तानच्या पश्रि्चम पंजाबात जन्मलेल्या डॉ. रतन लाल यांचे कुटुंब फाळणीनंतर भारतात आले. 
    2) भारतीय कृषी संशोधन संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून अमेरिकेतील ओहियो विद्यापीठातून डॉ. लाल यांनी पीएच.डी. प्राप्त केली. नंतर काही काळ ऑस्ट्रेलियाच्या सिडनी विद्यापीठात आणि पुढे नायजेरियातील आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेत 18 वर्षे अध्यापन कार्य करून डॉ. रतन लाल अमेरिकेतील ओहियो विद्यापीठात रुजू झाले. तिथल्या ‘कार्बन व्यवस्थापन आणि विलगीकरण केंद्रा’चे ते संस्थापक संचालक आहेत. 
    3) डॉ. लाल यांनी मातीची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने संशोधन केले. गेल्या पाच दशकांत त्यांनी आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये केलेल्या मृदासंवर्धनाच्या संशोधनकार्यामुळे 50 कोटींहून अधिक अल्पभूधारक शेतकर्‍यांना फायदा झाला, त्याचप्रमाणे 2 अब्ज लोकांच्या अन्नसुरक्षेत लक्षणीय सुधारणा झाली.
    4) मातीच्या विघटनावर परिणाम करणार्‍या अनेक कारणांचा, घटकांचा अभ्यास करून डॉ. लाल यांनी मातीचे आरोग्य आणि जमिनीत असलेल्या सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढवण्यावर भर दिला. 
    5) हानिकारक घटकांपासून मातीचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी विनानांगरणी शेती, आवरण पिके (कव्हर क्रॉपिंग), पालापाचोळ्यांचा वापर (मल्चिंग) अशा तंत्रांचा यशस्वीरीत्या अवलंब करून त्याद्वारे जमिनीतील पाण्याचे संरक्षण होईल आणि पोषणमूल्ये, कर्ब वायू, सेंद्रिय पदार्थ जमिनीत कसे मुरून राहतील, याचा मार्ग दाखवला. यामुळे दुष्काळ, पूर आणि बदलत्या वातावरणाच्या दुष्परिणामांना सामोरे जात असलेल्या शेतकर्‍यांना लाभ झाला आहे. 
    6) त्यांच्या तंत्रांचा उपयोग व्यापक स्तरावर सुरू झाल्यास, पिकांखालील जमिनक्षेत्र सुमारे 30 टक्क्यांनी कमी होऊनही सद्य:शतक संपताना तृणधान्यांचे वार्षिक उत्पादन दुप्पट झालेले असेल, असा आशावाद व्यक्त केला जातो.

    किड ऑफ द ईअर 2020 : किशोरी गीतांजली राव
     
     
     
          3 डिसेंबर 2020 - टाइम मॅगझीनच्या पहिल्या ’किड ऑफ द ईअर’ या पुरस्कारासाठी 5,000 हून अधिक दावेदारांमधून भारतीय वंशाच्या किशोरी गीतांजली रावची निवड करण्यात आली.
    • युवा संशोधक गीतांजलीने दुषित पेयजलापासून ते गांजाच्या नशेपासून मुक्त होण्याबाबतीत संशोधन  केलं आहे.
     

    रणजितसिंह डिसले : ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते
     
     
            3 डिसेंबर 2020 - जगभरातील 140 देशातील 12 हजार शिक्षकांमधून प्रथम मानांकन मिळवून, ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या, सोलापूरच्या रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले. 
             लंडनमधल्या नॅचरल हिस्ट्री म्युझिअममध्ये झालेल्या कार्यक्रमात ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी रणजितसिंह डिसले यांच्या नावाची घोषणा हॉलीवुडचे सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी केली. हा पुरस्कार डिसले यांनी ग्रामीण भागातल्या मुलींचं शिक्षण, अशांत देशातल्या मुलांसाठीचं काम, तसंच मुलांमध्ये विज्ञानाची गोडी वाढावी यासाठी केलेले प्रयत्न, यासाठी देण्यात आला. मागासवर्गातल्या मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे या मुलींची शाळेतून गळती थांबली, तसंच बालविवाहालाही आळा बसला, असं वार्की फाउंडेशननं पुरस्कार देताना म्हटलं.

    •• ग्लोबल टीचर पुरस्कार -
     
    1) युनेस्को आणि लंडनमधल्या वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी सदर पुरस्कार देण्यात येतो.
    2) ग्लोबल टीचर पुरस्काराची रक्कम 1 मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे 7 कोटी रुपयांहून अधिक आहे. डिसले यांनी यातली निम्मी रक्कम इतर 10 शिक्षकांमध्ये वाटप करण्याचं ठरवलं असून ही रक्कम शिक्षण क्षेत्रातल्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी वापरली जाईल.
    3) या पुरस्कारासाठी सुरुवातीस जगभरातून 12 हजार नामांकनं दाखल झाली होती. डिसले यांच्यासोबत इटली, ब्राझिल, व्हिएतनाम, मलेशिया, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि यूकेमधील शिक्षक टॉप 10 मध्ये होते. डिसले यांच्या निर्णयामुळे या शिक्षकांना प्रत्येकी 40 लाख रुपये मिळणार आहेत.
    4) यापूर्वी डिसले यांना मायक्रोसॉफ्ट फाउंडेशनचा शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार मिळाला होता. क्यूआर कोडचा वापर करून मुलांना पुस्तकातील कविता, धडे, अधिक माहिती मिळवता येते, या डिसले यांच्या कल्पकतेला तो पुरस्कार मिळाला होता.

    •• इन्नोव्हेटिव्ह शिक्षक  रणजितसिंह डिसले -
     
    1) प्राथमिक शिक्षक डिसले यांची जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा ग्लोबल चेहरा म्हणून त्यांची जगभरात ओळख आहे. त्यांना 12 आंतरराष्ट्रीय व 7 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. 2009 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील परितेवाडी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून ते रुजू झाले. गेल्या 11 वर्षांपासून या जिल्ह्यात ते प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत.
    2) 12 शैक्षणिक पेटंट त्यांच्या नावावर आहेत. डिसले यांनी शिक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या क्रांतिकारक बदलांची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षणतज्ज्ञांना घेणे भाग पडले.
    3) 2011 पासून तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्ण उपक्रम व असामान्य कार्य यामुळे ते जगभरातील सर्वोत्तम 50 इनोव्हेटिव्ह शिक्षकांच्या यादीत विराजमान आहेत. डिसले यांनी शिक्षणामध्ये इंटरनेट आणि तंत्रज्ञानाचा भरपूर वापर केला. पुस्तकांमध्ये क्यूआर कोडच्या माध्यमातून मुलांना सोप्या भाषेत कसं शिकता येईल यावर ते अधिक भर देतात.
    4) मायक्रोसॉफ्ट, गूगल, ब्रिटिश कौन्सिल, अ‍ॅप्लिपग्रीड, अ‍ॅप्लिकेर्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत ते कार्यरत आहेत. 
    5) ’व्हर्च्युअल फिल्ड ट्रीप’ या शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून जगभरातील 87 देशातील 300 हून अधिक शाळांमधील मुलांना ऑनलाईन शिकवण्याचे काम करतात. 
    6) मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी रणजितसिंह डिसले यांच्या कार्याचा गौरव करणारी ’हिट रिफ्रेश’ ही विशेष चित्रफीत प्रकाशित केली असून असा मान मिळालेले ते जगातील एकमेव शिक्षक आहेत. 
    7) 28 व्या वर्षी मायक्रोसॉफ्टची फेलोशिप मिळविणारे सर्वात तरुण प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
    8) रणजितसिंह डिसले हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातली बार्शी तालुक्यातले साहत या गावचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण बार्शीमधल्या सुलाखे विद्यालयामध्ये झाले. 
     
    रणजितसिंह डिसले यांचे नाविण्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम 
    •• क्यूआर कोड पद्धत -
     
    1) पाठ्यपुस्तकातील ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्याला अधिकचे शिक्षण दिले पाहिजे आणि त्याद्वारे यासाठी विद्यार्थ्यांना अधिकाधिक समृद्ध करण्याच्या विचारातून डिसले यांनी क्रमिक पुस्तकातील पाठावर आधारित क्यूआर कोड पद्धत तयार केली. 
    2) याचा प्रथम प्रयोग त्यांनी शाळेतील 9 विद्यार्थ्यांच्या अध्यापनात केला. त्याचे रिझल्ट मिळाल्यानंतर ही पद्धत माढा तालुक्यातील सर्व शाळांमध्ये राबविण्यात आली. 
    3) 2015 साली महाराष्ट्र शासनाने या पद्धतीचा सहावीच्या क्रमिक पुस्तकामध्ये केला. याचे अतिशय चांगले सकारात्मक परिणाम दिसून आले. सध्या शासनाने संपूर्ण अभ्यासक्रमात क्यूआर कोडचा वापर केलेला आहे. 
    4) जगभरातील 11 देशांतील शाळांमध्ये क्यूआर कोडचा वापर केला जात आहे.
    5) 2021 पासून ही क्यूआर कोड पद्धत भारतातील सर्व शाळांमधील पाठ्यपुस्तकात वापरली जाणार आहे. 

    •• लेट्स क्रॉस द बॉर्डर व पीस आर्मी -
     
    1) देशातील शांततेवर देशाचा विकास अवलंबून असतो, हे लक्षात घेऊन रणजितसिंह डिसले यांनी भारत-पाकिस्तान, इराण-इराक, इस्राईल-पॅलेस्टाईन आणि अमेरिका-उत्तर कोरिया या आठ देशांतील नागरिकांना काय वाटते, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 
    2) या देशात एकमेकांच्या विरोधात माथी भडकाविण्याचे काम संधिसाधू व्यक्ती व गटांकडून होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह डिसले यांनी ’लेट्स क्रॉस द बॉर्डर’ हा प्रोजेक्ट राबविला. याअंतर्गत त्यांनी या 8 देशांतील 5 हजार विद्यार्थ्यांची ’पीस आर्मी’ तयार केली. 
    3) या देशांमध्ये ज्या-ज्या वेळी तणाव निर्माण होईल, त्या-त्या वेळी हे विद्यार्थी एकमेकांशी संपर्क साधून त्या-त्या देशातील जनजीवनाविषयी व सर्वसामान्य लोकांच्या भावनांविषयी जाणून घेतात आणि प्रसारमाध्यमातून येणार्‍या खोट्या बातम्यांचा पर्दाफाश करतात.  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरही भारत आणि पाकिस्तानमधील विद्यार्थ्यांनी एकमेकांशी चर्चा करून दोन्ही देशांतील जनभावना जाणून घेतल्या, तेव्हा वास्तव काही वेगळेच आणि प्रसारमाध्यमातून काही वेगळेच जनेतसमोर आणले जात असल्याचे निरीक्षण त्यांनी नोदवले. 

    •• वृक्षवाढीसाठी अराउंड द वर्ल्ड -
    1) विद्यार्थ्यांना गणितातील संख्याज्ञान, क्षेत्रफळ आदी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी डिसले गुरुजींनी आकुंभे (ता. माढा, जि. सोलापूर) गावाची निवड करून प्रथम मुलांना गावातील झाडांची गणती करायला सांगून प्रात्यक्षिकातून गणन शिकविले. 
    2) एखाद्या झाडाच्या बुंध्याशी तसेच फांद्यांच्या विस्तारापर्यंत लांब सुतळी धरून त्रिज्या, त्याच सुतळीने वर्तुळ काढून व्यास, क्षेत्रफळ आदी संकल्पना स्पष्ट केल्या. 
    3) आकुंभे गावातील वृक्षलागवडीखाली असणारे एकूण क्षेत्र किती, याचा आराखडा तयार केला. तो केवळ 21 टक्के एवढा भरला. पर्यावरणाच्या दृष्टीने तो 33 टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी त्यांनी ’अराउंड द वर्ल्ड’ हा उपक्रम राबविला. 
    4) गावातील प्रत्येक झाडास एक ’क्यूआर कोड’ देऊन तो त्या झाडाच्या बुंध्यावर डकवला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईल नंबरशी तो कोड जोडला. त्यामुळे, जर कोणी एखादे झाड तोडण्याच्या प्रयत्न केला तर त्या झाडाचा क्यूआर ज्या मोबाईलला कनेक्ट केलेला आहे, त्या मोबाईलवर रेड सिग्नल मिळू लागला. त्यामुळे लगेच त्या लोकेशनवर जाऊन झाड तोडणार्‍या व्यक्तीस झाड तोडण्यापासून परावृत्त केले जाई. 
    5) अगदीच झाड तोडणे अपरिहार्य असेल तर त्या व्यक्तीस 5 रोपे भेट देऊन ती इतर योग्य ठिकाणी लावून ती वाढविण्याची जबाबदारी त्याच्यावर दिली जाते. याचा अतिशय चांगला परिणाम झाला आणि 4 वर्षात आकुंभे गावातील वृक्ष लागवडीखालील क्षेत्र 33 टक्केपर्यंत वाढण्यास मदत झाली. 
    6) पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने वृक्षवाढीसाठी अवलंबलेल्या पद्धतीची अमेरिका, रशिया या देशांबरोबरच यूनोने दखल घेऊन डिसले यांचा सन्मान केला. 

    •• भारतीय शिक्षण पद्धतीत तंत्रज्ञानाचा वापर -
     
            परदेशातील शिक्षण पद्धती व भारतीय शिक्षण पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास करताना रणजितसिंह डिसले यांना जाणवले की भारतात प्रचंड लोकसंख्या हा साक्षरता प्रसारतील मुख्य अडसर आहे. परदेशात 18 ते 20 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असे प्रमाण असते, तर भारतात मात्र हेच प्रमाण प्रतिशिक्षक 60 विद्यार्थी एवढे असते. डिसले यांनी यावर सूचविलेले उपाय- 
    1) भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता परदेशाप्रमाणे शिक्षक नियुक्ती शक्य नसल्याने, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर वाढविला तर शिक्षणाची उद्दिष्टे सहज पूर्ण होऊ शकतात.
    2) शिक्षण क्षेत्र हे राजकारणापासून अलिप्त असले पाहिजे. नेत्यांना आणि मंत्र्यांना शिक्षण पद्धतीत बदल करण्याचे अधिकार असता कामा नये. 
    3) शिक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य असावे. केवळ पाठ्यक्रम पूर्ण करणे एवढेच शिक्षकांचे काम नसून उद्दिष्टे पूर्ण करताना त्याला जे काही प्रयोग अथवा उपक्रम राबवायचे आहेत त्यासाठी शिक्षकांना स्वातंत्र्य आणि प्रोत्साहन मिळाले पाहिजे. 

    •• पालकांचे प्रबोधन -
     
    1) आपल्या मुलांनी शाळेत गेले पाहिजे आणि शिक्षण घेऊन उत्तम नागरिक बनावे, हा विचार पालकांमध्ये रुजविण्यासाठी त्यांनी प्रथम पालकांचे प्रबोधन केले. त्यांनी मुलांना घरी जाऊन तर वेळप्रसंगी शेतामध्ये जाऊन गाडीवर बसवून शाळेत आणले. रणजितसिंह डिसले यांच्या मार्गदर्शनामुळे पालकांना शाळेचे महत्त्व पटू लागले. 
    2) मुलांना शाळेत आनंद वाटला पाहिजे म्हणून पहिले सहा महिने त्यांनी पुस्तकाला साधा हातही लावला नाही. आपल्या मोबाईल व लॅपटॉपच्या साह्याने त्यांनी मुलांना गाणी, गोष्टी, कार्टून यामध्ये रमवून ठेवले. त्यामुळे मुलांमध्ये हळूहळू शाळेविषयी गोडी निर्माण होऊ लागली.

    •• अभ्यासात पालकांचा सहभाग -
     
    1) रणजितसिंह डिसले गुरुजींनी शिक्षण प्रक्रियेमध्ये समाजाला सामावून घेताना एक अनोखा उपक्रम राबविला. शालेय अभ्यासक्रम पूर्ण करताना तो विद्यार्थ्यांना कधीही रटाळ वाटता कामा नये, याची त्यांच्याकडून विशेष दक्षता घेतली जात होती. पण त्याचवेळी पालकांनीही घरी मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे, या हेतूने त्यांनी घरचा अभ्यास पालकांच्या मोबाईलवर पाठविण्यास सुरवात केली. त्यामुळे शाळा सुटायच्या आधी पालकांना मुलांनी घरी करावयाच्या अभ्यासाविषयी कल्पना मिळू लागली. दररोज किमान 1तास तरी पालकांनी आपल्या पाल्याच्या अभ्यासासाठी दिला पाहिजे, असे रणजितसिंह डिसले यांचे मत आहे.

    •• अलार्म ऑन, टीव्ही ऑफ -
     
    1) पालकांनी आपल्या पाल्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवे यासाठी डिसले गुरुजींनी एक युक्ती केली, ती म्हणजे ‘अलार्म ऑन - टीव्ही ऑफ’. रोज रात्री 7 वाजता संपूर्ण गावाला ऐकू जाईल असा अलार्म वाजवला जातो. अलार्म वाजताच घराघरांत चालू असणारे सर्व टीव्ही बंद करून सर्व पालक आपापल्या पाल्यांना घेऊन अभ्यासाला बसतात. याचेही अनेक सकारात्मक परिणाम दिसून आले.

    •• डिसले यांचे शिक्षण क्षेत्राबाबतचे विचार -
     
    1) चांगलं शिक्षण मिळणं हा मुलांचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षकांना पुरेसा आदर मिळायला पाहिजे.
    2) ग्रामीण पालकांमध्ये मुलांच्या शिक्षणाविषयी उदासिनता असल्याने, ग्रामीण भागातील पालकांनी मुलांच्या शिक्षणाविषयी अधिक काळजी करायला पाहिजे. शिक्षणातली गुंतवणूक ही केवळ मुलांचं भविष्य उजळवत नाही तर त्यामुळे घराची आर्थिक परिस्थितीही उंचावते.
    3) शासकीय यंत्रणा, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या बिगर सरकारी संस्थांमध्ये समन्वय वाढला तर सरकारी शाळा अधिक सुधारतील. सध्या प्रत्येकजण अलिप्तपणे काम करताना दिसत आहे. मोठा बदल घडवण्यासाठी टीम वर्क गरजेचं आहे. 
    4) सरकारी शाळा अधिक कार्यक्षम करण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि शिक्षण व्यवस्था यांच्यात समन्वय पाहिजे. तसं झालं तर सरकारी शाळेतील शिक्षणाचा दर्जा आणखी वाढेल. 
    5) सरकारने शिक्षण क्षेत्रातल्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी आर्थिक गुंतवणूक करणं फार गरजेचं आहे.


    प्रश्‍नमंजुषा (44)
     
    1) डॉ. रतन लाल यांनी विकसित केलेल्या कोणत्या तंत्राचा अवलंब केल्यास जमिनीतील पाण्याचे संरक्षण होण्याबरोबरच पोषणमूल्ये, कर्ब वायू, सेंद्रिय पदार्थ जमिनीत मुरून राहतात ?
    अ) आवरण पिके (कव्हर क्रॉपिंग)
    ब) पालापाचोळ्यांचा वापर (मल्चिंग)
    क) वनानांगरणी शेती
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    1) फक्त अ 
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    2) डॉ. रतन लाल  कोणत्या विद्यापीठातील ‘कार्बन व्यवस्थापन आणि विलगीकरण केंद्रा’चे संस्थापक संचालक आहेत ?
    1) ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठ
    2) नायजेरियातील आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन संस्था
    3) मनिला येथील आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था
    4) अमेरिकेतील ओहियो विद्यापीठ
     
    3) कोणत्या कार्यासाठी डॉ. रतन लाल यांना ‘कृषी क्षेत्रातील नोबेल पुरस्कार’ अशी ओळख असलेला ‘जागतिक अन्न पुरस्कार 2020’ देऊन सन्मानित करण्यात आले ?
    अ) कृषी क्षेत्रातील मातीची गुणवत्ता वाढविणे.
    ब) अल्पभूधारक शेतकर्‍यांना मदत करणे.
    क) अन्नधान्याचा जागतिक पुरवठा वाढवणे.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    4) कोणत्या योगदानामुळे युवा संशोधक  किशोरी गीतांजली रावची टाइम मॅगझीनच्या पहिल्या ’किड ऑफ द ईअर’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली ?
    अ) गांजाच्या नशेपासून मुक्त होण्याचे संशोधन 
    ब) दुषित पेयजलाच्या नशेपासून मुक्त होण्याचे संशोधन 
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    5) रणजितसिंह डिसले यांनी वाटप केलेली ग्लोबल टीचर पुरस्काराची रक्कम कोणत्या देशातील शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातल्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी मिळणार नाही?
    1) इटली, ब्राझिल व व्हिएतनाम 
    2) नायजेरिया, दक्षिण आफ्रिका व मलेशिया
    3) दक्षिण कोरिया, अमेरिका व यूके
    4) श्रीलंका, नेपाळ व बांग्ला देश
     
    6) ग्लोबल टीचर पुरस्काराशी संबंधी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
    a) पुरस्काराची रक्कम 1 मिलियन पौंडस इतकी आहे.
    b) सदर पुरस्कार मिळवणारे सोलापूरचे रणजितसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक आहेत. 
    c) या पुरस्काराची घोषणा दरवर्षी लंडन येथे केली जाते.
    d) सदर पुरस्कार उच्च शिक्षणातील योगदानासाठी देण्यात येतो. 
    e) सदर पुरस्कारासाठी एका देशातून एका शिक्षकाचे नामांकन केले जाते.
    f) युनेस्को आणि लंडनमधल्या वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात येतो.
    पर्यायी उत्तरे :
    1) (a), (b), (c), (f)
    2) (b), (c), (e), (f)
    3) (a), (d), (e), (f)
    4) (a), (c), (e), (f)
     
    7) रणजितसिंह डिसले यांनी सुरु केलेले नाविण्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम कोणते ?
    अ) पीस आर्मी 
    ब) क्यूआर कोड पद्धत 
    क) अराउंड द वर्ल्ड
    ड) व्हर्च्युअल फिल्ड ट्रीप
    इ) हिट रिफ्रेश
    फ) लेट्स क्रॉस द बॉर्डर 
    ग) अलार्म ऑन, टीव्ही ऑफ 
    पर्यायी उत्तरे :
    1) वरील सर्व
    2) ड आणि इ वगळता सर्व  
    3) इ वगळता सर्व
    4) ड, फ, ग वगळता सर्व
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (44)
    1-4
     
    2-4
     
    3-4
     
    4-3
     
    5-4
     
    6-1

    7-3 

Share this story

Total Shares : 0 Total Views : 376