इस्त्राईलची ’मोसाद’ / प्रश्‍नमंजुषा (38)

  • इस्त्राईलची ’मोसाद’ / प्रश्‍नमंजुषा (38)

    इस्त्राईलची ’मोसाद’ / प्रश्‍नमंजुषा (38)

    • 02 Dec 2020
    • Posted By : Study Circle
    • 819 Views
    • 0 Shares

     इस्त्राईलची ’मोसाद’

    नोव्हेंबर 2020 मध्ये इराणच्या अणु कार्यक्रमाचे जनक म्हणून ओळखले जाणारे वैज्ञानिक मोहसेन फखरीजाहेद यांची तेहरानमध्ये हत्या झाली. इराणने या हत्येमागे इस्त्राईलचा हात असल्याचा आरोप केला. त्यामुळे  इस्राईलची गुप्तचर एजेंसी मोसाद चर्चेत आली. जगातील सर्वात खतरनाक गुप्तचर संस्था म्हणून मोसादचं नाव घेतलं जातं. अमेरिकेच्या सीआयएनंतर इस्त्राईलच्या मोसादचा क्रमांक लागतो. 
     
    1) मोसादची स्थापना 13 डिसेंबर, 1949 मध्ये  इस्राईलचे तत्कालीन प्रधानमंत्री डेविड बेन-गूरियन यांच्या सल्ल्याने करण्यात आली होती.  मार्च 1951 मध्ये याला पीएम ऑफिसचा एक भाग बनवण्यात आलं. मोसाद ही पूर्णपणे केवळ पंतप्रधानांनाच उत्तरदायी असते. 
    2) मोसादचे काम गुप्त माहिती गोळा करणे, गुप्त ऑपरेशन चालवणे आणि दहशतवादाविरोधात लढण्याचे आहे.
    3) मोसादचे  सध्याचे  प्रमुख - योसी कोहेन. इस्त्राईल आणि बहारिन, संयुक्त अरब अमिराती आणि सूदानसोबतच्या चर्चेमागे त्यांची महत्वाची भूमिका आहे. 

    • मोसादचं ब्रीदवाक्य : Where no counsel is, the people fall, but in the multitude of counselors there is safety -   जेव्हा माहिती किंवा माहितगार माणसाची साथ नसते, तेव्हा तुमचं पतन होतं, पण जेव्हा तुम्हाला सल्ला द्यायला अनेक लोक असतात, तेव्हा तुम्ही सुरक्षित असता.

    • मोसादच्या यंत्रणेचे दोन भाग - 
     
    1) किटोन - दहशद्वाद्यांशी मुकाबला हे त्यांचे काम. 
     
    2) मेटसाद - यांचे काम शत्रूवर हल्ला, हत्या घडवून आणणे, मारहाण, आतंकी कट उधळून लावणे अशी त्यांची जबाबदारी आहे.

    • जगभरातील  महत्त्वाच्या गुप्तहेर संघटना -
     
    1) अमेरिकेची सीआयए
     
    2) इस्रायलची मोसाद
     
    3) रशियाची केजीबी
     
    4) चीनची मिनिस्ट्री ऑफ स्टेट अँड सिक्युरिटी 
     
    5) भारताची रॉ
     
    6) ब्रिटनची एम.आय.5 व एम.आय.6 (निर्मिती 1909)
     
    7) पाकिस्तानची आय.एस.आय.

    • अमेरिकेची सी.आय.ए. ही जगातली सर्वात मोठी गुप्तचर संस्था आहे. एक लाखाहून जास्त एजंट्स आज तिथे वेगवेगळ्या प्रकरणांवर काम करत आहेत. शिवाय अनेक अर्धवेळ सी.आय.ए. एजंट्स - ज्यांना सी.आय.ए.च्या भाषेत गोफर gofer असं म्हणतात, ते 5-6 लाखांच्या घरात आहेत. नाझी जर्मनीच्या ताब्यात गेलेल्या युरोपमध्ये हेरगिरी करण्यासाठी अमेरिकेने ओएसएस Office of Strategic Services (OSS)  नावाची संस्था स्थापन केली. युद्धानंतर ओएसएस OSS   बरखास्त करण्यात आली, पण त्याच वेळी सोविएत रशियाबरोबर चालू झालेल्या शीतयुद्धाने अमेरिकेला हा निर्णय बदलावा लागला आणि सी.आय.ए.ची स्थापना करण्यात आली, ज्यात ओएसएस मध्ये काम केलेल्या अनेक लोकांचा समावेश होता. 
     
    • झारकालीन रशियामध्ये ‘ओखराना ’ ही अत्यंत प्रभावशाली आणि कार्यक्षम अशी सरकारी गुप्तचर संस्था होती. झारने त्यांचे सल्ले, विशेषतः रास्पुतिनबद्दलचे ऐकले असते, तर रशियन राज्यक्रांती टाळता आली असती असं अनेक इतिहासकारांचं मत आहे. रशियन राज्यक्रांतीनंतर रशियामध्ये यादवी युद्धाचा डोंब उसळला होता. तेव्हा स्टॅलिनने ‘चेका’ नावाची संघटना उभारली होती. नंतर तिचं रुपांतर एन.के.व्ही.डी. आणि नंतर के.जी.बी. मध्ये झालं.
     
     
    •• मोसादची महत्त्वाची ऑपरेशन्स -
     
     
    1) ऑपरेशन थीफ- इस्रायली गुप्तचर संघटनेची महत्त्वपूर्ण कामगिरी 
     
    2) ऑपरेशन इंजिनीयर - कॅप्टन इस्रायलचा द्रोह 
     
    3) ऑपरेशन पिग्मेलियन - सोव्हिएत हेर हेरेलच्या कचाट्यात 
     
     
    4) ऑपरेशन अत्तिला- अडॉल्फ आईकमानचे धाडसी अपहरण 
     
    5) ऑपरेशन टायगर कब - बालक जेसेल शुमाकर मोसादच्या वाँटेड लिस्टवर 
     
    6) ऑपरेशन पेनिसिलीन - इराकी मिग-21 चे धाडसी हरण 
     
    7) ऑपरेशन ब्लँकेट - सिरीयन कुमारिकांची सुटका 
     
    8) ऑपरेशन नोहाज आर्क - फ्रान्समधून मिसाईल बोटींचे साहसी हरण 
     
    9) ऑपरेशन आयसोटोप - हवाई चाच्यांच्या ताब्यांतून प्रवाशांची सुटका 
     
    10) ऑपरेशन ऑपेरा - इराकी अणुभट्टीचा विनाश 
     
    11) ऑपरेशन मोझेस - इथियोपियन यहुद्यांची सुटका 
     
    12) ऑपरेशन कानियुक - फरारी अणुहेर मोसादच्या मदनिकेच्या कचाट्यात 
     
    13) ऑपरेशन ऑर्चर्ड - सिरीयन अणुप्रकल्पाविरूद्धची कारवाई 
     
    14) ऑपरेशन प्लाझ्मा स्क्रीन : दुबईतील गाजलेली मोहीम 

    ••• 2018 मध्ये इराणच्या अणु कार्यक्रमाचे कागदपत्रे चोरी करण्यामागे मोसाद होती. त्यावेळी मोसादने इराणचे अणु अर्काईव्ह अझरबैजानच्या मार्गे इस्त्राईलमध्ये आणले होते. मोसादने इराणमध्ये अनेक हत्या घडवून आणल्या आहेत. इराणच्या 5 अणु शास्त्रज्ञांची हत्या झाली असून या पाचही वैज्ञानिकांची कामावर जाताना किंवा कामावरुन परतत असताना हत्या करण्यात आली. 
     
     
    ••• 2010-  अणुशास्त्रज्ञ मसूद अली मोहम्मदी यांना रिमोट-कंट्रोल्ड बॉम्बने उडवण्यात आलं होतं.
    •
    •• 2010 - अणुशास्त्रज्ञ माजिद शहरियार यांच्या कारवर बॉम्ब फोडून हत्या करण्यात आली होती. 
    •
    •• 2011 - अणुशास्त्रज्ञ दारिउश  रेझानिजाद  यांना गोळ्या घातल्या गेल्या होत्या.
    •
    •• 2012 - अणुशास्त्रज्ञ मुस्तफा आह्मदी रोशन यांची मोटारसायकल बॉबस्फोटाद्वारे हत्या करण्यात आली.
    •
    •• 2020 - अणुशास्त्रज्ञ मोहसेन फखरीजादेह यांच्या कारवर मशिनगनद्वारेगोळीबार करुन हत्या करण्यात आली. 

    • मोसादच्या कारवाया -
     
    1) 1972 मध्ये म्यूनिक ऑलिम्पिक दरम्यान इस्त्राईल ऑलिम्पिक टीमच्या 11 खेळाडूंना त्यांच्या हॉटेलमध्ये पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी मारले. हे कृत्य Black September आणि Palestine Liberation Organization  नी केलं होतं. या घटनेनंतर पेटून उठलेल्या इस्त्राईलने बदला घेण्याची योजना बनवली. त्यानंतरच्या 20 वर्षात मोसादने जगाच्या कानाकोपर्‍यात जाऊन सर्व आरोपींना संपवलं. प्रत्येक आरोपीला 11 गोळ्या घालण्यात आल्या, 11 खेळाडूंच्या बदल्यात 11 गोळ्या असा त्याचा अर्थ होता.

    2) पॅलेस्टिनचे नेता यासिर अराफात यांचा उजवा हात असलेला अबू जिहाद ट्यूनीशियात लपला होता. अबू जिहाद मोसादच्या हिट लिस्टमध्ये होता. त्याला मारण्यासाठी 30 एजेंट कामाला लागले. सर्व एजेंट हळूहळू ट्यूनिशियात पोहोचले. काहींनी बेकायदेशीररित्या तेथील सैनिकांचा यूनिफॉर्म घातला होता. सर्व एजेंट अबू जिहादच्या घरात घुसले. सुरुवातीला त्याच्या सुरक्षारक्षकांना मारण्यात आले, नंतर अबू जिहादला 70 गोळ्या मारण्यात आल्या. 

    3) मोसादने दुबईमध्ये ज्यू सैनिकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असलेल्या महमूद अल मबूह याला हॉटेलमध्ये असताना इंजेक्शन देऊन मारलं होतं.

    इस्राईल आणि मोसादच्या निर्मितीचा इतिहास -
     
    ••• जॉर्डन, सीरिया, लेबेनॉन  हे भूभाग सोळाव्या शतकापासून ते विसाव्या शतकापर्यंत 400 वर्षे तुर्कस्तानमधल्या ऑटोमन साम्राज्याचा भाग होते. 
     
    ••• 1914 ते 1918 या काळात झालेल्या पहिल्या जागतिक महायुद्धात तुर्कस्तान जर्मनीच्या बाजूने लढला होता आणि युद्धात पराभूत झाला होता. 
     
    ••• 1920 मध्ये फ्रान्समधील सेव्हरेस या ठिकाणी ब्रिटन आणि फ्रान्स यांनी तुर्कस्तानचा मूळ प्रदेश सोडून बाकीचं सगळं ऑटोमन साम्राज्य वाटून घेतलं. या साम्राज्यात असलेला सीरियाचा प्रदेश फ्रान्सला मिळाला आणि पॅलेस्टाईनवर ब्रिटनचा ताबा प्रस्थापित झाला. 
     
    ••• 2 नोव्हेंबर 1917 रोजी ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री आर्थर जेम्स बाल्फोर यांनी ब्रिटनमधल्या ज्यू धर्मियांचे नेते वॉल्टर रॉथशील्ड यांना जे पत्र पाठवलं होतं, ते बाल्फोर जाहीरनामा म्हणून प्रसिद्ध झालं. बाल्फोरनी ज्यू लोकांसाठी मातृभूमी द्यायचं किंवा त्यासाठी प्रयत्न करायचं आश्वासन दिलं होतं, पण त्याचबरोबर इतर जमाती किंवा लोकांचे हक्क डावलण्यात येणार नाहीत असंही म्हटलं होतं. 
     
    ••• पॅलेस्टाईनमध्ये मध्ययुगीन काळापासून ज्यू येऊन वसती करायला लागले होते. जेव्हा जेव्हा पूर्व युरोपियन प्रदेशांमध्ये - पोलंड, युक्रेन, रोमानिया, रशियन साम्राज्य - ज्यू धर्मियांवर अत्याचार व्हायचे, तेव्हा ते पॅलेस्टाईनचा आश्रय घ्यायचे. त्यामुळे तिथे ज्यूंची संख्या वाढलेली होती. त्याच सुमारास पश्रि्चम युरोपियन देशांमध्ये ज्यूंना अनेक हक्क मिळत होते. परिणामी आपली स्वतंत्र मातृभूमी असली पाहिजे हा विचार पूर्व युरोपियन ज्यूंमध्ये प्रबळ व्हायला लागला. जेव्हा सेव्हरेस करारामध्ये बाल्फोर जाहीरनाम्याचा समावेश झाला, तेव्हा या विचाराने उचल खाल्ली.
     
    ••• ज्यू राष्ट्राची पॅलेस्टाईनच्या पवित्र भूमीत स्थापना व्हावी म्हणून चालू झालेल्या झिओनिस्ट चळवळीला मोठ्या प्रमाणात आश्रय मिळायला लागला. 
     
    ••• 1933 मध्ये जर्मनीमध्ये नाझी राजवट प्रस्थापित झाल्यावर पश्रि्चम युरोपियन ज्यूसुद्धा पॅलेस्टाईनमध्ये यायला लागले. 
     
    ••• 1945 मध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध संपुष्टात आलं, तेव्हा ज्यूंची संख्या पॅलेस्टाईनच्या संपूर्ण लोकसंख्येच्या एक तृतीयांश झालेली होती. त्यात जर्मन छळछावण्या आणि मृत्युछावण्यांमधून वाचलेल्या ज्यूंचाही समावेश होता. 
     
    ••• महायुद्ध संपल्यावर ब्रिटन आणि फ्रान्स ही दोन्हीही राष्ट्रे कमजोर झालेली होती. त्यामुळे त्यांच्या वसाहतींमधून स्वातंत्र्याची मागणी जोरात व्हायला लागली. ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान चर्चिल आणि त्यांचा पक्ष पराभूत झाले आणि क्लेमंट अ‍ॅटली यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्षाचं सरकार सत्तेवर आलं. या सरकारचा वसाहतींच्या स्वातंत्र्याला तात्विक पाठिंबा होता आणि आर्थिक कारणांमुळे वसाहती चालवणं शक्य नाही याची जाणीवसुद्धा होती. या सरकारने पॅलेस्टाईन प्रश्‍न नव्याने स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाकडे सोपवला.
     
    ••• राष्ट्रसंघाने नियुक्त केलेल्या समितीने पुढीलप्रमाणे पॅलेस्टाईनची फाळणीचा तोडगा सुचवला-
     
    1) एक अरब संघराज्य
    2) एक ज्यू संघराज्य 
    3) जेरुसलेमवर आंतरराष्ट्रीय नियंत्रण. 
     
    •• अमेरिकेने राष्ट्रसंघाच्या या योजनेला पाठिंबा दिला. या तोडग्यामुळे ज्यूंना आनंद झाला,पण अरब नेते संतापलेे. 
     
    ••• पॅलेस्टाईनमध्ये यादवी युद्ध सुरु झाल्याने पॅलेस्टाईनमधल्या ज्यूबहुल भागांमधून 1 लाख अरबांनी स्थलांतर केलं. त्यामुळे अमेरिकेचा असा समज झाला की  पॅलेस्टाईनची फाळणी करायची गरज नाही आणि त्यांनी या योजनेला असलेला पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे पॅलेस्टाईनमधल्या अरब नेत्यांचं मनोधैर्य उंचावलं. 
     
    ••• पॅलेस्टाईनमधल्या अरब नेत्यांना इजिप्त, इराक, सीरिया, सौदी अरेबिया या अरब देशांच्या ‘अरब लीग’ चा पाठिंबा मिळाला.
     
    ••• फेब्रुवारी 1948 मध्ये ब्रिटिशांनी ट्रान्सजॉर्डनच्या (जॉर्डनचं आधीचं नाव) सरकारला पॅलेस्टाईनच्या अरबबहुल भागाचा ताबा घ्यायची परवानगी दिली. पण त्यांनी ज्यूबहुल विभागातही घुसखोरी करायला सुरुवात केली.
     
    ••• झिओनिस्ट ज्यूंनी स्वतःचं सैन्यदल आणि गुप्तचर संघटना स्थापन केल्या होत्या. यांना अनुक्रमे हॅगन्हा आणि शाई (Hagannah  Shai) अशी नावं होती. 
     
    ••• ज्यू नेता डेव्हिड बेन गुरियनने हॅगन्हामध्ये भरती होण्याचं प्रत्येक प्रौढ स्त्रीपुरुषांना आवाहन केलं. दरम्यान सोविएत रशियाने झिओनिस्ट चळवळीला पाठिंबा जाहीर केला. अमेरिकेतून ज्यू हितचिंतकांनी दिलेल्या पैशातून रशियन शस्त्रास्त्रे विकत घेऊन हॅगन्हाचे सैनिक अरब लीगचा मुकाबला करायला सिद्ध झाले. हॅगन्हाचं नेतृत्व यीगेल यादीन या धुरंधर सेनानीकडे होतं. त्याच्या नेतृत्वाखाली हॅगन्हाने टायबेरियस, हैफा, जाफा, साफेद, बीसान आणि एकर ही सगळी महत्वाची शहरं दोन महिन्यांत आपल्या ताब्यात आणली.
     
    ••• मे 1948 मध्ये आपण पॅलेस्टाईन सोडणार असल्याचं ब्रिटीश पंतप्रधान अ‍ॅटली यांनी जाहीर केलं. त्याप्रमाणे 14 मे 1948 या दिवशी शेवटचा ब्रिटीश सैनिक पॅलेस्टाईनमधून बाहेर पडला आणि त्याच दिवशी डेव्हिड बेन गुरियनने तेल अवीवच्या म्युझियममध्ये इझराईल या ज्यू राष्ट्राची घोषणा केली. 
     
    ••• चाइम वाईझमन या देशाचे प्रथम राष्ट्रपती आणि डेव्हिड बेन गुरियन पंतप्रधान बनले. अमेरिका आणि रशिया या महासत्तांनी या नवीन देशाला मान्यता दिली.
     
    ••• अरब लीगने इस्राईलवर आक्रमण केलं. अरब लीगमध्ये सौदी अरेबिया, इराक, इजिप्त, सीरिया, ट्रान्सजॉर्डन आणि लेबेनॉन यांचा म्हणजे इस्राईलच्या सर्व शेजार्‍यांचा समावेश होता. सुरुवातीच्या पीछेहाटीनंतर हळूहळू हॅगन्हाच्या सैनिकांनी अरब सैन्याला पाठी रेटायला सुरुवात केली आणि अरब पॅलेस्टाईनमधले काही भाग आपल्या टाचेखाली आणले. नोव्हेंबर 1948 पर्यंत मोठ्या लढाया बंद झाल्या आणि किरकोळ चकमकी उडायला सुरुवात झाली.
     
    ••• फेब्रुवारी 1949 मध्ये इस्राईल आणि इजिप्त यांनी युद्धबंदी जाहीर केली. बाकीची अरब राष्ट्रे अजूनही युद्धाच्या आवेशात होती, पण युद्धाचा आर्थिक बोजा सहन करायची तयारी नसल्यामुळे हळूहळू एकेकाने काढता पाय घ्यायला सुरुवात केली.
     
    ••• मार्च 1949 मध्ये लेबेनॉन, एप्रिलमध्ये ट्रान्सजॉर्डन आणि सर्वात शेवटी जुलैमध्ये सीरिया यांनी युद्धबंदी जाहीर केली.
     
    ••• इराक आणि सौदी अरेबिया प्रत्यक्ष युद्धात फार कमी सहभागी होते आणि त्यांच्या सरहद्दी इस्राईलला लागून नव्हत्या. त्यामुळे त्यांनी एकतर्फी युद्धबंदी केल्यावर इस्राईलनेही त्यांच्याशी युद्धबंदी जाहीर केली.
     
    ••• संयुक्त राष्ट्रसंघाच्या मध्यस्थीने इस्राईल आणि उर्वरित अरब पॅलेस्टाईन यांच्या नवीन सीमारेषा ठरवण्यात आल्या. पण अरब राष्ट्रांना त्या मान्य नव्हत्या. त्यामुळे पुढेमागे या राष्ट्रांशी आपल्याला लढावं लागणार हे इस्राईलच्या राजकारण्यांना आणि सेनाधिकार्‍यांना कळून चुकलं. त्यामुळे पंतप्रधान बेन गुरियन यांच्या पुढाकाराने एक गुप्तचर संस्था चालू करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यावेळी इस्राईलमध्ये तीन प्रमुख गुप्तचर संस्था होत्या.
     
    1) अमान (अचअछ) ही सैन्याची गुप्तचर संघटना
    2) शन बेत (डहळप इशीं) ही अंतर्गत सुरक्षितता सांभाळणारी संघटना 
    3) परराष्ट्रखात्याचा राजकीय विभाग (झेश्रळींळलरश्र ऊशरिीीांशपीं).
    त्यांचा समन्वय साधण्यासाठी 13 डिसेंबर 1949 रोजी  हिब्रू भाषेत मोसाद ही संस्था स्थापन करण्यात आली.


    प्रश्‍नमंजुषा (38)
     
    1) मोसादची स्थापना 13 डिसेंबर, 1949 मध्ये झाली त्यावेळी इस्राईलचे राष्ट्रपती कोण होते ?
    1) योसी कोहेन
    2) यीगेल यादीन
    3) डेविड बेन-गूरियन
    4) चाइम वाईझमन
     
    2) अरब लीगमध्ये समाविष्ट असलेले यांचा कोणत्या देशांची सीमा इस्रााईलला लागून आहे?
    अ) इजिप्त
    ब) सौदी अरेबिया
    क) सीरिया
    ड)  इराक
    इ) जॉर्डन 
    फ) लेबेनॉन 
    ग) पॅलेस्टीन
    1) वरील सर्व
    2) ड आणि फ वगळता सर्व  
    3) ब आणि ड वगळता सर्व
    4) ड, फ, ग वगळता सर्व
     
    3) खाली दोन विधान दिलेली आहेत (अ) विधान असून (र) हे कारण आहे खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
    विधान (अ) : ब्रिटनमधील मजूर पक्षाच्या सरकारचा वसाहतींच्या स्वातंत्र्याला तात्विक पाठिंबा होता. 
    कारण (र) :  दुसर्‍या महायुद्धानंतर क्लेमेंट अ‍ॅटली यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्षाचं सरकार सत्तेवर आले.
    पर्यायी उत्तरे :
    (1) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
    (2) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
    (3) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
    (4) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
     
    4) सोळाव्या शतकापासून ते विसाव्या शतकापर्यंतजॉर्डन, सीरिया, लेबेनॉन  हे भूभाग कोणत्या साम्राज्याचा भाग होते ? 
    1) इरशियन झार
    2) ब्रिटन साम्राज्य
    3) ऑटोमन साम्राज्य
    4) टर्की साम्राज्य
     
    5) सी.आय.ए.संबंधी खालील विधाने विचारात घ्या:
    a) जगभरच्या अर्धवेळ सीआयए एजंट्सना गोफर म्हणतात.
    b) नाझी जर्मनीच्या ताब्यात गेलेल्या युरोपमध्ये हेरगिरी करण्यासाठी अमेरिकेने सीआयएची स्थापन केली. 
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    1) फक्त (a)
    2) फक्त (b)
    3) (a) व (b) दोन्ही
    4) दोन्हीही नाहीत 
     
    6) झिओनिस्ट चळवळ कशाच्या निर्मितीसाठी कार्यरत होती ?
    1) मोसाद
    2) अरब लीग
    3) इस्राईल
    4) पॅलेस्टाईन
     
    7) खालील जोड्या जुळवा :
    स्तंभ अ (गुप्तहेर संघटना ) स्तंभ ब (देश)
    अ. मिनिस्ट्री ऑफ स्टेट अँड सिक्युरिटी  I.      पाकिस्तान
    ब. एम.आय.6    II.     ब्रिटन
    क. सीआयए  III.    चीन
    ड. आय.एस.आय.  IV.  अमेरिका
    पर्यायी उत्तरे :
    (1) II III I IV
    (2) II I III IV
    (3) III II IV I
    (4) IV III I II
     
    8) पूर्व युरोपियन प्रदेशांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो?
    अ) पोलंड
    ब) युक्रेन 
    क) रुमानिया
    ड) रशिया
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) अ आणि ब
    3) वरील सर्व 
    4) फक्त क आणि ड
     
    9) खालीलपैकी कोणत्या जोड्या अचूक (मोसादची ऑपरेशन्स) आहेत ?
    a) ऑपरेशन पेनिसिलीन - इराकी मिग-21 चे धाडसी हरण 
    b) ऑपरेशन ऑर्चर्ड - सिरीयन अणुप्रकल्पाविरूद्धची कारवाई 
    c) ऑपरेशन नोहाज आर्क - फ्रान्समधून मिसाईल बोटींचे साहसी हरण 
    d) ऑपरेशन मोझेस - इराणी अणुशास्त्रज्ञांची हत्त्या
    e) ऑपरेशन कानियुक - पाकिस्तानी अणुहेर मोसादच्या कचाट्यात 
    f) ऑपरेशन ऑपेरा - इराकी अणुभट्टीचा विनाश 
    पर्यायी उत्तरे :
    1) (a), (b), (c), (f)
    2) (b), (c), (e)
    3) (a), (d), (e), (f)
    4) (a), (c), (e)
     
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (38)
    1-4
     
    2-3
     
    3-2
     
    4-3
     
    5-3
     
    6-3
     
    7-3
     
    8-3
     
    9-1

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 819