फ्रान्स आणि इस्लामिक देशांतील तणाव
1 नोव्हेंबर 2020 - बुरख्यावर बंदी, धार्मिक स्थळांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे फ्रान्स आणि इस्लामिक देशांत तणाव आहे. ऑक्टोबरमध्ये इस्लामिक कट्टरवाद्यांनी शिक्षकासह चार जणांच्या केलेल्या हत्येमुळे या वेळी प्रकरण गंभीर बनले. अनेक इस्लामिक देशांनी फ्रान्सच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे जाहीर केले. तुर्की, पाकिस्तान, बांगलादेश, कतार, इराण हे देश त्यात आघाडीवर आहेत. फ्रान्सचा या देशांबरोबर वार्षिक 10 हजार कोटी डॉलर अर्थात सुमारे 7.50 लाख कोटी रुपयांचा व्यापारसंबंध आहे. सर्व इस्लामिक देशांनी फ्रान्सच्या वस्तूंवर बहिष्कार घातल्यास त्याचे परिणाम दोन्ही पक्षांवर पडलेले दिसू शकतात, कारण त्यात फ्रान्स 55 टक्के भाग आयात देखील करतो.
1) फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये धार्मिक विद्वेषातून शिक्षकाची हत्या झाल्यानंतर, नीस शहरातील एका चर्चमध्ये चाकूहल्ल्यात तिघांची हत्या झाली. नीस शहरातील चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आलेल्या एका वृद्ध स्त्रीचे शीर धडावेगळे करण्यात आले. पोलिसांनी संशयितावर गोळी चालवून त्याला लगेच ताब्यात घेतले. नीसचे मेयर एस्त्रोसी यांनी या घटनेची तुलना या शिक्षकाच्या हत्येशी केली. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पॅरिसमधील सॅम्युअल पॅटी नामक शिक्षकांची त्यांच्या शाळेबाहेर हत्या करण्यात आली होती.
2) प्रेषित मुहम्मदांबद्दलच्या कार्टून्सच्या प्रकाशनाची फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी पाठराखण केल्याप्रकरणी काही मुस्लीम बहुसंख्य राष्ट्रांमध्ये झालेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्याकडे बघितले गेले. गेल्या काही दिवसांत टर्की व फ्रान्सच्या संबंधांमध्ये कडवटपणा आलेला असूनही नीसमधील हल्ल्याचा टर्कीतर्फे तीव्र निषेध करण्यात आला.
3) फ्रान्सला 2015-16 मध्ये दहशतवादी हल्ल्यांचा जेवढा धोका होता, तेवढाच धोका आजही आहे. चार्ली हेब्दो, बाटाक्लान, नीसमधील लॉरी हत्या आणि फादर हामेल यांची रौएंमधील चर्चमध्ये झालेली हत्या या भीषण दहशतवादी हल्ल्यांच्या स्मृती जाग्या झाल्या. त्या काळात परिस्थिती खूप वाईट होती, खूप लोक मारले गेले होते.
4) 2016 साली नीस शहराला लक्ष्य करून दहशतवादी हल्ला झाला होता. 14 जुलै 2016 रोजी एका ट्युनिशिअन व्यक्तीने बेस्तील दिन साजरा करणार्या गर्दीत ट्रक घातला होता. यात 86 जणांचा मृत्यू झाला होता.
5) इस्लामी दहशतवाद भयावह वाटत आहे याचे एक कारण सॅम्युअल पॅटी यांची हत्या हे असू शकते. एका साध्या इतिहासाच्या शिक्षकाची हत्या होऊ शकते आणि ती रॅण्डम पद्धतीने होत नाही, तर हत्येसाठी निवडला जातो ही बाब फ्रेंच जनतेसाठी हादरवून टाकणारी आहे. नीसमधील चर्चमध्ये प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेलेल्या ख्रिश्चन धर्मीयांवर झालेला हल्लाही याच प्रकारचा आहे.
6) नीस हत्याकांडाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी फ्रान्सच्या संसदेत एक मिनिटभर शांतता पाळण्यात आली. हा हल्ला पाशवी आणि भ्याड होता, अशी टीका पंतप्रधान जाँ कास्ते यांनी संसदेत केली. फ्रेंच कौन्सिल ऑफ मुस्लीम फेथने नीसमधील हल्ल्याचा निषेध केला. फ्रान्सच्या पाठीशी ठामपणे उभा आहे अशी ग्वाही ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिली.