पुलवामा हल्ल्याची पाकची कबुली
1 नोव्हेंबर 2020 - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याची कबुली देऊन पाकिस्तानने दहशतवादाने बरबटलेले अंतरंग स्वत:च जगासमोर उघड केले. देशातील सरकारविरोधी प्रचंड दबावाने तेथील नेत्यांना तोंड उघडत भारतद्वेषाचे प्रदर्शन घडवावे लागले. पुलवामाच नव्हे तर जम्मू-काश्मीर सीमेवर घडणार्या प्रत्येक हिंसक घटनेला पाकिस्तान जबाबदार आहे.
1) पुलवामामध्ये 4 फेब्रुवारी 2019 ला सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला होऊन 44 भारतीय जवानांचे बळी गेले होते. भारतीय यंत्रणांनी त्यावेळी या संपूर्ण घटनेचा तपास करून पाकिस्ताननेच हा हल्ला घडवून आणला, असा निष्कर्ष काढला होता. परिणामत: अमेरिका व इतर देशांकडून मिळणारी मदत बंद होण्याच्या भीतीने पाकिस्तानने हा भारताचा अंतर्गत मामला असून, पाकिस्तानचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचा कांगावा केला होता. मात्र 20 महिन्यांनी पाकिस्तानला या हल्ल्याची कबुली द्यावी लागली. पाकिस्तानच्या संसदेतच इम्रान खान सरकारचे मंत्री फवाद चौधरी यांनी, पुलवामा की कामयाबी हमारे कौम की कामयाबी है,असे सांगत आम्ही भारताला भारतात घुसून मारले. पुलवामामध्ये आम्हाला जे यश मिळाले, ते इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे यश आहे, अशी दर्पोक्ती केली.
2) या हल्ल्याची जबाबदारी त्यावेळी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. फवाद यांच्या या कबुलीमुळे या संघटनेला पाकिस्तान सरकारचे समर्थन आहे, हे पुन्हा सिद्ध झाले.
3) भारत द्वेषामुळे पाकिस्तानला स्वतःच्या प्रगतीचाही विसर पडला. त्या देशाला दारिद्र्य, उपासमार, अंधश्रद्धा, दहशतवाद, भ्रष्टाचार यांसारख्या असंख्य व्याधींनी ग्रासले आहे. नागरिकांचे लक्ष या प्रश्नांकडे वळू नये यासाठी भारतद्वेषाला खतपाणी घालण्याचे धोरण तेथील प्रत्येक सरकारने वेळोवेळी अवलंबिले. भारताविरुद्ध कारवाया केल्या नाहीत तर लष्कर आपली सत्ता हिरावून घेईल, अशी भीती प्रत्येक पाकिस्तानी शासकाला, पूर्वानुभवांमुळे वाटत आली. म्हणूनच दहशतवादाला खतपाणी घालण्याची संपूर्ण मुभा तेथील सरकार आयएसआय आणि लष्कराला देत आले आहे.
4) 1 जानेवारीपासून 7 सप्टेंबर 2019 पर्यंत पाकिस्तानी लष्कराने 3,186 वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केलेे. जम्मू-काश्मीर सीमेवरून दहशतवाद्यांना भारतात घुसविण्याची, पाकिस्तानी लष्कराची असंख्य कारस्थाने भारतीय लष्कराने मोडून काढली.
5) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनेचे 370 वे कलम रद्द करून जम्मू-काश्मीरचा स्वतंत्र दर्जा काढून घेतला आणि जम्मू-काश्मीर व लडाख केंद्रशासित केले. त्यामुळे पाकिस्तान कंठशोष करून गोंधळ माजवेल ही शक्यता गृहीत धरून भारत सरकारने लष्कर आणि वायुदलाला सज्ज राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराला सीमेवर कोणतीही हालचाल करण्याची संधीदेखील मिळाली नव्हती. दहशतवाद्यांना घुसविण्यासाठी सीमेपलीकडे तयार करण्यात आलेली ठिकाणे (लॉन्चिंग पॅड) भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केली. सप्टेंबर 2016 मध्ये ही लॉन्चिंग पॅड उद्ध्वस्त करण्यासाठी पाकच्या हद्दीत शिरून सर्जिकल स्ट्राईक केला होता.
6) पुलवामा हल्ल्यानंतर दोन आठवड्यांत भारतीय वायुसेनेच्या विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथील दहशतवादी तळांवर बॉम्ब वर्षाव करून ते उद्ध्वस्त करून टाकले. पाकिस्तानला चीनचे पाठबळ आहे याची पूर्ण कल्पना असताना भारताने हे धाडस केले. या हल्ल्यात भारतीय वायुदलाचे धाडसी वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे मिग 21 बायसन हे विमान अपघातग्रस्त झाले आणि पाकव्याप्त काश्मीरच्या हद्दीत ते कोसळले. पाकिस्तानी लष्कराने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अत्याचार केले. परंतु, अभिनंदन यांनी या छळाला भीक न घालता कोणतीही माहिती पाकिस्तानी अधिकार्यांना दिली नाही. जगभरातून टीका झाल्यानंतर पाकिस्तानने अभिनंदन यांची सुटका केली.
7) पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते अयाज सादिक यांनी पाकिस्तानी संसदेत एक गौप्यस्फोट केला, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी एका महत्त्वाच्या बैठकीत असे सांगितले होते की विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सुखरूप परत पाठवले नसते तर त्याचदिवशी रात्री नऊ वाजता भारताने पाकिस्तानवर पुन्हा हल्ला केला असता. या बैठकीत लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचे पाय लटलट कापत होते आणि ते घामाघूम झाले होते, असे अयाज सादिक यांचे म्हणणे. यावरून पाकिस्तानने बालाकोट हल्ल्याची किती धास्ती घेतली होती हे लक्षात येते. भारतीय दबावामुळे पाकिस्तानने अभिनंदन यांना तातडीने परत पाठवले हे सादिक यांच्या या विधानावरून स्पष्ट होते. या भारताच्या दाव्याची पुष्टी खुद्द पाकिस्तानने केली.