प्रकाशझोतातील व्यक्ती व स्थळे / प्रश्‍नमंजुषा (55)

  • प्रकाशझोतातील व्यक्ती व स्थळे / प्रश्‍नमंजुषा (55)

    प्रकाशझोतातील व्यक्ती व स्थळे / प्रश्‍नमंजुषा (55)

    • 14 Dec 2020
    • Posted By : Study Circle
    • 267 Views
    • 0 Shares
    राजा जॉन वुरपुत्तूर चारी
     
     
     
            ‘नासा’ने 2024 मध्ये अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्यासाठी निवडण्यात आलेल्या 18 अंतराळवीरांमध्ये भारतीय वंशाच्या राजा जॉन वुरपुत्तूर चारी यांचा समावेश आहे. 43 वर्षांच्या चारी यांनी अमेरिकन हवाई दलात कर्नल पदावर सेवा बजावली आहे. त्यांनी अ‍ॅडव्हान्स्ड फायटर जेट एफ-35 ची जबाबदारीही सांभाळली होती.  कालांतराने ते इंटिग्रेटेड टेस्ट फोर्सचे संचालक बनले. या अंतराळवीरांमध्ये 9 महिला आहेत. 
    अर्टेमिस मून मिशन
    • ‘नासा’ने ‘मिशन 2024’ला ‘अर्टेमिस मून मिशन’ असे नाव दिले आहे.
    •• या मोहिमेत प्रथमच महिला चंद्रावर पाऊल ठेवतील. 
    •• या मोहिमेसाठीचा खर्च - 28 अब्ज डॉलर्स (16 अब्ज डॉलर्स मॉड्यूलवरचा खर्च)
    •• 2017 मध्ये राजा यांची अर्टेमिस मोहिमेसाठी निवड झाली होती.  
    •• 2019 मध्ये त्यांनी बेसिक ट्रेनिंग पूर्ण केले आहे. 
    •• चांद्रमोहिमेबरोबरच ते आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक आणि मंगळ मोहिमेसाठीही काम करीत आहेत. 
    •• अमेरिकेने 1969 ते 1972 या काळात ‘अपोलो-11’ च्या सहाय्याने सहा चांद्रमोहिमा पार पाडल्या आहेत.
    •• कल्पना चावला व सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अंतराळवीरांगनांनी ‘नासा’साठी मोलाचे योगदान दिले आहे. 
     
    गीतांजली राव 
     
     
     
            5 डिसेंबर 2020 -  भारतीय वंशाची अमेरिकन नागरिक 15 वर्षांच्या युवा वैज्ञानिक गीतांजली रावने अनेक महत्त्वाचे शोध लावले आहेत. त्यासाठी न्यूयॉर्कमधल्या ‘टाईम मॅगझिन’कडून तिला ‘किड ऑफ द इअर 2020’ हा सन्मान तिला देण्यात आला.
    •• गीतांजलीला डिस्कव्हरी एज्युकेशनचा ‘यंग सायंटिस्ट चॅलेंज’ पुरस्कार मिळाला आहे.
    •• 30 वर्षांच्या आतील 30 शास्त्रज्ञ या ‘फोर्ब्स’ मासिकाच्या 2019 च्या यादीत तिचं नाव होतं. 
    •• जेनेटिक इंनिनिअरिंगचं एक यंत्र बनवल्यामुळे ‘हेल्थ पिलर प्राईज’ तिला मिळालं.
    •• गीतांजलीनं 30 हजारपेक्षा अधिक मुलांना शिकवलंय.
    •• हॉलीवूडची अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्ती एंजेलिना जोली हिनं गीतांजली रावची मुलाखत घेतली.

    • •  पाण्याचं प्रदूषण शोधणारं यंत्र  - ’टेथीज ’ - 
     1) अमेरिकेतील अनेक राज्ये पाण्यात शिसे या धातूची मिसळ झाल्यामुळे पाणी प्रदूषणाचा सामना करताहेत. पाण्यात शिसे शोधणं ही खूप खर्चिक गोष्ट आहे. 
    2) पाण्यात शिसे धातू आहे की नाही, हे शोधण्यासाठी एका सोप्या यंत्राचा शोध गीतांजलीने लावला.  एका ग्रीक देवतेच्या नावावरून या यंत्राचं नाव ‘टेथीज’ असं ठेवण्यात आलं. काही सेकंद पाण्यात टाकल्यानंतर, या यंत्राला कनेक्ट केलेलं अ‍ॅप पाण्यात किती शिसे आहे, हे सांगू शकतं.
    3) हे यंत्र मोबाईलसारखं दिसतं. त्यात 9 व्होल्टेजच्या बॅटरीचा वापर करण्यात आलाय. शिवाय, त्यात सेन्सिंग युनिट, ब्ल्यूटूथ एक्स्टेंशन आणि एक प्रोसेसरही आहे.

    ••  हेल्थ पिलर  -
    1) हे यंत्र गांजा आणि इतर ड्रग्जच्या व्यसनापासून लांब राहण्यासाठी उपयोगी पडतं.
    2) त्यामुळे गांजा व्यसनाची सुरुवातीची स्टेज आपल्याला समजते.

    ••  ट्रोलर्सना अटकावणारे यंत्र - ‘किंडली’ -
    1) सायबर क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून एक वेगळा शोध गीतांजलीनं लावला. एक फोन आणि वेब यंत्र तयार केलं. ‘किंडली’ नावाचं हे अ‍ॅप आहे. 
    2) कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सायबर गुन्हेगारी आपण क्षणार्धात पकडू शकतो. एखाद्याविषयी जाणूनबुजून चुकीचा शब्द टाईप करत असलो, तर हे फोन किंवा वेब यंत्र आपल्याला एक ऑप्शन देतं. एखाद्याला ट्रोल करण्याच्या हेतूनं आपण लिहीत असू, तर सुधारण्याची एक संधी दिली जाते. 
    3) सायबर क्राईम-सोशल मीडियाचा वापर करून लोकांना अश्लील मेसेज पाठवणं, खासगी फोटोंचा वापर करून फोटो इकडे तिकडे फिरवणं, चुकीची भाषा वापरून लोकांना छळण्याचा प्रयत्न केला जातो. फोटो लीक केले जातात. लोकांना ट्रोल केलं जातं.
    ••• मलाला युसूफजाई, ग्रेटा थनबर्ग ही नावं जगासाठी कुतूहलाचा विषय ठरली. एकीनं तालिबान्यांविरोधात जाऊन मुलींच्या शिक्षणाचा पुरस्कार केला, तर दुसरीनं पर्यावरणाच्या रक्षणासाठी थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना फैलावर घ्यायला कमी केलं नाही. 
     
    शरद पवार
     
     
     
            12 डिसेंबर 2020 - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा  80 वा वाढदिवस. पाच दशकांहून अधिक काळ ते राजकारणात आहेत. बदलत्या राजकारणातही सत्ता टिकवून कशी ठेवायची, यासाठी लागणारं कौशल्य त्यांच्याकडे आहे. 
    ••• 1977 मध्ये आणीबाणीनंतर काँग्रेस फुटली, तिचे इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असे दोन भाग झाले. यशवंतरावांसह महाराष्ट्रातले अनेक नेते रेड्डी काँग्रेसमध्ये गेले त्यात वसंतदादा पाटील व शरद पवारही होते.
    ••• 1978 मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या. दोन्ही काँग्रेसने वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या. त्यानंतरच्या काँग्रेस आघाडी सरकारचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले होते. पुढे सरकारमधील वादानंतर शरद पवार त्यांच्या 40 समर्थक आमदारांसह बाहेर पडले. 
    ••• जुलै 1978 शरद पवारांनी त्यांच्या समाजवादी काँग्रेस च्या पुढाकाराने पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोदची स्थापना केली व 38व्या वर्षी शरद पवार महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. दीड वर्षांहून अधिक काळ हे सरकार चाललं. विधानसभेत मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनी औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असा नामांतर करण्यााचा प्रस्ताव मांडला, तो संमत झाला. पण त्यानंतर मराठवाड्यामध्ये हिंसक प्रतिक्रिया सुरु झाली. दंगली झाल्या. त्याचे स्वरुप सवर्ण विरुद्ध दलित असं होतं. शेवटी या निर्णयाला स्थगिती दिल्यावर मराठवाडा शांत झाला. 
    ••• 1980 साली इंदिरा गांधीनी शिफारस केल्यानंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली. पवारांचे पहिले सरकार बरखास्त झाले. सरकार बरखास्त झाल्यावर ते बराच काळ सत्तेपासून दूर विरोधी बाकांवर राहिले. पण याच काळात काँग्रेस पक्षात आणि महाराष्ट्रातही बर्‍याच गोष्टी बदलल्या. 
    ••• 1984 साली पंजाबमधल्या अस्थिरतेचा प्रश्‍न कळीचा बनून शेवटी पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या झाली. राजीव गांधींनी देशाची आणि पक्षाची सूत्रं हाती घेतली. राजीव यांच्यानंतर काँग्रेसमध्ये नव्या पिढीची फळी तयार होऊ लागली. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाला देशभर प्रतिसाद मिळत होता. 
    ••• 1984 च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार बारामतीतून लोकसभेत पहिल्यांदा निवडून आले. पण ते लवकरच ते महाराष्ट्रात परत आले. यावेळी महाराष्ट्र आणि काँग्रेसमधल्या काही नेत्यांचा पवार यांच्या काँग्रेसमध्ये परत येण्याला विरोध होता. पण केंद्रीय नेतृत्वाने अंतुले, बाबासाहेब भोसले, निलंगेकर पाटील, शंकरराव चव्हाण यांच्यासारखे महाराष्ट्रभर जनाधार नसलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिल्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता होती. 
    ••• 1986 साली औरंगाबादमध्ये शरद पवार काँग्रेस पक्षात पुन्हा आले. शिवसेनेच्या वाढत्या प्रभावापासून वाचण्यासाठी महाराष्ट्रात काँग्रेसला नेतृत्व हवं होतं. तसेच बिगर काँग्रेसवाद महाराष्ट्रात सत्ता मिळवून देऊ शकत नाही, ही गोष्ट स्पष्ट होत होती. शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसच्याही वाढीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. त्यामुळे दोन्ही बाजूंना गरज असल्याने पवारांनी काँग्रेसमध्ये परत जाण्याचा निर्णय घेतला.
    ••• 1988 मध्ये राजीव गांधी यांनी शंकरराव चव्हाण यांना त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं आणि शरद पवार दुसर्‍यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर नामांतरा ऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्याची संकल्पना आली. त्यावर व्यापक सहमती होण्यासाठी मात्र पुढची काही वर्षं जावी लागली.
    ••• 1991 साली राजीव गांधींची हत्या झाल्याने काँग्रेसच्या नेतृत्वाचा प्रश्‍न उभा राहिला. तेव्हा सोनिया गांधी राजकारणात सक्रीय नव्हत्या. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पवार आणि पी. व्ही. नरसिंह राव होते. राव यांना अधिक मते पडल्याने पवारांचं पंतप्रधानपद हुकलं. राव यांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षणमंत्री झाले. 
    ••• 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली गेली आणि देशातलं वातावरण बदललं. मुंबईत धार्मिक दंगली सुरु झाल्या आणि देशाची आर्थिक राजधानी आगीत-धुरात वेढली गेली. 
    ••• मार्च 1993 मध्ये परत मुख्यमंत्री म्हणून पवारांनी तिसर्‍यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुंबई दंगलींच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय बदल घडून आला होता. 
    ••• 14 जानेवारी 1994 रोजी पवार तिसर्‍यांदा मुख्यमंत्री असताना म डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा मराठवाडा विद्यापीठाचा अंतिम नामविस्तार झाला. या भूमिकेमुळे मराठवाड्यातील राजकीय समीकरणं  बदलली.
    ••• 1996 पासून दिल्लीच्या राजकारणात जे आघाड्यांचं पर्व सुरु झालं तेव्हा शरद पवार तिथले एक महत्त्वाचे नेते बनले. आघाड्यांच्या मा काळात पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पवार दुसर्‍यांदा समीप पोहोचले होते. शरद पवार काँग्रेसचे लोकसभेतले विरोधी पक्षनेते बनले. काँग्रेस बहुमतात नव्हती, पण तिच्या पाठिंब्याने सरकारं बनत होती. सोनिया गांधींशी त्यांचे संबंध ताणलेले राहिले. काँग्रेसमधली मातब्बर नेत्यांची एक फळी पवारांच्या विरोधात कार्यरत राहिली. 
    ••• 1999 मध्ये शरद पवारांनी सोनियांच्या विदेशी मुळाचा मुद्दा उचलला आणि पी ए संगमा, तारिक अन्वर यांच्या सोबतीनं राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पवारांचं काँग्रेसमधलं हे दुसरं बंड होतं.
    ••• 1999 मध्ये केंद्रात अटलबिहारी वाजपेयींचं सरकार तिसर्‍यांदा आलं, केंद्रातील सत्ताधारी एनडीए (स्थापना 1998) आघाडीत सामील होण्यास शरद पवारांचा नकार.
    ••• 1999 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी अर्थात त्या वेगळ्या लढले. पण निवडणुकीनंतर महाराष्ट्रातलं चित्र बघता ते एकत्र आले तर सत्तांतराची शक्यता होती. त्या शक्यतेनं पवारांचं बंड शांत झालं आणि काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येऊन महाराष्ट्रात आघाडीची सत्ता स्थापन झाली. 
    ••• 2001 मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अजित वाडेकर यांचा शरद पवारांनी पराभव केला आणि त्यांचा भारतीय क्रिकेट व्यवस्थापनातला प्रभाव वेगानं वाढत गेला.
    ••• 2004 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजे बीसीसीआयच्या निवडणुकीत त्यांना तत्कालीन अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्याकडून अत्यंत अटीतटीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला. 
    ••• 2004 साली सोनियांच्या नेतृत्वात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला, युपीए-1 ची स्थापना झाल्यानंतर शरद पवार 10 वर्षे केंद्रीय कृषी मंत्रिपदावर (2004-14) राहिले. 
    ••• 2005 च्या निवडणुकीत त्यांनी दालमियांचा पराभव केला आणि ते बीसीसीआयचे अध्यक्ष बनले. त्यानंतर पवार आणि त्यांच्या गटाचा भारतीय क्रिकेटवर बरीच वर्षं अंकुश राहिला. भारतीय क्रिकेटच्या व्यावसायिक स्वरूपात बदल होणं सुरु झालं होतं. पवार आल्यानंतर तो वेग अधिक वाढला.
    ••• 2008 साली केंद्र सरकारनं शरद पवारांच्या सल्ल्याने, 72 हजार कोटींचं देशभरातल्या शेतकर्‍यांवर आणि त्यांच्या शेतीआधारित असलेल्या उद्योगांवरचं माफ केलं. अशा प्रकारची कर्जमाफी अगोदर सरकारतर्फे देण्यात आली नव्हती.अनेक राज्यांनी त्यानंतर त्यांच्या पातळीवर कर्जमुक्ती केली. 2008 च्या कर्जमाफीचा राजकीय फायदाही झाला आणि 2009 मध्ये पुन्हा एकदा युपीएचे सरकार आलं.
    ••• 2010 मध्ये ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे म्हणजे आयसीसीचे अध्यक्ष बनले. टी-20ची इंडियन प्रीमियर लिग ही त्यांच्या काळात सुरु झाली आणि क्रिकेटचे रूप पालटलं. 
    ••• 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं न्या. लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर पवारांची स्वत:ची क्रिकेट व्यवस्थापनातली इनिंग संपुष्टात आली. क्रिकेटसोबत कुस्ती, कबड्डीसारख्या देशी खेळांच्या संघटनांमध्ये, व्यवस्थापनामध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावल्या.
    ••• 2019 मध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी - शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी - अस्तित्त्वात आली. शरद पवारांच्या राजकीय खेळीने राजकारणाचे डावपेच बदलले.
    ••• 28 नोव्हेंबर 2019 ला उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 2019 च्या या महाराष्ट्रातल्या राजकीय नाट्यानं पवारांच्या निवडणुकीतल्या कौशल्यांबरोबरच राजकीय डावपेचही पाहिले.

    रुहोल्ला झॉम
     
     
     
            12 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाइन मोहिमांच्या माध्यमातून 2017 मध्ये आर्थिक मुद्दयांवरून देशव्यापी निदर्शने घडवून आणणारे इराणचे पत्रकार रुहोल्ला झॉम यांना फाशी देण्यात आले. इराणमधील ईश्वरसत्ताक शिया राजवटीला त्यांनी चळवळीच्या माध्यमातून आव्हान दिले होते.
    ••• जून 2020 मध्ये, देशातील सरकार उलथवण्याचे प्रयत्न केल्याच्या या आरोपाखाली त्यांना न्यायालयाने दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यांच्यावर हेरगिरी करण्याचाही आरोप होता. त्यांच्या संकेतस्थळावर व टेलिग्राम वाहिनीवर काही संदेश प्रसारित करण्यात आले होते. त्यामुळे सरकारविरोधी आंदोलनास पाठबळ मिळाले होते.
    ••• 2017 मध्ये इराणमध्ये झालेली सरकारविरोधी  निदर्शने मोठी व व्यापक स्वरूपाची होती. 2009 मधील ग्रीन मूव्हमेंटनंतरचे ते सर्वात मोठे आंदोलन होते. 
    ••• नोव्हेंबर 2019 मध्ये त्यांच्या सामाजिक माध्यमातील संदेशांमुळे इराण सरकारला पुन्हा आंदोलनाचा सामना करावा लागला होता.

    मंगलेश डबराल
     
     
     
            10 डिसेंबर 2010 रोजी ज्येष्ठ हिंदी कवी-अनुवादक-पत्रकार मंगलेश डबराल यांचे निधन झाले. साठोत्तरी साहित्याने घालून दिलेल्या वाटेला पुढील काळात एका निश्‍चित दिशेला घेऊन जाणार्‍या या सक्रिय कवीच्या निधनाने आदल्या आणि आत्ताच्या लिहित्या पिढीतील दुवा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.
    ••• 1948 सली उत्तराखंडच्या टेहरी गढवालच्या पहाडी भागात मंगलेश डबराल यांचा जन्म झाला. गढवाली भाषेतले व्यंगनाट्यलेखक मित्रानंद डबराल हे त्यांचे वडील. त्यांच्यामुळे ते साहित्याकडे वळले. गढवालच्या डोंगराळ भागातल्या लोकगीत-संगीताचा प्रभावही त्यांच्यावर पडला. त्यातून लिहिते झालेल्या मंगलेश डबराल यांचे सुरुवातीचे शिक्षण गढवालमध्येच झाले आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या शेवटाकडे ते दिल्लीत दाखल झाले. 
    ••• दिल्लीत हिंदी पेट्रिअट, प्रतिपक्ष, आसपास यांसारख्या नियतकालिकांत त्यांनी नोकरी केली. मग भोपाळ येथील पूर्वग्रह, लखनौच्या अमृत प्रभात या नियतकालिकांत काही काळ त्यांनी संपादनाची जबाबदारी सांभाळली आणि 1983 साली जनसत्तात साहित्य संपादक म्हणून रुजू झाले. 
    • त्यांचे कवितासंग्रह -
    1) पहाड पर लालटेन (1981)
    2) घर का रास्ता (1988)
    3) हम जो देखते हैं (1995
    4) नये युग में शत्रू
    5) स्मृती एक दुसरा समय है
    6) आवाज भी एक जगह है
    ••• एक बार आयोवा हे प्रवासवर्णन आणि लेखक की रोटी हे गद्यपर लेखन 

    व्लादेमार हाफकिन 
     
     
     
            जगभर कोव्हिड-19 लसीवर जे संशोधन सुरू आहे, त्या सर्व संशोधकांसाठी डॉ. हाफकिन प्रेरणेचा स्रोत ठरू शकतात. पॅरिसमध्ये व भारतामध्ये कार्यरत राहिलेल्या वाल्देमार मॉर्देकाय हाफकिन यांनी पटकी व प्लेग यांवरील जगातील पहिल्या लशींची निर्मिती केली होती. ब्रिटिश सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ व पूतिरोधक शल्यचिकित्सेचे आद्यप्रवर्तक लॉर्ड लिस्टर यांनी हाफकिन यांना मानवतेचा त्राता असं संबोधलं होतं.
    ••• कॉलरा लसीच्या संशोधनासाठी हाफकिन भारतात आले आणि ते 22 वर्षे भारतात राहिले.  
    ••• इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीने त्यांना नाइटहूड हा सन्मान दिला होता.
    ••• 1914 साली वयाच्या 55 व्या वर्षी हाफकिन भारतीय नागरी सेवेतून निवृत्त झाले आणि त्यांनी भारत सोडला.
    ••• 1915 साली 55 व्या वर्षी ते निवृत्त झाले. 
    ••• 1925 साली मुंबईतल्या ग्रँट कॉलेजमधल्या त्यांच्या प्रयोगशाळेचं नाव बदलून हाफकिन इन्स्टिट्यूट करण्यात आलं.
    ••• 1930 साली वयाच्या 70 व्या वर्षी हाफकिन लौसॅन इथे मरण पावले.
    ••• 1964 साली भारतीय टपाल सेवेने त्यांच्यावर स्टॅम्प काढला.

    ••• 1860 साली युुक्रेनमध्ये जन्मलेले व्लादेमार मोर्डेकई हाफकिन हे डॉक्टर नव्हते, तर प्राणिशास्त्रज्ञ होते. युक्रेनमधील ओडेसा (1884) येथे प्रशिक्षण घेतलेले व पॅरिसमध्ये कौशल्ये विकसित केलेले ते रशियन ज्यू होते.
    ••• 1888 साली त्यांनी युक्रेन सोडले. अल्पकाळ त्यांनी जीनिव्हामध्ये शिक्षकाची नोकरी केली, मग पॅरिसमध्ये लुई पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये सहायक ग्रंथपाल म्हणून ते नोकरी करू लागले. जगातील सूक्ष्मजीवशास्त्रीय संशोधनाचं आघाडीचं केंद्र म्हणून या इन्स्टिट्यूटची ख्याती होती. ग्रंथालयातील कामामधून मोकळा वेळ मिळाल्यावर सूक्ष्मजीवशास्त्रीय प्रयोगशाळेत प्रयोग करायचे.

    पटकी /कॉलर्‍याची लस -
    ••• 18 जुलै 1892 रोजी त्यांनी पॅरिसमध्ये कॉलर्‍याची लस तयार करुन स्वतःला ती लस टोचून घेतली. तत्पूर्वी त्याची चाचणी त्यांनी कोंबडा आणि गिनिपिगवर घेतली होती. 
    ••• 1893 साली लॉर्ड डफरीन यांच्या सल्ल्यामुळे ते भारतात आले. सोबत त्यांनी कॉलरा आजारावरची लस आणली होती, परंतु त्यांना या शोधाची चाचणी घेता आली नाही. त्यावेळी त्यांना ब्रिटिश वैद्यकीय व्यवस्थेतील व भारतीय जनतेमधील शंकासुरांना सामोरं जावं लागलं. 
    ••• 1894 साली हाफकिन यांनी कोलकाता येथे स्वतःची प्रयोगशाळा स्थापन केली व कॉलर्‍याची सुधारित लस शोधली. आग्रा, कोलकाता व आसाममधील 42 हजारजणांना त्यांनी या सुधारित कॉलरा लसीची इंजेक्शन्स दिली. ही जगातली पहिली मोठ्या प्रमाणावरील व्हॅक्सिन ट्रायल मानली जाते.

    प्लेगची लस -
    ••• 1894 साली जगातील प्लेगची तिसरी साथ चीनमधील युनान प्रांतात सुरू झाली. तिथून ती ब्रिटिश सत्तेखालील हाँगकाँगमध्ये पसरली व हाँगकाँगहून निघालेल्या व्यापारी जहाजाद्वारे ही साथ तत्कालीन ब्रिटिश भारतातील मुंबई महानगरामध्ये येऊन पोहोचली. 
    ••• सप्टेंबर 1896 मध्ये मुंबईतील गोदीमध्ये एका धान्य व्यापाराच्या गोदामात प्लेगचा पहिला रुग्ण आढळला. या साथीचा मृत्यूदर पटकीहून जवळपास दुप्पट होता, त्यामुळे प्लेगने मरण पावणार्‍यांची संख्या प्रचंड वाढली. या संदर्भात मदतीसाठी गव्हर्नरांनी हाफकिन यांना साद घातली.
    ••• 1896 मध्ये मुंबईतल्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये डॉ. हाफकिन यांच्यासाठी सुरु झालेल्या प्रयोगशाळेत त्यांनी प्लेगची लस तयार केली व त्याची पहिली ह्यूमन ट्रायल त्यांनी 10 जानेवारी 1897 रोजी स्वतःवर केली. त्यानंतर भायखळा तुरुंगातल्या कैद्यांवर त्याची ह्यूमन ट्रायल झाली.
    ••• हाफकिन यांनी प्लेगविरोधी लस पहिल्यांदा जिथे विकसित केली ती दोन खोल्यांची प्रयोगशाळा आता मुंबईतील केईएम रुग्णालयाचा भाग आहे. 
    ••• 1901 साली त्यांना मुंबईतील परळ इथे गव्हर्नर हाऊसमधल्या प्लेग संशोधन प्रयोगशाळेचे प्रमुख संचालक म्हणून नियुुक्त करण्यात आले. 
    ••• मुल्कोवाल डिझास्टर - 30 ऑक्टोबर 1902 रोजी पंजाबमधल्या मुल्कोवाल गावातल्या 107 लोकांना प्लेगची लस दिल्यानंतर त्यातल्या 19 जणांचा मृत्यू झाला. ही घटना मुल्कोवाल डिझास्टर म्हणून ओळखली जाते. मुंबईच्या परळमधील प्रयोगशाळेत तयार झालेली 53-एन बाटली प्राणघातकरित्या दूषित झाल्यामुळे ही दुर्घटना घडली होती. 
    ••• नोव्हेंबर 1907 मध्ये लंडनस्थित किंग्ज कॉलेजमधील एक प्राध्यापक डब्ल्यू. जे. सिम्प्सन व नोबेल विजेते रोनाल्ड रॉस यांच्या पुढाकाराने हा प्रश्‍न ब्रिटिश संसदेत मांडण्यात आल्यावर, हाफकिन यांना दोषमुक्त करण्यात आलं.
    ••• 1904 साली भारतातील प्लेगची साथ पराकोटीला पोहोचली होती. त्यावर्षी भारतात प्लेगने 11,43,993 लोकांचा मृत्यू झाला. हाफकिन यांची लसच मा आजारावरील प्रमुख बचाव होती.
    ••• 1897 ते 1925 या कालखंडामध्ये हाफकिन यांच्या प्लेगविरोधी लशीचे 2.60 कोटी डोस मुंबईहून पाठवले गेले. मा लशीमुळे मृत्यूदर 50 टक्के ते 85 टक्के कमी झाला.

    डॉ. बिमल पटेल
     
     
     
            डॉ. बिमल पटेल यांनी भारताच्या नव्या संसद भवनाचे डिझाईन बनवले आहे. त्यांना 35 वर्षांचा दीर्घ अनुभव आहे. डॉ. पटेल गुजरातच्या अहमदाबादमधील सीईपीटी विद्यापीठाचे अध्यक्ष आहेत. त्यांची कंपनी एचसीपी डिझाईन, प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने गुजरात सरकार व केंद्र सरकारसाठी अनेक बड्या प्रकल्पांसाठी काम केले आहे.
     
    डॉ. पटेल यांना मिळालेले  मानसन्मान-
    ••• 1992 मध्ये आगा खान अवॉर्ड फॉर आर्किटेक्चर 
    ••• 2001 मध्ये वर्ल्ड आर्किटेक्चर अ‍ॅवॉर्ड, 
    ••• 2002 मध्ये अर्बन प्लॅनिंग अँड डिझाईन अ‍ॅवॉर्ड 
    ••• 2019 साली पद्मश्री

    डॉ. बिमल पटेल  यांनी डिझाईन केलेल्या इमारती -
    1) गुजरातच्या उच्च न्यायालयाची इमारत -  सरखेज गांधीनगर हायवेलगत असलेले हे 33 कोर्टरूमचे गुजरात हायकोर्ट स्थापत्यशास्त्राचा सुंदर नमुना आहे. 
    2) अहमदाबाद येथील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची इमारत (1971)
    3) कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमचे नूतनीकरण (1987) - मा स्टेडियमची प्रेक्षक क्षमता 40 हजारांवरून 1 लाखांवर करण्यात आली. 
    4) अहमदाबादच्या कांकरीया लेकच्या विकासाचे काम


    रणजितसिंह डिसले 
     
     
     
            रणजितसिंह डिसले यांनी शिक्षकाची नोकरी उदरनिर्वाहाचे साधन न मानता, साधना मानली. या साधनेचे फलस्वरूप म्हणजे विश्‍वातील कोट्यवधी शिक्षकांमधून ते ‘विश्‍वगुरू’ बनले. त्यांना युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला. त्यांनी 7 कोटींतील पन्नास टक्के रक्कम अंतिम फेरीतील उर्वरित 9 स्पर्धकांना दिली. 
    ••• 5 ऑगस्ट 1988 रोजी रणजितसिंह यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात झाला. त्यांचे वडील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक. त्यांचे शालेय शिक्षण बार्शीतील सुलाखे हायस्कूलमध्ये झाले. 
    ••• या शाळेने  50 वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमबाह्य ज्ञान मिळावे म्हणून ‘रमण मंडळ’ हाउपक्रम राबवला होता.
    ••• 2008 साली अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊनसुद्धा त्यांनी शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला. डिसले गुरुजी यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण सोडून शिक्षक व्हायचे ठरवले. 
    ••• 2009 मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेमार्फत निवड झाली. पहिली तीन वर्षे इतर शिक्षकांप्रमाणे तेही अल्पवेतनावर ‘शिक्षण सेवक’ म्हणून काम करत होते. त्यांची पहिली नियुक्ती झालेल्या शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांची मातृभाषा कन्नड. विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिकविता यावे, यासाठी कन्नड भाषा शिकून घेतली. 2020 च्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतून शालेय शिक्षणाला मोठे महत्त्व दिले आहे.
    ••• जिल्हा परिषदेच्या शाळा ग्रामीण भागात आहेत. या शाळांमध्ये मुलांची अनुपस्थिती हा मोठा प्रश्न. मुलांच्या उपस्थितीत वाढ व्हावी, यासाठी त्यांनी प्रथम स्वत: ज्या गावातील शाळेत नियुक्ती आहे, तेथे राहायला सुरुवात केली. गावात राहू लागल्यानंतर मिळणार्या अतिरिक्त वेळेत ग्रामस्थांशी संवाद साधू लागले. त्यातून विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीचा प्रश्न मार्गी लागला. उपस्थिती वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रसंगी चित्रपट, व्हिडीओ दाखवण्याचे प्रयोग केले. नंतर पुस्तकातील कविता, धड्यासंदर्भातील व्हिडीओ दाखवायला सुरुवात केली. त्यातून विद्यार्थ्यांचे शिकणे आनंददायी बनत गेले. विद्यार्थ्यांना शिकायला आवडू लागले.
    ••• मुलांचा गृहपाठ व्यवस्थित व्हावा. पालकांच्या दूरचित्रवाणी पाहण्याच्या सवयीचा मुलांच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये, म्हणून त्यांनी ‘टी.व्ही.-बेल’ संकल्पना राबवली. संध्याकाळी 7 वाजता बेल वाजवत. आजूबाजूच्या 5 किलोमीटर भागातील वाड्यावस्त्यांवर बेलचा आवाज जात असे. बेल ऐकताच एक तासासाठी टी.व्ही. बंद होत असे. या एका तासात मुलांचा गृहपाठ होणे, अपेक्षित असे. गुरुजी एवढे करताहेत, म्हटल्यावर पालकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यातून मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत चांगलीच वाढ झाली.
    ••• तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांना विषय अधिक चांगल्या पद्धतीने समजावून देण्यासाठी करता येऊ शकतो, याची त्यांना जाणीव होती. मात्र, जिल्हा परिषदेकडून तंत्रसहाय्य मिळणे शक्य नव्हते. त्यांच्या तुटपुंज्या वेतनामध्ये खरेदी करणेही शक्य नव्हते. त्यांनी वडिलांना लॅपटॉप घ्यायला लावला. त्याच्या मदतीने प्रयोग सुरू असताना, अनुपस्थित विद्यार्थ्यांना आणि अभ्यासात कमी गती असणार्या (स्लो लर्नर) विद्यार्थ्यांना पुन्हा शिकवणे कठीण होते. त्यातून त्यांनी आपण शिकवतानाचे छायाचित्रण करायला सुरुवात केली. मेमरी कार्डवर ते छायाचित्रण उपलब्ध करून देत. या प्रयोगामुळे कामाच्या नावाखाली शाळा सोडणार्‍या मुलींचे शिक्षण बंद होणे थांबले. मात्र, यामध्ये कार्ड आणि फिती खराब (करप्ट) होण्याचे प्रमाण जास्त होते.
    ••• एका दुकानात क्यू.आर. कोड स्कॅन करताच पडद्यावर वस्तूची किंमत दिसल्याचे त्यांनी पाहिले. या तंत्राची त्यांनी ‘गुगल गुरू’कडून याची सखोल माहिती घेतली. प्रथम स्वत:कडील व्हिडीओ, ऑडिओ यूट्यूबवर ठेवले. त्याचे क्यू.आर. कोड बनवले. ते मुलांच्या पुस्तकात चिकटवले. कोडवरून ते कसे पाहायचे, हे पालकांना आणि मुलांना शिकवले. मुले तंत्रस्नेही असतात. ती पटकन शिकतात. मुले भ्रमणध्वनीचा वापर अभ्यासासाठी करू लागली. त्यातून पुढे त्यांनी अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापन अशा तिन्ही टप्प्यांसाठी हे तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली. पुढे हा प्रयोग तालुक्यातील तीनशेपेक्षा जास्त शाळांत, नंतर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रभर राबवला जाऊ लागला. आज सर्व शालेय अभ्यासक्रमांच्या पुस्तकात असे कोड छापण्यात आलेले आहेत. हे तंत्रज्ञान देशातच नव्हे, तर जगातील अकरा देशांत वापरले जाते.
    ••• मुलांच्या शंकांना समाधानकारक उत्तर देण्यासाठी ते कष्ट घेतात, मग ते बौद्धिक असोत किंवा शारीरिक. पृथ्वीवर जंगलांचे 33 टक्के आवरण असायला हवे, या विधानावर ‘आपल्या गावचे वनक्षेत्र किती,’ हा प्रश्‍न एका मुलाने विचारला. याच मुलांना बरोबर घेऊन त्यांनी गावचे वनक्षेत्र 26 टक्के असल्याचे काढले. ते 33 टक्के करण्यासाठी पुढे 8 वर्षे प्रयत्न केले. मुलांना झाडे दत्तक दिली. त्या झाडांना इलेक्ट्रॉनिक चिप बसवल्या. त्या झाडाला कोणी तोडायला, इजा पोहोचवण्यास गेला, तर त्या मुलांच्या भ्रमणध्वनीवर संदेश जाईल, अशी व्यवस्था केली. पर्यावरण शिक्षण हे कृतीतून घडत गेले. 
    ••• त्यांनी विद्यार्थ्यांची शांती सेना बनवण्यास सुरुवात केली. ज्या दोन देशांमध्ये तणाव आहे अशा दोन देशांतील समवयस्क मुलांच्या जोड्या बनवल्या जातात. त्यांना परस्परांच्या कला, संस्कृतीच्या माहितीची देव-घेव करायला लावली जाते. दोन देशांतील तणाव कमी करण्यासाठी विचार करण्यास प्रवृत्त केले जाते. ही मुले पुढे परस्परांच्या कायम संपर्कात राहणे, अपेक्षित आहे. देशादेशांतील तणाव कमी करण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरेल. 2030 पर्यंत 50 हजार विद्यार्थ्यांची अशी सेना तयार करण्याचा त्यांचा मानस आहे.

    प्रश्‍नमंजुषा (55)
     
    1) अर्टेमिस मून मिशन संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) ही ‘नासा’ची 2022 मध्ये अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणारी मोहीम आहे.
    ब) या मोहिमेत प्रथमच महिला चंद्रावर पाऊल ठेवतील. 
    क) या मोहीमेत भारतीय वंशाच्या राजा जॉन वुरपुत्तूर चारी यांचा समावेश आहे.
    ड) या मोहीमेत अ‍ॅलन मस्क यांची स्पेस एक्स सहभागी आहे.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    2) रणजितसिंह डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार कोणी दिला ? 
    1) युनेस्को आणि लंडनस्थित रॉकफेलर फाऊंडेशन
    2) युनिसेफ आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन
    3) युनेस्को आणि लंडनस्थित रॉकफेलर फाऊंडेशन
    4) युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन
     
    3) राजा जॉन वुरपुत्तूर चारी यांच्या संबंधी खालील विधाने विचारात घ्या :
    अ) 2017 मध्ये राजा त्यांची अर्टेमिस मोहिमेसाठी निवड झाली होती.  
    ब) त्यांनी अमेरिकन हवाई दलात कर्नल पदावर सेवा बजावली आहे. 
    क) ते नासाच्या चांद्रमोहिमेबरोबरच, आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक आणि मंगळ मोहिमेसाठीही काम करीत आहेत. 
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ 
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    4) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
    अ) ते 10 वर्षे केंद्रीय कृषी मंत्रीपदावर कार्यरत होते.
    ब) ’राष्ट्रवादी काँग्रेस’ची स्थापना करण्यास त्यांना पी ए संगमा व तारिक अन्वर यांची साथ मिळाली.
    क) 2019 मध्ये त्यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत आली.
    ड) पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रीमंडळात ते संरक्षणमंत्री होते. 
    इ) ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुखमंत्री बनले होते.
    फ) 1986 साली त्यांनी रेड्डी काँग्रेस सोडली.
    ग) त्यांनी 1978 मध्ये ’पुरोगामी लोकशाही दल’ (पुलोद) चे सरकार स्थापन केले.
    पर्यायी उत्तरे :
    1) वरील सर्व
    2) ड आणि फ वगळता सर्व  
    3) ब वगळता सर्व
    4) फ, ग वगळता सर्व
     
    5) वाल्देमार मॉर्देकाय हाफकिन  यांच्याबाबतीत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?
    1) ते रशियन प्राणिशास्त्रज्ञ होते.
    2) त्यांनी पॅरिसमध्ये लुई पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये सहायक ग्रंथपाल म्हणून नोकरी केली.
    3) भारताचे माजी व्हॉईसरॉय व फ्रान्समधील ब्रिटनचे राजदूत  लॉर्ड डफरीन यांच्या सल्ल्यामुळे ते भारतात आले. 
    4) 1960 साली भारतीय टपाल सेवेने त्यांच्यावर स्टॅम्प काढला.
     
    6) ज्येष्ठ हिंदी कवी-अनुवादक-पत्रकार मंगलेश डबराल यांचा कवितासंग्रह शोधा-
    1) एक बार आयोवा 
    2) लेखक की रोटी 
    3) घर का रास्ता
    4) वरील सर्व
     
    7) खालील जोड्या अचूक जुळवा :
    स्तंभ अ (शास्त्रज्ञ) स्तंभ ब (कामगिरी)
    अ. लॉर्ड लिस्टर   I.     पटकी व प्लेगवरील  लशींची निर्मिती 
    ब. प्राध्यापक डब्ल्यू. जे. सिम्प्सन   II.    लंडनस्थित किंग्ज कॉलेजमधील  प्राध्यापक
    क. रोनाल्ड रॉस   III.   ब्रिटिश सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ व पूतिरोधक शल्यचिकित्सेचे आद्यप्रवर्तक
    ड. वाल्देमार मॉर्देकाय हाफकिन   IV.   वैद्यकीय शास्त्रातील  नोबेल विजेते
    पर्यायी उत्तरे :
    1) II III I IV
    2) II I III IV
    3) III II IV I
    4) IV III I II
     
    8) डॉ. बिमल पटेल यांनी भारताच्या नव्या संसदभवनाचे डिझाईन बनवले असून त्यांनी डिझाईन केलेल्या इमारतीत कशाचा समावेश आहे ?
    अ) अहमदाबाद येथील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची इमारत
    ब) कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमचे नूतनीकरण
    क) जयपूर येथील लेक पॅलेसचे नूतनीकरण
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    9) मुल्कोवाल डिझास्टरसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) ही जगातली पहिली मोठ्या प्रमाणावरील व्हॅक्सिन दुर्घटना मानली जाते.
    ब) पंजाबमधल्या मुल्कोवाल गावातल्या लोकांचा प्लेगची लस दिल्यानंतर मृत्यू झाला.
    क) पंजाबमधल्या मुल्कोवाल गावातल्या लोकांचा कॉलरा लस दिल्यानंतर मृत्यू झाला.
    ड) या घटनेबाबत 1907 मध्ये हाफकिन यांना दोषी ठरवण्यात आलं.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  फक्त ब बरोबर
     
    10) खाली दोन विधान दिलेली आहेत. (अ) विधान असून (र) हे कारण आहे . त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तर निवडा.
    विधान (अ) : सप्टेंबर 1896 मध्ये मुंबईतील गोदीमध्ये एका धान्य व्यापाराच्या गोदामात प्लेगचा पहिला रुग्ण आढळला.
    कारण (र) : चीनमध्ये सुरु झालेली प्लेगची साथ ब्रिटिश ताब्यातील हंगकाँगवरुन मुंबई महानगरामध्ये पोहोचली होती.
    पर्यायी उत्तरे :
    1)  (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
    2) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
    3) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
    4) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
     
    11) शरद पवारांनी ’राष्ट्रवादी काँग्रेस’ची स्थापना कधी केली ?
    1) 1978
    2) 1986
    3) 1999
    4) 2004
     
    12) खालील जोड्या अचूक जुळवा :
    स्तंभ अ (व्यक्ती)         स्तंभ ब (कार्य)
    अ. मलाला युसूफजाई   I.    हेल्थ पिलर 
    ब. ग्रेटा थनबर्ग   II.    टीव्ही बेल’ संकल्पना 
    क. रणजितसिंह डिसले   III.    मुलींच्या शिक्षणाचा पुरस्कार
    ड. गीतांजली राव   IV.    पर्यावरण रक्षण
    पर्यायी उत्तरे :
    1) II IV I I
    2) II I III IV
    3) III IV II I
    4) IV III I II
     
    13) शरद पवार दुसर्‍यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा भारताचे पंतप्रधान कोण होते ?
    1) पंतप्रधान इंदिरा गांधी
    2) पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी
    3) पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव
    4) पंतप्रधान राजीव गांधी
     
    14) रणजितसिंह डिसले यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ)  त्यांनी अध्यापन, अध्ययन आणि मूल्यमापन अशा तिन्ही टप्प्यांसाठी क्यूआर कोड तंत्रज्ञान वापरले.
    ब)  2030 पर्यंत ते 50 हजार विद्यार्थ्यांची शांती सेना तयार करणार आहेत.
    क) गावातील झाडांना इलेक्ट्रॉनिक चिप बसवून त्यांनी गावचे वनक्षेत्र मोजले. 
    ड)  विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमबाह्य ज्ञान मिळावे म्हणून त्यांनी ‘रमण मंडळ’ हाउपक्रम राबवला.
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने अ, ब आणि क बरोबर
    2) विधाने ब, क आणि ड बरोबर
    3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
    4) विधाने अ, क आणि ड बरोबर
     
    15) खालील जोड्या अचूक जुळवा :
    स्तंभ अ (राजकीय आघाडी)   स्तंभ ब (स्थापनेचे वर्ष)
    अ. पुरोगामी लोकशाही दल (पुलोद)   I.   1978
    ब. महाविकास आघाडी   II.   1998
    क. एनडीए आघाडी   III.   2004
    ड. युपीए आघाडी   IV.   2019
    पर्यायी उत्तरे :
    1) II III I IV
    2) I IV II III
    3) III II IV I
    4) IV III I II
     
    16) अमेरिकेच्या चांद्र मोहीमेसंबंधी खालील विधाने विचारात घ्या:
    a) अमेरिकेने 1969 ते 1972 या काळात ‘अपोलो-11’ च्या सहाय्याने 11 चांद्रमोहिमा पार पाडल्या.
    b) ‘अर्टेमिस मून मिशन’ ही अमेरिकेची खाजगी कंपनीच्या सहाय्याने पार पाडली जाणारी पहिली मोहीम आहे.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    1) फक्त (a)
    2) फक्त (b)
    3) (a) व (b) दोन्ही
    4) दोन्हीही नाहीत 
     
    17) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) पुलोद सरकारने सर्वप्रथम औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असे नामांतर करण्यााचा प्रस्ताव मांडला होता.
    ब) 14 जानेवारी 1994 रोजी शरद पवार तिसर्‍यांदा मुख्यमंत्री असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार झाला.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    18) शरद पवार यांच्या क्रिकेट क्षेत्रातील योगदाना संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
    अ) 2001 मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनले.
    ब) 2005 मध्ये ते बीसीसीआयचे अध्यक्ष बनले.
    क) 2008 मध्ये त्यांनी आयपीएल क्रिकेटस्पर्धा सुरु केली.
    ड) 2010 मध्ये ते आयसीसीचे अध्यक्ष बनले.
    पर्यायी उत्तरे :
    1) अ, ब आणि क बरोबर
    2)  ब, क आणि ड बरोबर
    3) अ, ब आणि ड बरोबर
    4)  अ, क आणि ड बरोबर
     
    19) 12 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाइन मोहिमांच्या माध्यमातून त्यांच्या देशात आर्थिक मुद्दयांवरून देशव्यापी निदर्शने घडवून आणणारे पत्रकार रुहोल्ला झॉम यांना फाशी देण्यात आलेम ते कोण्त्या देशाचे होते ?
    1) टर्की
    2) इराण
    3) सौदी अरेबिया
    4) सिरिया
     
     

    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (55)

     

    1-1
     
    2-4
     
    3-4
     
    4-4
     
    5-4
     
    6-3
     
    7-3
     
    8-2
     
    9-4
     
    10-1
     
    11-3
     
    12-3
     
    13-4
     
    14-1
     
    15-2
     
    16-4
     
    17-3
     
    18-4
     
    19-2

Share this story

Total Shares : 0 Total Views : 267