जागतिक घटना / प्रश्नमंजुषा (51)

  •  जागतिक घटना / प्रश्नमंजुषा (51)

    जागतिक घटना / प्रश्नमंजुषा (51)

    • 12 Dec 2020
    • Posted By : Study Circle
    • 146 Views
    • 0 Shares
    अमेरिकेची शस्त्रविक्री
     
     
            संरक्षण सुरक्षा सहकार्य संस्थेने दिलेल्या माहितीनुसार भारतातर्फे अमेरिकेकडून केल्या जाणार्‍या शस्त्रखरेदीत प्रचंड वाढ झाली. ही खरेदी 62 कोटी डॉलरवरून थेट 3.4 अब्ज डॉलरपर्यंत वाढली. अमेरिकेकडून इतर देशांना होणार्‍या शस्त्रविक्रीत घट झाली असताना भारताला मात्र मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात आली. 2019 मध्ये अमेरिकेने 55.7 अब्ज डॉलरची शस्त्र विक्री केली होती. ती यंदा 50.8 अब्ज डॉलरपर्यंत खाली आली होती. भारत, मोरोक्को आणि इतर काही देशांकडून होणार्‍या खरेदीत वाढ झाली असली तरी सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, बेल्जियम, इराक या देशांनी अमेरिकेकडून गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी खरेदी केली आहे. अमेरिकेने 2016 मध्ये भारताला प्राधान्यक्रम दिल्याने अधिक खरेदी करणे भारताला शक्य झाले आहे. पाकिस्तानबरोबरील संबंध तणावाचे झाले असले तरी अमेरिकेने त्यांनाही शस्त्रे विकली आहेत.

    • अमेरिकेने विविध देशांना विकलेली शस्त्रे -
     
    2020 मध्ये 50.8 अब्ज डॉलर्स
    2019 मध्ये 55.7 अब्ज डॉलर्स
    2017 मध्ये 41.9 अब्ज डॉलर्स

    •• 2020 मध्ये अमेरिकेकडून शस्त्रखरेदी करणारे देश -
    1) तैवान 11.8 अब्ज  डॉलर्स (2019 मध्ये 876 दशलक्ष डॉलर्स), 
    2) पोलंड 4.7 अब्ज डॉलर्स (2019 मध्ये 673 दशलक्ष डॉलर्स)
    3) मोरोक्को 4.5 अब्ज डॉलर्स (2019 मध्ये 12.4 दशलक्ष डॉलर्स)
    4) संयुक्त अरब अमिराती 3.6 अब्ज डॉलर्स (2019 मध्ये 1.1 अब्ज डॉलर्स) 
    5) भारत 3.4 अब्ज डॉलर्स (2019 मध्ये 62 लाख डॉलर्स)
    6) सिंगापूर 1.3 अब्ज डॉलर्स (2019 मध्ये 137 दशलक्ष डॉलर्स)

    • अनेक देशांनी 2020 मध्ये अमेरिकेकडून शस्त्रखरेदी कमी केली -
     
    1) सौदी अरेबिया 1.2 अब्ज डॉलर्स (2019- 14.9 अब्ज डॉलर्स)
    2) अफगाणिस्तान 1.1 अब्ज डॉलर्स (2019- 1.6 अब्ज डॉलर्स)
    3) दक्षिण कोरिया 2.1 अब्ज डॉलर्स (2019 -2.7 अब्ज डॉलर्स) 
    4) बेल्जियम 41.8 दशलक्ष डॉलर्स (2019- 5.5 अब्ज डॉलर्स)
    5) इराक 368 दशलक्ष डॉलर्स (2019-1.4 अब्ज डॉलर्स)

    • अमेरिकेची पाकिस्तानला शस्त्रविक्री -
    2020 मध्ये 146 दशलक्ष डॉलर्स
    2018 मध्ये 65 दशलक्ष डॉलस
    2017 मध्ये 22 दशलक्ष डॉलर्स
    • 2019 मध्ये पाकिस्तानकडून शस्त्रविक्रीसाठी घेतलेले 10.8 दशलक्ष डॉलर्स अमेरिकेने परत केले होते. 
    • 1950 ते 2020 या काळात अमेरिकेने पाकिस्तानला विदेशी शस्त्र विक्री गटात एकूण 10 अब्ज डॉलर्सची शस्त्रविक्री केली.

    • अमेरिकेची भारताला शस्त्रविक्री
     
    2020 - 3.4 अब्ज डॉलर्स
    2019 - 62 लाख डॉलर्स
    2018- 282 दशलक्ष डॉलर्स
    2017- 754.4 दशलक्ष डॉलर्स

    •• अमेरिकेकडून शस्त्रखरेदी करणारा भारत हा एक प्रमुख देश आहे. 1950-2020 या काळात अमेरिकेने परराष्ट्र लष्करी विक्री अंतर्गत भारताला 12.8 अब्ज डॉलर्सची शस्त्रे विकली.

    भारत आणि अरबी देश 
           
     
            जून 2020 पासून भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर शेजारी व दूरच्या शेजारी देशांचे दौरे व भेटीगाठी करीत आहेत. त्यानुसारच भारताचे लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी डिसेंबरमध्ये सौदी अरेबिया व अरब अमिराती दुबई या दोन महत्त्वाच्या अरबी देशांचा दौरा केला. त्यांनी यापूर्वी म्यानमार व नेपाळचे दौरे केलेले आहेत. सौदी अरेबिया व दुबईच्या सुलतानांना भेटून त्यांच्याशी भारतीय सेनापतींनी केलेली चर्चा ही, अरबी देशांनी भारत-पाक-चीन संघर्षात पाकची पाठराखण करू नये, निदान तटस्थ व्हावे, यासाठी प्रभावित करणारी आहे. 
    • दक्षिण आशियापासून आफ्रिकेपर्यंत अनेक देशांना आपल्या पंखाखाली घेऊन वा आर्थिक मांडलिक करून चीनने मागल्या दशकात जी रणनीती आखली, त्या बळावर मार्च 2020 पासून गलवान व लडाखमध्ये कुरापती चालवल्या आहेत.  डोकलाम ते गलवानदरम्यान याचा अनुभव घेत भारताने वेळोवेळी आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. त्यातही प्रत्यक्षात एका झटापटीनेच चीनची सगळी झिंग उतरली आणि लडाखमधून माघार कशी घ्यावी, ते समजेनासे झालेले आहे. अशा पार्श्र्वभूमीवर भारताच्या सेनाप्रमुखांनी नवनव्या शेजारी मित्रदेशांना दिलेल्या भेटी आणि त्याला समांतर लष्करी सराव व कवायती, हा भारतीय सुरक्षा रणनीतीचा भाग मानला जातो.
    • लडाखच्या गलवान खोर्‍यातील हातघाईमुळे भारताला घाबरून ठेवण्याची चीनची रणनीती अपयशी ठरली. कर्नल संतोष बाबू यांच्या पथकाने जी झुंज दिली, त्यातून चीनची लाल सेनाही हादरली. इतकी लढाऊ विमाने, इतक्या पाणबुड्या वा युद्धनौका किंवा रणगाडे व सैनिकांचे मोठे आकडे सांगून जगाला भयभीत करणार्‍या चीनची दहशत एका गलवानच्या संघर्षाने संपुष्टात आणली. चीनलाही युद्ध परवडणारे नाही. दक्षिण आशिया, चिनी समुद्रापासून हिंदी महासागर व अरबी सागराच्या परिसरातील विविध देशांशी भारताने योजलेली ही लष्करी सुरक्षाविषयक मैत्री, तसेच जगातील अमेरिका, जपान, भारत व ऑस्ट्रेलिया या 4 सामर्थ्यवान देशांचे (क्वाड) ऐक्य चीन व पाकला इशारा देणारे आहे.

    भारत आणि अरबी देश -
    1) भारत-पाकिस्तान संघर्ष किंवा विवाद निर्माण झाला की अरबी वा मुस्लिम देशांनी नेहमीच पाकिस्तानची पाठराखण करतात, पण खनिज तेलाची गरज ओळखून भारताने कधीही या देशांशी थेट भांडण ओढवून घेतले नाही, त्याचबरोबर खुली जवळीकही केली नव्हती. भारताचे त्यांच्याशी व्यवहारापुरते सख्य राहिले. मात्र सध्या अरबी व मुस्लिम देशांशी पाकिस्तानचे संबंध बिनसले असून काही बाबतीत वितुष्ट टोकाला गेल्याने त्याचा फायदा घेण्यासाठी भारताचे लष्करप्रमुखांचा हा दौरा होता.
    2) भौगोलिक बाबतीत अरबी देश म्हणजे भारताचे दूरचे शेजारी. उत्तरेला चीन व पश्चिमेला पाक भारतीय सीमा रोखून बसले असताना शेजारी देशाबरोबरच या अरबी देशांचे सहकार्य भारताला हवे असते. 
    3) अरबी देशांमध्ये 90 लाख कष्टकरी भारतीय रोजगार करतात, त्यापैकी अनेकजण तिथेच वास्तव्याला असल्याने त्यांचे हितसंबंध भारत सरकारला जपणे भाग आहे.
    4) अरबी देशातील भारतीयांमुळे 50 अब्जाएवढी रक्कम परकीय चलनातून मायदेशी येत असते. 
     
    प्रश्नमंजुषा (51)
     
    1) खाली दोन विधान दिलेली आहेत (अ) विधान असून (र) हे कारण आहे खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
    विधान (अ) ः 2020 मध्ये  अमेरिकेकडून इतर देशांना होणार्‍या शस्त्रविक्रीत घट झाली असताना भारताला मात्र मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.
    कारण (र) ः 2016 मध्ये अमेरिकेने भारताला प्राधान्यक्रम दिल्याने अधिक खरेदी करणे भारताला शक्य झाले.
    पर्यायी उत्तरे :
    1) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
    2) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
    3) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
    4) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
     
    2) भारताचे लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी खालीलपैकी कोणत्या देशांना भेटी दिल्या ?
    अ) म्यानमार 
    ब) सौदी अरेबिया 
    क) नेपाळ
    ड) अरब अमिराती
    पर्यायी उत्तरे :
    1) वरील सर्व
    2) अ आणि ब
    3) अ, क आणि ड
    4) अ, ब आणि क
     
    3) सध्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत ?
    1) कर्नल संतोष बाबू 
    2) जय शंकर 
    3) अजित डोवाल 
    4) यापैकी नाही 
     
    4) अरबी देशातील भारतीयासंबंधी खालील विधाने विचारात घ्या:
    a) अरबी देशातील भारतीयांमुळे 50 अब्जाएवढी रक्कम परकीय चलनातून मायदेशी येत असते. 
    b) अरबी देशांमध्ये 90 लाख कष्टकरी भारतीय रोजगार करतात.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    1) फक्त (a)
    2) फक्त (b)
    3) (a) व (b) दोन्ही
    4) दोन्हीही नाहीत 
     
    5) क्वाड या संघटनेत जगातील कोणत्या देशांचा समावेश आहे ? 
    अ) अमेरिका व ऑस्ट्रेलिया
    ब) रशिया व चीन 
    क) दक्षिन कोरिया व जर्मनी
    ड)  जपान व भारत
    पर्यायी उत्तरे :
    1) वरील सर्व
    2) अ आणि ड
    3) क आणि ड
    4) ब आणि क
     
    6) 2020 साली अमेरिकेने विविध देशांना शस्त्रविक्रीनुसारचा योग्य चढता क्रम लावा. 
    अ) संयुक्त अरब अमिराती
    ब) मोरोक्को 
    क) तैवान 
    ड) भारत 
    इ) पोलंड 
    फ) दक्षिण कोरिया 
    पर्यायी उत्तरे :
    1) फ -अ - ब - क - ड - इ
    2) इ - क - अ - ड - ब - फ
    3) फ - ड - अ - ब - इ - क
    4) ड - ब - अ - फ- इ - क
    उत्तरे : प्रश्नमंजुषा (51)
    1-1
     
    2-1
     
    3-3
     
    4-3
     
    5-2
     
    6-3

     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 146