शेतकरी उत्पादक कंपनी / प्रश्‍नमंजुषा (30)

  • शेतकरी उत्पादक कंपनी / प्रश्‍नमंजुषा (30)

    शेतकरी उत्पादक कंपनी / प्रश्‍नमंजुषा (30)

    • 27 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 517 Views
    • 0 Shares
    शेतकरी उत्पादक कंपनी
     
    ग्रामीण भागातील अर्थकारण हे अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या सबलीकरणावर अवलंबून आहे. त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी महत्त्वाचे योगदान देऊ शकते. शेतकरी उत्पादक कंपनी ही भौगोलिक गरजे/मर्यादेनुसार स्थापन करता येते. त्यामध्ये विविध पिके घेणारे शेतकरी समाविष्ट करुन त्यांची एक पीकनिहाय मूल्यसाखळी निर्माण केल्यास संपूर्ण अन्नसाखळी पारदर्शक व प्रामाणिक पद्धतीने कार्यक्षम करता येते. त्याद्वारे अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी उत्पन्नाचा शाश्‍वत स्रोत निर्माण होऊ शकतो.

    •• शेतकरी उत्पादक कंपनी-
     
    1) शेतकर्‍यांची स्वायत्त संस्था उभारण्यासाठी जुन्या सहकारी अधिनियमांमध्ये बदल करून ‘शेतकरी उत्पादक कंपनी’ अशी नवी तरतूद केली गेली आहे. 
     
    2) शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये शेतकर्‍यांकडे मालकी हक्क असतात आणि प्रत्येकाला कंपनीच्या कारभाराबद्दल समान मतदानाचे अधिकार असतात.
     
    3) भारतात अशा 7 हजार संस्था असून, त्यापैकी महाराष्ट्रात 2 हजार संस्था आहेत. 
     
    4) महाराष्ट्रात सध्या 1.6 कोटी  शेतकरी कुटुंबे आहेत. सद्य पीकपद्धतीनुसार राज्यात 13 ते 14 हजार शेतकरी उत्पादक कंपन्या असणे गरजेचे आहे.
     
    5) प्रत्येक उत्पादक कंपनीमध्ये सुमारे 1 हजार शेतकरी असतात. एका भागात समान उद्देशाने कार्यरत असलेल्या अशा कंपन्यांची मिळून एक पीकनिहाय मूल्यसाखळी निर्माण केल्यास त्याचा 20 हजार शेतकर्‍यांना लाभ होऊ शकतो. महाराष्ट्रात पीकनिहाय 680 ते 799 मूल्यसाखळ्या तयार केल्यास शेतमालाचा योग्य मोबदला लाभार्थींना मिळू शकतो.
     
    6) एका भोगौलिक क्षेत्रात अनेक पिकांचे शेतकरी एकत्र येऊन अशा शेतकरी उत्पादक कंपन्या बनवतात; त्यांना ‘शेतकरी समूह’ म्हणतात.

    •• शेतकरी उत्पादक कंपन्यांचे मुख्य फायदे -
     
    1) एकेकट्या अल्पभूधारक शेतकर्‍यांसमोर उभ्या ठाकणार्‍या आव्हानांवर मात करण्याची शक्यता निर्माण होते. 
     
    2) एकत्र मिळून काम केल्यास प्रक्रिया वा साठवणुकीची योग्य सोय उभारता येते. 
     
    3) दलालांकडून होणारी फसवेगिरी कमी होऊन शेतमाल विकताना योग्य दर मिळण्याची शक्यता वाढते.
     
    4) मूल्यसाखळीच्या शेवटच्या टोकाला- म्हणजेच ग्राहकांकडून मिळणार्‍या रकमेचा अधिकतम हिस्सा शेतकर्‍यांपर्यंत पोहोचण्याच्या शक्यता वाढतात.
     

    •• सहकार क्षेत्राची सुरुवात -
     
    1) एकोणिसाव्या शतकात जर्मनीत (तेव्हाचे प्रशिया) औद्योगिकीकरणामुळे आणि सामाजिक बदलांमुळे शेतकर्‍यांना स्वत:च्या जमिनीवर स्वतंत्र हक्क मिळाले. मात्र, अनेक दुर्बल शेतकरी आणि लहानसहान शेतकी संघटनांची मोठ्या व्यापार्‍यांकडून पिळवणूक सर्रास सुरूच होती. 
     
    2) 1864  साली फ्रिडरिच विल्हेम रायफायजन यांनी पहिली सहकारी संस्था सुरू केली. ही प्रणाली तेथील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरली. 1889 मध्ये तिथे अधिकृतरीत्या सहकारी संस्थांविषयक नियमदेखील लागू करण्यात आले. 
     
    3) 1904 साली भारतात सहकारी संस्था अधिनियम लागू करण्यात आला, त्यात पुढे सुधारणा होत गेल्या. पुढे ‘रॉयल कमिशन ऑफ अ‍ॅग्रिकल्चर’ने एक विधान केले की, ‘सहकार्य संपले तर ग्रामीण भारताबद्दलच्या आशा संपुष्टात येतील.’ नेमके हेच डॉ. वर्गिस कुरियन यांनीही ‘आय टू हॅड अ ड्रीम’ या आत्मकथनात सांगितले आहे. 
     
    4) शेतकर्‍यांची होणारी पिळवणूक ही महात्मा फुले यांनी ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतकर्‍याचा आसूड’ या आपल्या पुस्तकांतून सखोलपणे मांडली होती. 
     
    5) 1917 साली लिहिलेल्या ‘स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अ‍ॅण्ड देअर रेमेडीज’ या शोधनिबंधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या हालअपेष्टा, त्यांची होणारी कोंडी अधोरेखित करून ही समस्या दूर करण्यासाठीचे उपायही सांगितले होते.

    • अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या प्रमुख समस्या -
     
    1) दलालांकडून होणारी पिळवणूक.
     
    2) थेट बाजाराशी जोडणारी कोणतीही यंत्रणा नसणे.
     
    3) कर्ज वा विम्यासाठी वारंवार अकार्यक्षम प्रणालींवरील अवलंबित्व.
     
    4) साठवणुकीची योग्य प्रक्रिया वा सोय नसल्यामुळे नाशवंत शेतमालाची होणारी नासाडी.

     

    प्रश्‍नमंजुषा (30)
     
    1) ‘सहकार्य संपले तर ग्रामीण भारताबद्दलच्या आशा संपुष्टात येतील.’ असे उदगार कोणी काढले होते ?
    अ) 1864  साली फ्रिडरिच विल्हेम रायफायजन यांनी 
    ब) रॉयल कमिशन ऑफ अ‍ॅग्रिकल्चरने त्याम्च्या अहवालात.
    क)  ‘स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अ‍ॅण्ड देअर रेमेडीज’ या  1917 साली लिहिलेल्या शोधनिबंधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
    ड)  डॉ. वर्गिस कुरियन यांनीही ‘आय टू हॅड अ ड्रीम’ या आत्मकथनात 
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ आणि ड
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त ब आणि ड
    4) अ, ब आणि क
     
    2) अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या प्रमुख समस्या कोणत्या आहेत ?
    अ) कर्ज वा विम्यासाठी वारंवार अकार्यक्षम प्रणालींवरील अवलंबित्व.
    ब) दलालांकडून होणारी पिळवणूक.
    क) साठवणुकीची योग्य प्रक्रिया वा सोय नसल्यामुळे नाशवंत शेतमालाची होणारी नासाडी.
    ड) थेट बाजाराशी जोडणारी कोणतीही यंत्रणा नसणे.
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) अ आणि ब
    3) क आणि ड
    4) वरील सर्व
    3) खालील जोड्या जुळवा :
    स्तंभ अ (वर्ष) स्तंभ ब (घटना)
    अ. 1864 I.  भारतात सहकारी संस्था अधिनियम लागू 
    ब. 1889 II. ‘स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अ‍ॅण्ड देअर रेमेडीज’ या शोधनिबंधाचे लेखन.
    क. 1904 III. जर्मनीमध्ये अधिकृतरीत्या सहकारी संस्थांविषयक नियम लागू 
    ड. 1917 IV. फ्रिडरिच विल्हेम रायफायजन यांनी पहिली सहकारी संस्था सुरू केली.
    पर्यायी उत्तरे :
    (1) II III I IV
    (2) II I III IV
    (3) III II IV I
    (4) IV III I II
     
    4) एकोणिसाव्या शतकात कोणत्या देशात जगातील पहिली सहकारी संस्था सुरू झाली ?
    1) इंग्लंड
    2) प्रशिया
    3) जर्मनी
    4)  रशिया
     
    5) खालीलपैकी क़ोणी 1917 साली लिहिलेल्या ‘स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अ‍ॅण्ड देअर रेमेडीज’ या शोधनिबंधात यांनीही अल्पभूधारक शेतकर्‍यांच्या हालअपेष्टा, त्यांची होणारी कोंडी अधोरेखित करून ही समस्या दूर करण्यासाठीचे उपायही सांगितले होते.
    1) महात्मा फुले 
    2) फ्रिडरिच विल्हेम रायफायजन 
    3) डॉ. वर्गिस कुरियन 
    4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
     
    6) शेतकरी उत्पादक कंपनी संबंधी खालील विधाने विचारात घ्या :
    अ) प्रत्येक शेतकर्‍याला कंपनीच्या कारभाराबद्दल समान मतदानाचे अधिकार असतात.
    ब) शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये शेतकर्‍यांकडे मालकी हक्क असतात.
    क) भारतात अशा 10 हजार संस्था असून, त्यापैकी महाराष्ट्रात 5 हजार संस्था आहेत. 
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    7) शेतकर्‍यांची होणारी पिळवणूक ही महात्मा फुले यांनी कोणत्या पुस्तकांतून सखोलपणे मांडली होती ?
    अ) गुलामगिरी
    ब) शेतकर्‍याचा आसूड
    पर्यायी उत्तरे :
    1)  फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    8) खालीलपैकी कोणती बाब ही शेतकरी उत्पादक कंपन्यांमुळे होणार्‍या फायद्यात मोडत नाही ?
    1) एकेकटया अल्पभूधारक शेतकर्‍यांस भेडसावणार्‍या आव्हानांवर मात करता येते.
    2) प्रक्रिया वा साठवणुकीची योग्य सोय उभारता येते. 
    3) शेतमाल विकताना योग्य दर मिळण्याची शक्यता वाढते.
    4) ग्राहकांकडून मिळणार्‍या रकमेचा पूर्ण हिस्सा शेतकर्‍यांपर्यंत पोहोचतो. 
     
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (30)
    1-3
     
    2-4
     
    3-4
     
    4-3
     
    5-4
     
    6-2
     
    7-3
     
    8-4

Share this story

Total Shares : 0 Total Views : 517