कलादान मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट / प्रश्‍नमंजुषा (29)

  • कलादान मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट / प्रश्‍नमंजुषा (29)

    कलादान मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट / प्रश्‍नमंजुषा (29)

    • 25 Nov 2020
    • Posted By : Study Circle
    • 472 Views
    • 1 Shares
    कलादान मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट
    शेजारील राष्ट्रांमध्ये चीनचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. पूर्व लडाखमध्ये चीनचे आव्हान, नेपाळवर चीनचा वाढलेला प्रभाव, पाकिस्तानला चीनने बनवलेले गुलाम या सर्व पार्श्‍वभूमीवर म्यानमारसारखा देश भारताच्या बाजूने असणे गरजेचे असल्याने 2020 मध्ये म्यानमारमधील भारत पुरस्कृत विविध प्रकल्पांना चालना दिली जात आहे. त्यातील महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे कलादान मल्टिमोडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट.

    कलादान  प्रोजेक्टची वैशिष्ट्ये -
    1) कलादान मल्टिमोडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट हा भारत आणि म्यानमार या दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा असून त्याच्या कामाला जानेवारी 2019 पासून वेग आला. या प्रकल्पामुळे ईशान्य भारत आणि म्यानमार यांच्यात चांगली कनेक्टिव्हिटी निर्माण होऊन या भागाच्या आर्थिक विकासास चालना मिळणार आहे. 
     
    2) 22 किमी लांबीच्या चिकन्स नेक अर्थात ’सिलिगुडी कोरिडॉर’ या निमुळत्या भागामुळे ईशान्य भारत आणि उत्तर बंगाल एकमेकांना जोडले गेले आहेत. भविष्यात चीनसमवेत युद्ध झाल्यास किंवा चीनने आक्रमण करून हा भाग कह्यात घेतला, तर भारताचा ईशान्य भारताशी संपर्क तुटेल. यासाठी भारताने कोलकाता येथून समुद्र मार्गाने बांगलादेशाला वगळून थेट म्यानमारच्या सिटवे बंदरापर्यंत जाऊन तेथून  मिझोराममध्ये जाण्याचा मार्ग बनवण्यासाठी कलादान मल्टिमोडल ट्रान्झिट प्रोजेक्ट (समुद्र-नदी-रस्ता मार्ग) 2008 मध्ये चालू केला. यासाठी भारताने म्यानमारचे सिटवे बंदर विकसित केले. तेथून ते मिझोरामपर्यंत जाण्यासाठी महामार्ग आणि येथील नदीवर पूल बनवण्यात आले. 
     
    3) हा प्रकल्प वर्ष 2015 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असतांना रोहिंग्यांचा संघर्ष व इतर अन्य समस्यांमुळे त्याला विलंब झाला. या प्रकल्पाच्या प्रारंभापासून चीनने त्यात विविध माध्यमांतून खोडा घातला. आधी पर्यावरणवाद्यांच्या माध्यमातून आणि नंतर आतंकवादी संघटनांना साहाय्य करून चीनने या प्रकल्पास विरोध केला आहे. 
     
    4) भारताने हाती घेतलेल्या या प्रकल्पामध्ये पुढील तिन्ही गोष्टींचा समावेश आहे -
    1) बंदरांचा विकास
    2) म्यानमारमधील अंतर्गत नदीमार्गांचा विकास
    3) महामार्गांचा विकास 

    • कलादान मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी -
    1) कोलकात्याच्या हल्दिया बंदरापासून म्यानमारमधील सिटवे बंदरापर्यंत 579 किलोमीटरची  बंगालच्या उपसागरातून वाहतूक (पूर्णपणे तयार).
     
    2) सिटवे बंदरापासून पलेटवा या गावापर्यंत 158 किलोमीटरची जलवाहतूक ही कलादान नदीतून (नदीवरील जेट्टी तयार). हे ठिकाण बांगलादेशपासून 18 किमी अंतरावर.
     
    3) म्यानमारच्या अ‍ॅजिओ प्रांतातील पलेटवापासून झोरीनपुरीपर्यंत 110 किलोमीटरची रस्ते वाहतूक (निर्मितीच्या अंतिम टप्प्यात). झोरीनपुरी हे मिझोराममधील म्यानमार सिमेवर असलेले गाव असून तेथे हा रस्ता भारतात प्रवेश करतो.
     
    4) झोरीनपुरी ते भारतीय राष्ट्रीय महामार्ग 54 ला जोडण्यासाठी 100 किलोमीटरची रस्ते वाहतूक.
     

    सिटवे प्रकल्प
    ‘नेबरहूड फर्स्ट’ धोरणाअंतर्गत भारताने म्यानमारमध्ये विकसित केलेले सिटवे बंदर 2021 पासून कार्यान्वित होणार आहे. हा प्रकल्प पूर्णत्त्वास नेणे अत्यंत जोखमीचे होते. 
     
    1) सिटवे बंदर कोलकातापासून 579 किमी आहे. म्यानमारच्या राखीन प्रांतामध्ये हे बंदर आहे. हा भाग रोहिंग्या मुस्लिम व म्यानमारचे लष्कर यांच्यातील संघर्ष तसेच लष्कर-ए-तोयबा, अल् कायदासारख्या पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या सततच्या हिंसाचारामुळे प्रचंड तणावग्रस्त, अशांत आहे. 
     
    2) या बंदरासाठी सुमारे 500 कोटी रुपये खर्च आला असून, 2019 मध्ये ते पूर्ण झाले. भारताचे लष्करप्रमुख एन. एम. नरवणे आणि परराष्ट्र सचिव सिंघला या दोघांच्या म्यानमार दौर्‍यादरम्यान त्याची घोषणा करण्यात आली. 
     
    3) ईशान्येकडील दक्षिणेकडील त्रिपुराची राजधानी आगरतळा बंगालच्या उपसागरापासून 200 कि.मी. अंतरावर असूनसुद्धा परदेशी प्रदेशामुळे समुद्राचा वापर करू शकत नव्हते, ते आता बदलत आहे.
     
    4) ईशान्य भारताला समुद्रमार्गाने व्यापार करायचा असेल तर सर्वात जवळचे भारतीय बंदर हे कोलकाता आहे. ते ईशान्य भारताच्या टोकाकडील मिझोराम, त्रिपुरापासून जवळपास 1880 किलोमीटर एवढे लांब आहे. मात्र जर  म्यानमार मधल्या सिटवे बंदरातून व्यापार केला तर ते अंतर 950 किलोमीटर इतकेच म्हणजे अत्यंत कमी होते. 
     
    5) चीनने गेल्या काही वर्षांत श्रीलंका, पाकिस्तान आदी देशांमध्ये अनेक प्रकल्प उभारले. त्याला प्रतिसाद म्हणून भारताने विदेशामध्ये विकसित केलेले सिटवे हे पहिले महत्त्वाचे बंदर आहे.  
     
     
    म्यानमार
    ब्रिटिश भारताचे पुढीलप्रमाणे तुकडे झाले आणि त्यातील एक भाग पूर्वी  ब्रह्मदेश म्हणून ओळख़ला जाई.
    1) 1935 च्या बर्मा अ‍ॅक्टनुसार ब्रह्मदेश स्वतंत्र झाला. 
    2) 1947 मध्ये भारत व पाकिस्तानची निर्मिती झाली. 
    3) 1971 मध्ये बांगला देश अस्तित्वात आला. 
     
    1) भारत व म्यानमारमध्ये 1640 किमी लांबीची सीमारेषा असून म्यानमार-चीन सीमारेषा 2000 किमी लांबीची आहे. 
     
    2) म्यानमार देशाला लागून असलेल्या भारताच्या सीमावर्ती राज्यांमधले अरुणाचल हे प्रमुख राज्य आहे तर मिझोराम, मणिपुर आणि नागालँड ह्यांचीही सीमा म्यानमारला भिडलेली आहे.
     
    3) म्यानमार हा दक्षिण पूर्व आशियाचे प्रवेशद्वार मानला जातो. आसियान या व्यापारी समूहाचा शेवटचा सदस्य देश म्यानमार आहे.
     
    4) भारताने नेपाळ, भूतान, बांगला देश, म्यानमार आदी देशांना गेल्या पाच-सहा वर्षांमध्ये अनेक प्रकल्पांसाठी मोठ्या निधीची घोषणा केली. म्यानमारमध्ये तेल उत्खनन, खजिन संपत्तीचा शोध, रस्तेबांधणी, रेल्वेबांधणी यासंदर्भात भारतीय कंपन्यांकडे अनेक कंत्राटे आली होती आणि भारतानेही यासंदर्भात अनेक घोषणा केल्या, मात्र ईशान्य भारतातून म्यानमारमार्गे कंबोडियाला जाणारा 2700 किलोमीटरचा रस्तेमार्ग पूर्ण झालेला नाही. 

    चीनचा म्यानमारवरील प्रभाव -
     
    1) चीनच्या म्यानमारमधील गुंतवणुकी मोठ्या आहेत. म्यानमारच्या माध्यमातून चीनचा हिंदी महासागरातील प्रवेश सुकर होणार असल्याने चीन म्यानमारवर प्रभाव पाडण्याचा जोरकसपणे प्रयत्न करीत आहे. मात्र चीनचा कावेबाजपणा लक्षात आल्यानंतर म्यानमारलाही चीनवरील परावलंबित्व कमी करण्याची गरज जाणवू लागली. त्यामुळे म्यानमारने परराष्ट्र धोरणामध्ये विविधता आणण्याचे प्रयत्न सुरू केले. म्हणून आंग स्यान स्यू की या जाणीवपूर्वक भारताबरोबरचे संबंध विकसित करण्याच्या प्रयत्न करीत आहेत.
     
    2) म्यानमार सरकारला सतावणारे एकूण 22 सशस्त्र बंडखोर गट असून त्यामध्ये युनायटेड वा स्टेट आर्मी UWSA आणि कचिन इंडिपेंडन्स आर्मी KIA हे प्रमुख आहेत. भारत चीन म्यानमार ह्यांच्यामधल्या सीमावर्ती भागामध्ये ह्यांच्या हालचाली सुरु असतात. ह्या गटांना चीन शस्त्रास्त्रांसकट अनेक पद्धतीची मदत करत असतो. 
     
    3) KIA गट भारतविरोधी उल्फा आणि एनएसीएन खापलांग या फुटीरतावादी गटांना मदत करतो.  त्यांच्याकडे चीनने दिलेली अत्याधुनिक हत्यारे मिळतात.  
     
    4) चीनच्या सीमेवरील युन्नान ह्या म्यानमारच्या प्रांतामध्ये वरील संघटना हैदोस घालत असतात. ह्या फुटीरतावादी गटांना मदत करून म्यानमारला जेरीला आणण्याचे राजकारण चीन करत असतो.

    बिग ब्रदर सिंड्रोम -
    1) भारतीय उपखंडात भारताचे आकारमान मोठे असून इतर देश आकाराने व क्षमतेने लहान आहेत. त्यामुळे भारत आपल्यावर दादागिरी करेल का, आपल्यावर काही अन्यायी गोष्टी लादेल का अशी भीती या छोट्या देशांत दिसून येत होती. याला ‘बिग ब्रदर सिंड्रोम’ म्हणतात. या देशांच्या मनात असणार्‍या भारताविषयीच्या भीतीचा फायदा चीनने उचलून त्यांना प्रचंड आर्थिक मदत देऊन चीन भारताला घेरण्याचा प्रयत्न करीत होता.
     
    2) दक्षिण आशिया मुक्त व्यापार करार किंवा दक्षिण आशिया प्राधान्य करार हे यशस्वी न होण्यामागे हे कारण होते. 
     
    3) 2015 पासून भारताने कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता  भूतान, श्रीलंका, म्यानमार, नेपाळ, बांगला देश आदी देशांना आर्थिक मदत द्यायला सुरुवात केली.  
     
    4) आशियातील जे देश चीनच्या  विस्तारवादामुळे असुरक्षित बनले आहेत त्यांनाही, भारत चीनला पर्याय ठरू शकतो, हे भारताने सूचित केले. भारताने अफगाणिस्तान, पॅलेस्टाईनमध्ये विकास प्रकल्प जसे पूर्ण केले. तसेचे नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगला देशातील प्रलंबित प्रकल्प प्राधान्यक्रमाने पूर्ण करणे गरजेचे आहे. 
     

    ईशान्य भारताचा विकास
    1) ईशान्य भारत हा लँडलॉकड प्रदेश आहे. त्यामुळे म्यानमार आणि बांगला देशसोबतची कनेक्टिव्हिटी ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी गरजेची आहे. ईशान्य भारतातील उद्योगांना म्यानमारच्या माध्यमातून व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया या देशांची बाजारपेठ मिळणार आहे. 
     
    2) ईशान्य भारतात मोडणारी आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा ही आठ राज्ये भू-राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहेत. या राज्यांनी भारताच्या एकूण क्षेत्रफळाचा 8 टक्के भूभाग व्यापला असून, देशाची सुमारे 4 टक्के लोकसंख्या येथे राहते. हा प्रदेश उर्वरित भारताशी जमिनीच्या एका चिंचोळ्या पट्ट्याने जोडलेला आहे, जो पश्‍चिम बंगाल राज्यातील सिलिगुडी जिल्ह्यात येतो.
     
    3) या आठ राज्यांमध्ये मिळून देशाची सुमारे 5180 किमी आंतरराष्ट्रीय सीमा आहे. हा प्रदेश संपूर्णतः भूवेष्टित आहे, ज्याभोवती बांगलादेश, म्यानमार, भूतान, नेपाळ आणि चीन असे पाच देश आहेत. ही आठही राज्ये कुठल्या ना कुठल्या देशाशी जोडलेली आहेत. म्हणून प्रत्येक पूर्वोत्तर राज्य हे शब्दशः सीमावर्ती राज्य आहे.
     
    4) भारत-बांगला देश यांच्यामध्ये जवळपास 4000 किलोमीटरची सीमारेषा आहे; पण दोघांमधील व्यापार हा समुद्रमार्गे किंवा नदीमार्गेच होतो. कारण, तशा प्रकारचे ट्रान्झिट रुट सीमेवर तयार केलेले नाहीत. हे लक्षात घेऊन  भारताने बांगला देशमध्ये मालवाहतूक रेल्वे पाठवली होती. अशाप्रकारचे रेल्वेमार्ग, रस्तेमार्ग विकसित झाल्याशिवाय ईशान्य भारताचा विकास होणे शक्य नाही. 

      ‘मल्टिमोडल’ प्रकल्प  -
    ईशान्येच्या राज्यांना शेजारी देशांशी जोडल्याशिवाय त्यांचा खर्या अर्थाने विकास होणार नाही. संपूर्णत: भूवेष्टित असल्यामुळे बाह्य जगताशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आजूबाजूच्या देशांतून जावं लागणार, ही निकड ओळखून सरकारने त्या दिशेने पावलं उचलली.  1991 पासून अस्तित्वात असलेल्या ‘लुक ईस्ट’ धोरणाचं 2015 मध्ये ‘ऍक्ट ईस्ट’मध्ये रुपांतर केलं, त्यायोगे भारताच्या पूर्वेकडील शेजारी देशांशी संबंधांत वृद्धी झाली.
     
    उद्दिष्ट्ये-
    1) पूर्वोत्तर राज्यांचा सभोवतालच्या प्रदेशाशी संपर्क प्रस्थापित करणं.
    2) नेपाळ-भूतानसारख्या भूवेष्टित, दुर्गम आणि डोंगराळ देशांसाठी सागरी बंदरांकडे जाण्याचा मार्ग सुकर करणं 
    3) दक्षिण आशियाई अर्थव्यवस्थांबरोबर व्यापार व निवेश वाढवणं. 
    4) भारत-बांगलादेश एकत्र येऊन आगरताळा आणि बांगलादेशचं प्रसिद्ध बंदर चितगाव यांना जोडणारी रेल्वे बांधण्याचं काम करणं.

    पूर्वेकडील प्रमुख कनेक्टिव्हिटी प्रकल्प -
    1) भारत-म्यानमार-थायलंड त्रिराष्ट्रीय महामार्ग
    2) कलादान मल्टिमोडल प्रकल्प
    3) रिह-तिदिम महामार्ग
    4) गंगा-ब्रह्मपुत्रा जलवाहतूक
    5) बी.बी.आय.एन. (बांगलादेश-भूतान-इंडिया-नेपाळ) कॉरिडोर

    नेपाळला अंतर्देशीय जलमार्गांतर्फे समुद्राकडे प्रवेश -
    1) नेपाळच्या सर्व मोठ्या नद्या शेवटी गंगेला येऊन मिळतात. नंतर गंगा नदी बांगलादेशमधे प्रवेश करते. नेपाळी नद्यांचे भारतातील गंगेच्या खोर्‍याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. 
     
    2) कमी पावसाच्या दिवसांतही नेपाळातील या नद्यांमधूनन पाणी वाहते. यामुळे नेपाळला अंतर्देशीय जलमार्गांतर्फे सागरी व्यापार मार्गांना जोडण्याची जी भारताची भौगोलिक क्षमता आहे, त्याचा वापर करण्याकरता प्रयत्न सुरू आहेत. 
     
    3) याचा बिहार आणि उत्तर प्रदेशाला फायदा होणार आहे. 


    प्रश्‍नमंजुषा (29)
     
    1) कलादान मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे/आहेत ?
    अ) पलेटवा ते झोरीनपुरीपर्यंत 110 किमी रस्ते वाहतूक
    ब) सिटवे बंदर ते पलेटवा गावापर्यंत 158 किमी जलवाहतूक 
    क) झोरीनपुरी ते आगरताळा 100 किलोमीटरची रस्ते वाहतूक
    ड) हल्दिया ते सिटवे बंदरापर्यंत 579 किमी सागरी वाहतूक
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ, ब, क
    2) अ आणि ब
    3) अ, क आणि ड
    4) फक्त क आणि ड
     
    2) खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्याची सीमा म्यानमारला भिडलेली नाही ?
    1) मणिपूर 
    2) नागालँड 
    3) त्रिपुरा
    4) अरुणाचल प्रदेश
     
    3) बी. बी. आय. एन. कॉरिडोरमध्ये कोणत्या देशाचा समावेश होतो ?
    a) बांगलादेश 
    b) भूतान
    c) इंडिया
    d) नेपाळ
    e) इराण
    f) इंडोनेशिया
    पर्यायी उत्तरे :
    1) (a), (b), (c), (d)
    2) (b), (c), (d), (e)
    3) (a), (d), (e), (f)
    4) (a),  (c), (e), (f)
     
    4) खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
    अ) 1991 पासून अस्तित्वात असलेल्या ‘लुक ईस्ट’ धोरणाचं 2001 मध्ये ‘ऍक्ट ईस्ट’मध्ये रुपांतर केलं, त्यायोगे भारताच्या पूर्वेकडील शेजारी देशांशी संबंधांत वृद्धी झाली.
    ब) 2001 पासून अस्तित्वात असलेल्या ‘लुक ईस्ट’ धोरणाचं 2015 मध्ये ‘ऍक्ट ईस्ट’मध्ये रुपांतर केलं, त्यायोगे भारताच्या पूर्वेकडील शेजारी देशांशी संबंधांत वृद्धी झाली.
    पर्यायी उत्तरे :
    1)  फक्त अ
    2) फक्त ब
    3) अ आणि ब दोन्ही
    4) कोणतेही नाही
     
    5) खाली दोन विधान दिलेली आहेत (अ) विधान असून (र) हे कारण आहे खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा.
    विधान (अ) : आंग स्यान स्यू की या जाणीवपूर्वक भारताबरोबरचे संबंध विकसित करण्याच्या प्रयत्न करीत आहेत.
    कारण (र) ;  चीनच्या सीमेवरील युन्नान ह्या म्यानमारच्या प्रांतामध्ये वरील संघटना हैदोस घालत असतात. 
    पर्यायी उत्तरे :
    (1) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
    (2) (अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
    (3) (अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
    (4) (अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.
     
    6) ब्रिटिश भारताचे विभाजन झाल्याने कोणकोणत्या देशांची निर्मिती झाली ?
    अ) 1971 मध्ये बांगला देश 
    ब) 1935 च्या बर्मा अ‍ॅक्टनुसार ब्रह्मदेश 
    क) 1947 मध्ये भारत व पाकिस्तान
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    पर्यायी उत्तरे :
    1) फक्त अ
    2) फक्त अ आणि ब
    3) फक्त अ आणि क
    4) अ, ब आणि क
     
    7) भारताने हाती घेतलेल्या कलादान मल्टिमोडल ट्रान्झिट ट्रान्सपोर्ट  प्रकल्पामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश नाही?
    1) बंदरांचा विकास
    2) मिझोराममधील  नदीमार्गांचा विकास
    2) म्यानमारमधील नदीमार्गांचा विकास
    3) मिझोराममधील महामार्गांचा विकास 
     
    8) ईशान्य भारतासंबंधी खालील विधाने विचारात घ्या:
    a) ईशान्य भारतातील 7 राज्यांमध्ये मिळून देशाची सुमारे 5180 किमी आंतरराष्ट्रीय सीमा आहे. 
    b) ईशान्य भारत हा प्रदेश संपूर्णतः भूवेष्टित असून त्याच्याभोवती बांगलादेश, म्यानमार, भूतान, नेपाळ आणि चीन असे पाच देश आहेत.
    वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
    1) फक्त (a)
    2) फक्त (b) 
    3) (a) व (b) दोन्ही 
    4) दोन्हीही नाहीत 
     
    9) ’सिलिगुडी कोरिडॉर’बाबतची खालील विधाने विचारात घ्या व अचूक पर्याय शोधा :
    अ) याची उत्तर-दक्षिण लांबी 22 किमी आहे.
    ब)  या निमुळत्या भागामुळे ईशान्य भारत आणि उत्तर बंगाल एकमेकांना जोडले गेले आहेत. 
    क) हा प्रदेश मुख्यत्त्वे प. बंगाल, आसाम व सिक्कीम दरम्यान आहे.
    ड) हा प्रदेश चिकन्स नेक नावानेही ओळखला जातो.
    पर्यायी उत्तरे :
    1) विधाने अ, ब आणि क बरोबर
    2) विधाने ब, क आणि ड बरोबर
    2) विधाने अ, ब आणि ड बरोबर
    4) विधाने अ, ब, क आणि ड बरोबर
     
    उत्तरे : प्रश्‍नमंजुषा (29)
    1-3
     
    2-3
     
    3-4
     
    4-4
     
    5-2
     
    6-4
     
    7-2
     
    8-2
     
    9-4

Share this story

Total Shares : 1 Total Views : 472