तर्कसंगत विचार व विश्लेषण क्षमता प्रश्नपुस्तिका (1)

  • तर्कसंगत विचार व विश्लेषण क्षमता प्रश्नपुस्तिका (1)

    तर्कसंगत विचार व विश्लेषण क्षमता प्रश्नपुस्तिका (1)

    • 04 Jan 2021
    • Posted By : Study Circle
    • 970 Views
    • 0 Shares
    1) पुढे एक विधान व त्यापुढे अ, ब व क ही गृहीतके दिली आहेत. तुम्ही ते विधान व गृहीतके सत्य मानायची आहेत आणि ती गृहीतके दिलेल्या विधानात अंतर्निहित आहेत वा नाहीत याचा निर्णय घेऊन त्यानुसार पर्यायाची निवड करायची आहे.
          विधान : 
          दोन तृतीयांशपेक्षा अधिक लोकसभा सदस्य हे "x" या पक्षाचे सदस्य आहेत.
          गृहीतके : 
          अ) "x" पक्षाचा कोणीही सदस्य भ्रष्टाचारी नाही. 
          ब) निवडणुकीत फक्त 60% मतदारांनी मतदान केले.
          क) लोकांनी "x" पक्षाला मते दिली कारण त्यांनी "x" पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यावर विश्वास ठेवला. 
          1) फक्त अ व क अंतर्निहित आहेत
          2) फक्त ब व क अंतर्निहित आहेत
          3) सर्व अंतर्निहित आहेत
          4) यातील एकही  अंतर्निहित नाही. 

    2) खाली एक विधान व त्यावर आधारित दोन पूर्वधारणा दिलेल्या आहेत. कोणती/कोणत्या पूर्वधारणा दिलेल्या कथनात अंतर्निहित आहे/आहेत, याबाबत योग्य पर्याय निवडा.
          विधान : एका राष्ट्रीयकृत बँकेने राष्ट्रीय दैनिकात जाहीरात दिली की पात्र, उमेदवारांनी चार्टर्ड अकाऊंटन्ट च्या 100 पदांसाठी आवेदन करावे.
          पूर्वधारणा :
          i) पात्र चार्टर्ड अकाऊंटन्ट या जाहिरातीला प्रतिसाद देतील.
          ii) राष्ट्रीयीकृत बँकेत नियुक्ती हवी असलेले पात्र चार्टर्ड अकाऊंटन्ट पर्याप्त संख्येत उपलब्ध आहेत.
          पर्यायी उत्तरे :
          1) केवळ पूर्वधारणा (i) अंतर्निहित आहे
          2) केवळ पूर्वधारणा (ii) अंतर्निहित आहे
          3) पूर्वधारणा (i) व (ii) दोन्ही अंतर्निहित आहे.
          4) पूर्वधारणा (i) व (ii) दोन्ही अंतर्निहित नाहीत

    3) पुढे एक विधान दिले असून त्यापुढे I व II या क्रमाने निर्देशित केलेली दोन गृहीतके दिली आहेत. गृहीतके म्हणजे तसे काही मानून वा धरून चालणे. तुम्ही विधान व गृहीतके विचारात घेऊन कोणते/ती गृहीतके विचारात अंतर्निहित आहेत याचा निर्णय घ्या.
          विधान :
          पालक-अध्यापक सभेत मुख्याध्यापक म्हणाले - ज्या मुलांना पालकांकडून उत्तेजन मिळते ती मुले परीक्षेत चांगले कार्यमान दाखवतात.
          गृहीतके :
          I) काही पालक मुलांना उत्तेजन देत नाहीत.
          II) कदाचित पालक मुख्याध्यापकांचा सल्ला मानतील.
          पर्यायी उत्तरे :
          1) गृहीतक I अंतर्निहित आहे.
          2) गृहीतक II अंतर्निहित आहे.
          3) गृहीतक I व II अंतर्निहित आहे.
          4) I व II दोन्ही गृहीतके अंतर्निहित आहे.

    4) पुढे  एक विधान व त्यापुढे त्याचा आधार मानली गेलेली (a) व (b) ही दोन गृहीतके दिली आहेत. ती वाचून त्यांच्या संदर्भात पुढीलपैकी उचित पर्याय निवडा.
          विधान : समान शालेय शिक्षण प्रणाली बाबत कोणी कितीही आग्रही असले तरीही ते शक्य नाही हे लक्षात घेऊन आर्थिक व सामाजिक दृष्ट्या कमकुवत गटातील मुले शिकतात त्या शाळांकडे शासनाने लक्ष केंद्रित करायला हवे. 
          गृहीत (a : या गटातील मुलांना विविधतापूर्ण संपर्काचा (exposure) लाभ होत नाही, म्हणून बौद्धिक विकास योग्य प्रकारे होत नाही.
          गृहीत (b) : या गटातील मुलांच्या घरी पोषक शैक्षणिक वातावरणाचा अभाव असतो. 
          पर्यायी उत्तरे :
          1) (a) व (b) ही दोन्ही गृहीतके विधानात अध्याहृत आहेत.
          2) (a) व (b) ही दोन्ही गृहीतके विधानात अध्याहृत नाहीत    
          3) फक्त (a) हे गृहीतक विधानात अध्याहृत आहे
          4) फक्त (b) हे गृहीतक विधानात अध्याहृत आहे 

    5) पुढे दिलेल्या विधानानंतर I व II या क्रमांकांची गृहीतके दिली आहेत. गृहीतक म्हणजे तसे काही मानून न धरून चालणे. तुम्ही विधान वा गृहीतक विचारात घेऊन कोणते/कोणती गृहीतके विधानात अंतर्निहित (अप्रत्यक्ष सूचित) आहे/आहेत याचा निर्णय घ्या :
          विधान :
          रमेशचा उमेशला सल्ला-तुझ्या जीवनात यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट कर.
          गृहीतके :
          I) उमेश रमेशचा सल्ला ऐकतो.
          II) जीवनात यशस्वी होणे इष्ट आहे.
          पर्यायी उत्तरे :
          1) गृहीतक (I) अंतर्निहित आहे.
          2) गृहीतक (II) अंतर्निहित आहे.
          3) (I) वा (II) अंतर्निहित आहे.
          4) दोन्ही गृहीतके (I) आणि (II) अंतर्निहित आहेत.

    6) एक प्रश्न आणि दोन विधाने दिलेली आहेत. प्रश्न सोडविण्यासाठी, दिलेल्या विधानांमधील माहिती पुरेशी आहे किंवा नाही, याबाबतचा योग्य पर्याय निवडा.
          प्रश्न M चा भाऊ कोण आहे ? 
          विधाने :
          I) M हा N चा भाऊ आहे.      
          II) M चे वडील, N च्या आईचे पती आहेत.
          1) फक्त विधान (I) मधील माहिती पुरेशी
          2) फक्त विधान (II) मधील माहिती पुरेशी
           3) विधाने (I) व (II) व मधील माहिती एकत्रित आवश्यक
          4) विधाने (I) व (II) मधील माहिती एकत्रित ही पुरेशी नाही

    7) प्रत्येक खेळ साहित्य संच खोक्यात बांधला आहे आणि हे छोटे खोके पुन्हा वाहतूक खोक्यांत बांधले आहेत. लॉरीच्या सामान ठेवण्याच्या भागात असे किती खोके मावतील?
          तथ्य 1 - प्रत्येक वाहतूक खोका घनाकार असून त्याच्या एका बाजूचे माप पन्नास सेंटीमीटर आहे.
          तथ्य 2 - लॉरीचे सामानाच्या जागेचे क्षेत्रफळ तीस चौरस मीटर आहे.
          प्रश्नाचे उत्तर देण्याच्या संदर्भात तथ्य 1 व 2 चे उचित वर्णन करणार्‍या पर्यायाची निवड करा.
          1) दोन्ही तथ्ये एकत्र मिळून पुरेशी आहेत, पण कोणतेही तथ्य एकेकटे पुरेसे नाही.
          2) प्रत्येक तथ्य एकेकटे पुरेसे आहे.
          3) दोन्ही तथ्ये एकत्रित मिळून पुरेशी नाहीत.
          4) तथ्य एक एकटे पुरेसे आहे, पण तथ्य दोन एकटे पुरेसे नाही.

    8) पुढे पाच विधाने दिली आहेत व त्यापुढे विशिष्ट क्रमाने तीन विधाने असलेले पर्याय दिले आहेत. सुरुवातीच्या दोन विधानांच्या आधारे तिसरे विधान हे यथार्थ निष्कर्ष ठरते असा पर्याय निवडा.
           विधाने :
          a) वाहतुकीची कोंडी हवेतील कार्बन मोनॉक्साईड वाढवते.
          b) वाहतुकीची कोंडी आरोग्याला घातक आहे.
          c) वाहतुकीची कोंडी नेहमी आरोग्याला घातक नसते.
          d) वाहतुकीची कोंडी नेहमीच कार्बन मोनॉक्साईडमध्ये भर पडायला कारणीभूत ठरत नाही.
          e) कार्बन मोनॉक्साईडमध्ये पडणारी भर आरोग्याला घातक असते.
          1) (c), (b), (e)
          2) (a), (e), (b)
          3) (e), (b), (a)
          4) (c), (d), (e)

    9) पुढील परिच्छेद काळजीपूर्व वाचा -
           अनेक उत्सवांत व प्रसंगात आनंद व्यक्त करण्यासाठी मोठा आवाज करणारे फटाके वाजवणे, प्रकाशरंगांचा खेळ करणारे फटाके जाळणे, ध्वनिवर्धकाचा वापर करून संगीत वाजवणे इत्यादी गोष्टींची मजा लुटणे ही आमची परंपरा आहे. याची मजा लुटताना लहान मुले, तरुण मंडळी व वृद्ध अशा सर्वच व्यक्ती उत्साही झालेल्या असतात. अनेक लोक ध्वनिप्रदूषणाच्या, हवा प्रदूषणांच्या कारणांचा हवाला देत आमच्या पूर्वापार जपलेल्या परंपरांना मोडीत काढू पाहतात. पण आमच्या मुलाबाळांपर्यंत ही परंपरा पोहोचविण्यासाठी आमचा अभिमान असलेली ही परंपरा जपण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
          हा परिच्छेद पुढीलपैकी कोणत्या विधानाची उत्तम पाठराखण करतो?
          1) आनंदाला साथ देण्यासाठी आवाजांची, प्रकाशरंगांची साथ ही हवीच.
           2) मुलाबाळांना प्रकाशाचे व आवाजांचे आकर्षण असतेच त्यामुळे त्यांचा आनंद हिरावून घेणे अयोग्य आहे.
           3) आमच्या परंपरांचा आम्हाला अभिमान असल्यामुळे यावर कायद्याने बंदी आणण्याचा विचार करणार्‍यांना आम्ही विरोध करणारच.
           4) प्रदूषणांचा बागुलबोवा उभा करून परंपरा मोडीत काढणे हे धर्मविरोधी आहे.

    10) पुढील परिच्छेदातील काही विधाने त्यांच्यापुढील वर्णाक्षर क्रमाने दाखवली आहेत. त्यांच्या आधारे परिच्छेदातील अधोरेखित विधानाला पुष्टी देणारा पर्याय निश्चित करा.
           वीडमेन फ्रांन यांनी निश्चित केलेल्या वैज्ञानिक नियमानुसार साधारणपणे जे पदार्थ चांगले वीजवाहक आहेत ते चांगले उष्णतावाहकही असतात हे आपण क्रमिक पुस्तकातून शिकलो आहोत (a). 
           व्हॅनेडियमपासून व्हॅनेडियम डायऑक्साईड हे निळे असेंद्रिय संयुग बनते (b). 
           हे संयुग उत्तम वीजवाहक आहे परंतु त्याची उष्णता वाहून नेण्याची क्षमता नगण्य आहे (c). 
           67 अंश सेंटिग्रेडपेक्षा कमी तापमानाला व्हॅनेडियम सर्वसाधारण अधातूंप्रमाणे पूर्णतया उष्णतारोधक बनतो (d). 
           त्याहून जास्त तापमानाला तो सामान्य धातूंप्रमाणे उत्तम वीजवाहक व उष्णतावाहक असतो (e). 
           याचा अर्थ तो विशिष्ट तापमानानुसार धातू-अधातू गुणविशेष दाखवतो. याचा अर्थ पदार्थाची उष्णता वहनाची क्षमता सर्वस्वी त्या पदार्थातील मुक्त इलेक्ट्रॉन्सवर अवलंबून नसते. 
           विविध वैशिष्ट्ये बाळगून असलेले हे ”चलाख द्रव्य” त्याच्या उष्णतारोधकत्वामुळे औष्णिक इंजिनांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल.
           1) फक्त (e) पुरेसे
           2) फक्त (d) आणि (e) दोन्ही आवश्यक
           3) (a), (b) आणि (c) तिन्ही आवश्यक
           4) फक्त (d) पुरेसे

    11) स्मृतिभ्रंशात मेंदूच्या नेहमीच्या प्रतिरोधक पेशी त्याऐवजी अर्जिनिन हे पोषक वापरायला सुरुवात करतात. या प्रक्रियेत औषधोपचाराने अडथळा निर्माण करून संशोधकांनी स्मृतिभ्रंशाचे लक्षण असणार्‍या गुठळ्या मेंदूत तयार होण्याला प्रतिबंध केला आहे. यामुळे उंदरांतील स्मृतिर्‍हासाला आळा घातला गेला. प्राण्यावर चाचणी घेतलेले कोणतेही तंत्र माणसाच्या बाबतीत उपयोगी ठरेल याची हमी देता येत नसली तरी पुढे आलेली माहिती आशादायक आहे. कारण आत्तापर्यंत स्मृतिभ्रंश या विकारातील प्रतिरोधक पेशी आणि अर्जिनिन यांची भूमिका अजिबात माहीत नव्हती.
           पुढीलपैकी कोणत्या अनुमानाला / अनुमानांना वरील माहिती पाठबळ देत नाही ?
           a) प्रतिरोधी पेशींकडून होणारा अर्जिनिनचा वापर मेंदूत गुठळ्या तयार होण्याला कारणीभूत ठरतो हे या संशोधनातून प्रस्थापित झाले आहे.
           b) या संशोधनामुळे मेंदूत गुठळ्या तयार व्हायला प्रतिबंध करणार्‍या पेशी अर्जिनिन हे पोषक वापरायला सुरुवात करतात व त्यामुळे त्यांना प्रतिरोध क पेशी म्हणून कार्य करता येत नाही हे तथ्य उलगडले आहे.
           c) या संशोधनामुळे, मेंदूत गुठळ्या व्हायला प्रतिबंध करणार्‍या प्रतिरोधक पेशी कार्य करणे थांबवतात आणि अर्जिनिन हे पोषक वापरायला सुरुवात करतात हे उलगडले आहे.
           d) मेंदूत गुठळ्या होण्याला प्रतिबंध करणारे पोषक अर्जिनिन हे मेंदूला नियमितपणे काम करू देणार्‍या पेशींकडून वापरले जाते.
    पर्यायी उत्तरे :
           1) (a) आणि (c)
           2) (c) आणि (d)
           3) फक्त (d)
           4) फक्त (b)

    12) “हिंदी महासागर हा दक्षिण महासागरापेक्षा मोठा आहे.” हा निष्कर्ष नेहमी सत्य ठरवणारी दोन तथ्ये ओळखा.
           तथ्ये :
           अ) अ‍ॅटलांटिक हा आर्क्टिकपेक्षा मोठा आहे.
           ब) दक्षिण महासागर हा सर्वात लहान नाही.
           क) प्रशांत महासागराचा विचार केला नसता, तर अ‍ॅटलांटिक महासागर सर्वात मोठा ठरला असता.
           ड) हिंदी महासागर तिसरा मोठा आहे.
           1) अ आणि ब
           2) अ आणि क
           3) ब आणि क
           4) ब आणि ड

    13) “20 विद्यार्थी परीक्षा अनुत्तीर्ण झाले.“
           हा निष्कर्ष नेहमी सत्य ठरवणारी दोन तथ्ये ओळखा.
           तथ्ये :
           a) 40 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले.
           b) 10 विद्यार्थ्यांनी परीक्षा पूर्ण केली नाही म्हणून ते उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण झाले नाहीत.
           c) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा 2 : 1 ने जास्त आहे.
           d) अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या परीक्षा पूर्ण न करणार्‍यांपेक्षा 5 : 1 ने जास्त आहे.
           पर्यायी उत्तरे :
           1) (a), (b)
           2) (a), (c)
           3) (b), (c)
           4) (b), (d)

    14) सर्व गोल त्रिकोण आहेत. काही त्रिकोण चौकोन आहेत. म्हणून सर्व गोल चौकोन आहेत हे विधान :
           1) नेहमीच सत्य आहे.
           2) नेहमीच असत्य आहे
           3) खात्रीने सांगता येत नाही.
           4) वरील सर्व सत्य आहेत

    15) परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत. या विधानातून खालीलपैकी कोणता निष्कर्ष निघू शकेल?
           1) कठोर परिश्रम करणारे सर्वजण उत्तीर्ण होतात.
           2) परीक्षेचा कठोर परिश्रमाशी संबंध असतो.
           3) कठोर परिश्रमाशिवाय कोणीही उत्तीर्ण होऊ शकत नाही.  
           4) कठोर परिश्रम करणारी व्यक्ती संतुष्ट असते. 

    16) पुढीलपैकी एक व्यक्ती चुकीचे विधान करते. जर दोन व्यक्ती योग्य विधाने करत असतील, तर कोणत्या पक्षाने निवडणूक जिंकली?
           कमा = "A'' किंवा "B'' पैकी कोणत्याही पक्षाने निवडणूक जिंकली नाही.
           नमा = "A'' पक्षाने निवडणूक जिंकली.
           पमा = "A'' किंवा "B'' पैकी एका पक्षाने निवडणूक जिंकली.
           1) A          
           2) B
           3) दोन्ही पक्ष    
           4) कोणताही पक्ष जिंकला नाही

    17) पुढे सहा विधाने दिली आहेत व त्यापुढे तीन विधाने एकत्र करून तयार केलेले चार संच दिले आहेत. तर्कसंगत विधाने असलेला संच निवडा.
           a) सर्व लाचखाऊ गुन्हेगार आहेत.
           b) कोणाही गुन्हेगाराला समाज कमी लेखत नाही.
           c) काही कपटी लोक लाचखाऊ आहेत.
           d) काही कपटी लोक गुन्हेगार नाहीत.
           e) काही कपटी लोक गुन्हेगार आहेत.
           f) लाच खाणे हा गुन्हा आहे.
           पर्यायी उत्तरे :
           1) (f), (b), (d)
           2) (a), (d), (e)
           3) (f), (e), (d)
           4) (a), (c), (e)

    18) बंडू मन्यापेक्षा उंच उडी मारतो. विली बंडूपेक्षा उंच उडी मारतो. मन्या विलीपेक्षा उंच उडी मारतो. 
           या तीन विधानांपैकी पहिली दोन विधाने सत्य असल्यास तिसर्‍या विधानाचे जास्तीत जास्त तर्कसंगत वर्णन करणारा पर्याय निवडा.
           1) पहिल्या दोन विधानातील माहिती तिसर्‍या विधानाची सत्यासत्यता ठरवण्याच्या दृष्टीने पुरेशी नाही.
           2) ते विधान खात्रीने सत्य आहे.
           3) ते विधान खात्रीने असत्य आहे.
           4) ते विधान बहुतेक सत्य असावे.  

    19) द्राक्षांपेक्षा स्ट्रॉबेरी महाग आहेत.
           स्ट्रॉबेरी अंजीरांपेक्षा स्वस्त आहेत.
           द्राक्षे व अंजीर यांच्या तुलनेत स्ट्रॉबेरी स्वस्त आहेत.
           जर पहिली दोन विधाने सत्य असतील तर तिसरे विधान-
           1) निश्चितपणे सत्य आहे.
           2) सत्य आहे असे खात्रीपूर्वक सांगता येणार नाही.
           3) खात्रीने असत्य आहे.
           4) खात्रीपूर्वक काही सांगता येणार नाही.

    20) “शालीन कर्नाटक संगीत गायक आहे.” हे एकत्रितपणे सिद्ध करणारी दोन विधाने निवडा.
           अ) शालीन गानवृंदासाठी गातो.
           ब) कर्नाटक संगीत शालीनला सर्वात जास्त आवडते.
           क) कर्नाटक किंवा हिंदुस्थानीसारख्या गायला कठीण संगीतासाठी भरपूर तालीम केलेल्या आवाजाची गरज असते.
           ड) शालीनचा गानवृंद कर्नाटक संगीत सादर करतो.  
           इ) शालीनने कर्नाटक संगीताचा अनेक वर्षे सराव केला आहे.
           1) अ - ड   
           2) अ - इ
           3) अ - ब
           4) अ - क

    21) सर्व विचारवंत साहित्यिक आहेत. काही साहित्यिक शिक्षक आहेत. या माहितीच्या आधारे अधिक ग्राह्य विधानाचा पर्याय निवडा.
           1) सर्व साहित्यिक विचारवंत आहेत.
           2) सर्व शिक्षक विचारवंत आहेत.
           3) काही साहित्यिक शिक्षक नाहीत.
           4) सर्व शिक्षक साहित्यिक आहेत.

    22) पुढे दिलेल्या पर्यायातून प्रतिपादन (A) व त्याचे कारण (R) यांच्या संदर्भात योग्य निवड करा.
           प्रतिपादन (A) : सरकार चालवीत असलेल्या शाळातून 6 ते 15 वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत प्राथमिक शिक्षण दिले जात असेल तरीही अल्पसंख्य पालक आपल्या मुलांना या शाळांत दाखल करण्यासाठी इच्छुक असतात.
           कारण (R) : ज्या ठिकाणी सरकारी शाळा आहेत त्याच भागात सरकार दबाव आणणार्‍या व्यवस्थापनांना खाजगी शाळा सुरू करण्याची परवानगी देते व बहुसंख्य पालकांना वाटते की खाजगी शाळा चांगले शिक्षण देतात व म्हणून ते आपल्या मुलांना खाजगी शाळेत दाखल करतात.
           1) (A) व (R) दोन्ही स्वतंत्रपणे सत्य आहेत व (R) हे (A) चे योग्य कारण आहे.
           2) (A) व (R) दोन्ही स्वतंत्रपणे सत्य आहेत परंतु (R) हे (A) चे योग्य कारण नाही.
           3) (A) सत्य आहे पण (R) असत्य आहे.
           4) (A) असत्य आहे पण (R) सत्य आहे.

    23) पुढे दिलेले प्रतिपादन आणि कारण अभ्यासा :
           प्रतिपादन (A) : गेल्या काही दशकात मोठ्या प्रमाणात जागतिक तापमान वृद्धी होत आहे.
           कारण (R) : आर्थिक विकासावर दिलेल्या जोरामुळे वातावरणात उत्सर्जित केल्या जाणार्‍या हरितगृह वायूंचे प्रमाण धोकादायक प्रमाणात वाढले आहे.
           1) (A) आणि (R) दोन्ही सत्य असून (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण आहे.
           2) (A) आणि (R) दोन्ही सत्य असले तरीही (R) हे (A) चे योग्य स्पष्टीकरण नाही
           3) (A) सत्य आहे परंतु (R) हे सत्य नाही.
           4) (A) असत्य आहे परंतु (R) हे सत्य आहे.

    24) कोणते/ती सामान्यीकरण/णे परिच्छेदात दिलेल्या माहितीशी तर्कदृष्टया सुसंगत आहे ?
    छंद म्हणून दोन संवर्धक निसर्गाचा अभ्यास करण्यात गुंतलेले आहेत. त्यांना शोध लागला की ऑलिव्ह रिडले कासवांची संख्या वेगाने घटत आहे. त्यांनी केलेल्या अनेक अभ्यासांच्या दरम्यान त्यांना खात्री पटली की भौगोलिक परिसरात राहणार्‍या समूहांच्या पिढ्यांचा त्या क्षेत्रातील जीव प्रकारांशी चांगला परिचय असतो. महाराष्ट्राच्या किनारी भागात राहणार्‍या लोकांच्या मदतीने त्यांनी या समस्येचा अभ्यास केला व त्यांना ऑलिव्ह रिडले कासवासह विविध प्रजातींचे संवर्धन करण्याची गरज समजायला त्यांना मदत दिली. या पुढाकारामुळे विविध किनार्‍यांवर गावातील लोक कासवांच्या घरट्यांची काळजी घेऊ लागले. लोकांनी अंडी उबवली जाऊन पिले समुद्राकडे चालत जाण्याच्या घटनेचा उत्सव सुरू केला. आता या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी विविध ठिकाणचे लोक या गावांना भेट देऊ लागले आहेत.
           a) लोकांनी संवर्धन कार्याला सहाय्य दिले कारण त्यांना त्यांची गावे पर्यटन ठिकाणे म्हणून विकसित करण्यात रस होता.
           b) संवर्धकांना या कामासाठी प्रसिद्धी मिळविण्यात रस होता. 
           c) अशा उपक्रमात लोकांना सहभाग घेऊ देता कामा नये कारण अंडी व कासव ते प्रोटिन्स देणारे अन्नघटक म्हणून खातात. 
           d) संवर्धकांना माहीत होते की क्षेत्रातील लोकांना त्यांच्या पर्यावरणाची चांगली माहिती असते आणि म्हणून ते ऑलिव्ह रिडले कासवांची काळजी घेतील. 
           पर्यायी उत्तरे :
           1) (a)  
           2) (c) व (d)  
           3) (a) व (c)   
           4) फक्त (d)

    25) सात सारख्या आकाराच्या सफरचंदांचे 12 मुलांत समान वाटप करायचे आहे. एकाही सफरचंदाचे चारपेक्षा जास्त तुकडे करायचे नाहीत. तर कमीत कमी तुकडे करुन समान वाटप करण्याची पद्धत पर्यायांतून निवडा.
           1) दिलेल्या अटींप्रमाणे असे समान वाटप करणे शक्य नाही.
           2) प्रत्येक सफरचंदाचे प्रत्येकी चार तुकडे करुन ते सारखे वाटायचे व चार शिल्लक ठेवायचे.
           3) चार सफरचंदांचे प्रत्येकी चार व तीन सफरचंदांचे प्रत्येकी तीन असे तुकडे करायचे
           4) चार सफरचंदांचे प्रत्येकी तीन असे व तीन सफरचंदांचे प्रत्येकी चार असे तुकडे करायचे.

    26) जेव्हा लाल X आहे, हिरवा Y आहे. जेव्हा हिरवा Y नाही, निळा Z आहे. पण जोवर लाल X असेल, निळा Z असणार नाही. ही सर्व माहिती सत्य आहे तर पुढीलपैकी सत्य विधान निवडा.
           1) निळा Z असताना, हिरवा Y आहे.
           2) लाल X नसताना, निळा Z नाही
           3) हिरवा Y नसताना, लाल X नाही.
           4) लाल X नसल्याने, हिरवा Y आहे.

    27) पुढे विधान आणि निष्कर्ष यांचे संच दिले आहेत. निष्कर्षाचे योग्य वर्णन करणारा पर्याय निवडा.
           विधाने :
           सर्व फळे भाजा आहेत.
           सर्व भाज्या फळे आहेत.
           काही खरबुजे फळे आहेत.
           निष्कर्ष :
           अ) सर्व भाज्या खरबुजे आहेत.
           ब) सर्व फळे खरबुजे आहेत
           क) सर्व भाज्या फळे आहेत.
           ड) काही खरबुजे भाज्या आहेत.
           1) दिलेल्या निष्कर्षापैकी एकही तर्कसंगत नाही
           2) दिलेले सर्व निष्कर्ष तर्कसंगत आहेत
           3) फक्त क हा निष्कर्ष तर्कसंगत आहे
           4) क आणि ड हे दोन्ही निष्कर्ष तर्कसंगत आहेत

    28) दिलेल्या विधानांच्या सहाय्याने अचूक निष्कर्ष शोधा.
           काही वाघ सिंह आहेत.
           काही सिंह गायी आहेत.
           काही ससे घोडे आहेत.
           निष्कर्ष : 
           a) काही वाघ घोडे आहेत
           b) काही गायी वाघ आहेत
           c)काही घोडे सिंह आहेत
           d) सर्व घोडे गायी आहेत 
           पर्यायी उत्तरे -
           1) फक्त (d)
           2) फक्त (b) आणि (d)
           3) सर्व (a), (b), (c) आणि (d)
           4) यापैकी नाही 

    29) पुढे दिलेली विधाने सत्य मानून (a) आणि (b) या निष्कर्षांबाबत निर्णय घेणारा पर्याय निवडा.
           विधाने :
           सर्व पिंपळ वनस्पती आहेत. 
           सर्व वनस्पती बांबू आहेत.
           निष्कर्ष :
           a) सर्व बांबू वनस्पती आहेत.
           b) सर्व पिंपळ बांबू आहेत.
           1) फक्त (a) सत्य आहे.
           2) फक्त (b) सत्य आहे.
           3) (a) किंवा (b) सत्य आहे.
           4) (a) आणि (b) दोन्ही सत्य आहेत.

    30) खाली दोन विधाने दिली आहेत, त्यावरून कोणता निष्कर्ष सत्य आहे?
           विधाने :
           i) सर्व कामगार टायपिस्ट आहेत.
           ii) काही टायपिस्ट मुले आहेत.
           निष्कर्ष :
           i) सर्व मुले टायपिस्ट आहेत.
           ii) सर्व मुले कामगार आहेत.
           iii) काही टायपिस्ट कामगार आहेत.
           पर्यायी उत्तरे :
           1) (i) व (ii) सत्य
           2) सर्व सत्य
           3) सर्व चुकीचे
           4) फक्त (iii) सत्य

    उत्तरे
     
    1-4

    2-3

    3-4

    4-1

    5-4

    6-4

    7-3

    8-2

    9-3

    10-2

    11-3

    12-4

    13-2

    14-3

    15-2

    16-1

    17-4

    18-3

    19-3

    20-1

    21-3

    22-1

    23-1

    24-4

    25-4

    26-3

    27-4

    28-4

    29-2

    30-4
     

Share this story

Total Shares : 0 Total Views : 970