आकलन घटकाची तयारी नमुना उतारे प्रश्नपुस्तिका (2)
- 14 Jan 2021
- Posted By : Study Circle
- 2795 Views
- 1 Shares
उतारा (1)
सजीवांमधील आकार, प्रकार, जीवनप्रक्रिया यामधील भिन्नतेस जैवविविधता म्हणतात. वनस्पती व प्राण्यातील विविधता त्यांच्या गुणधर्मातील, शारीरिक आकारमान, रचना, ठेवण, हालचाल, अन्नपाणी, घेण्याच्या पद्धती, अधिवास, कार्यक्षेत्र, प्रजननपद्धती, संगोपन, संततीचे नियमन, अधिक्षेत्र, पर्यावरणात राहण्याची अनुकूलता, शरीरात त्याप्रमाणे केलेले बदल, विशिष्ट अधिवासातच त्यांची झालेली जैवसंख्या वाढ या सर्व बाबतीत कोणताही एक सजीव किंवा त्याची प्रजाती ही दुसर्या प्रजातीपेक्षा भिन्न असते. त्यांच्यात अनेक बाबतीत विविधता असल्यामुळे सजीवातील या विविधतेस जैवविविधता असे म्हणतात. सजीवातील विविधता सजीवाच्या शरीराअंतर्गत असलेल्या पेशीतील गुणसूत्रे व गुणबिंदू यावर अवलंबून असते.
प्राण्यांच्या प्रत्येक वर्गात विविध प्रकारच्या प्रजाती, पोटजाती, उपजाती आहेत. अशाच प्रकारच्या जाती, प्रजाती वनस्पतींमध्येही आहेत. वनस्पतीमधील जैवविविधता प्राण्यांप्रमाणे विपुल आहे. जैवविविधतेचे महत्त्व जागतिक पातळीवर तसेच प्रादेशिक व स्थानिक पातळीवरही असते.
हरितवनस्पती प्रकाशसंश्लेषणातून हवेतील कर्बद्विप्रणिल वायूचे प्रमाण कमी करतात तसेच त्या ऑक्सिजन चक्र, नायट्रोजन चक्र, कार्बनचक्र व जलचक्र चालविण्यास निसर्गास मदत करतात. वनस्पती मृदेची धूप रोखतात. मानवजातीला जंगल व वनस्पती यांच्या जैवविविधतेचे विपुल फायदे असून ते उपकारक आहेत.
आवश्यक मानवी गरजांचा पुरवठा करणे व मानवी उपजीविकेसाठी पालकत्वाची भूमिका पार पाडणे ही कामे जैवविविधता करते. जागतिक लोकसंख्यावाढीचा जैवविविधतेवर विपरीत परिणाम होत आहे. याचबरोबर जंगलतोड, वाढते औद्योगिकरण, धरणांची उभारणी, खाणकाम, कीटकनाशके व रोगनाशकांचा वापर, अणुचाचण्या स्फोट, स्थलांतरित शेती, इत्यादींचा सुद्धा जैवविविधतेवर विपरीत परिणाम होत आहे.
‘बायोस्फिअर रिझर्व्ह’ची मूळ कल्पना 1973 - 74 मध्ये ‘युनेस्को’ ने मांडली. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या अभयारण्यासारख्या पारंपरिक योजनात व वन्य जीव व आजूबाजूच्या माणसांच्या वस्त्या यात निश्चित अशी सीमारेषा असते. मात्र ‘ बायोस्फिअर रिझर्व्ह’ मध्ये मानवी वस्त्या व नैसर्गिक संपदा यांचा अतूट संबंध असतो. त्यानुसार ‘वन्य जीव मंडळ‘ आरक्षणाची संरचना तयार केलेली असते. जंगलांचे भाग आरक्षित केलेले असतात. पहिला गाभा विभाग, दाट वनस्पती व समृद्ध प्राणी-जीवन हे या विभागाचे वैशिष्ट्य असते. वृक्षतोड, करणे, शिकार करणे या सर्व गोष्टींवर या विभागात पूर्णपणे निर्बंध असतात. दुसरा विभाग संक्रमणविभाग असतो. या विभागात बांधकामांना बंदी असते तसेच या विभागात काही वनस्पती, झाडे ही माणसाच्या वापरासाठी मुद्दाम वाढवली जातात. तिसर्या विभागाला बहुउद्देशीय विभाग म्हटले जाते. पर्यटन, अभ्यासकेंद्र, वन्यजीवनावर आधारित उद्योगधंदे यांस येथे प्रोत्साहन दिले जाते. तामिळनाडूतील निलगिरी पर्वत, सह्याद्रीतील ‘चांडोली राष्ट्रीय उद्यान’ तसेच ‘कोयना वन्यजीव अभयारण्य’ आणि ‘राधानगरी वन्यजीव अभयारण्य’ ही प्राथमिक नामांकनाची आरक्षित जीवमंडळे (बायोस्फिअर रिझर्व्ह) भारतात आहेत.
1) 1973-74 मध्ये युनेस्कोने कशाची संकल्पना मांडली?
1) पर्यावरण संरक्षण व संवर्धन
2) जैविक बहुविविधता
3) बायोस्फिअर रिझर्व्ह
4) पर्यावरण व्यवस्थापन
2) जैविक विविधतेचे महत्त्व कोणत्या पातळीवर असते ?
1) जागतिक
2) प्रादेशिक
3) स्थानिक
4) वरील सर्व
3) वन्यजीव मंडळ आरक्षणाच्या संरचनेबाबत योग्य जोड्या जुळवा.
1) गाभा विभाग अ) पर्यटनास प्रोत्साहन
2) संक्रमण विभाग ब) समृद्ध प्राणी जीवन
3) बहुउद्देशीय विभाग क) बांधकामांना बंदी
पर्यायी उत्तरे :
1) 1-क, 2-ब, 3-अ
2) 1-अ, 2-ब, 3-क
3) 1-क, 2-अ, 3-ब
4) 1-ब, 2-क, 3-अ
उतारा (2)
पूर्वीच्या काळात निर्माण होणारी संकटे ही बव्हंशी नैसर्गिक असत. मानवाची जसजशी प्रगती होऊ लागली, तंत्रज्ञानाचा विकास होऊन जसजशी त्याच्या राहणीमानात सुधारणा होऊ लागली, तसतशी संकटे वाढतच गेली. प्रगती करुन घेण्यासाठी मानवाने निसर्गव्यवस्थेत जी ढवळाढवळ केली त्याचाच हा परिणाम होता. निसर्ग आणि मानवसमाज अशा दोघांमुळे ही गुंतागुंत अधिकच वाढत गेली. कारण लोकसंख्येतील प्रचंड वाढ आणि प्रगती करुन घेताना निसर्गाच्या मार्गात आणलेले अडथळे यामुळे निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित अशी दुहेरी संकटे निर्माण झाली. इतकेच नव्हे तर या संकटांची भयानकता अधिकच वाढली. एक उदाहरण घेऊ. भूकंपाचा जबरदस्त हादरा ही नैसर्गिक घटना झाली परंतु त्यामुळे जर मानवाने बांधलेले धरण फुटले तर त्यातून वाहणारा पाण्याचा प्रचंड लोंढा हा नदीच्या परिसरात जीवित आणि वित्त यांची अपरिमित हानी घडवतो. याच प्रकारे मानवाच्या विकासाच्या धडपडीत जर पर्यावरणाचा समतोल ढासळला तर पर्यावरणाचीही मोठी हानी होऊन त्याचे भौगोलिक परिस्थिती आणि मानवी जीवनावर अनिष्ट परिणाम होतात. पर्यावरणातला समतोल ढळल्यामुळे वातावरणात बदल घडतात. बर्फमय प्रदेशातला बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढणे व त्यामुळे काही बेटे व किनारपट्ट्या पाण्याखाली बुडणे, हाही त्यातलाच एक प्रकार.
विकासापाठोपाठ आपत्तीचा धोका अधिकच वाढतो. त्यायोगे होणारी हानीही जास्त असते. मात्र त्याबरोबरच अशा वारंवार उद्भवणार्या संकटांची कारणे कोणती? त्यांचे परिणाम कोणते होतात? हेही लोकांच्या ध्यानात येते. त्यानुसार ते संकटाचा मुकाबला करू शकतात. प्रगतीमुळेच ज्या सोयीसुविधा निर्माण झाल्या, माहिती व तंत्रज्ञानाची जी प्रगती झाली, त्यायोगे संकटामधून बाहेर पडून लवकरात लवकर मानवी जीवन पूर्वपदाला येऊ शकते. संकटाच्या खुणाही शिल्लक राहत नाहीत. इतकेच नव्हे तर आपत्ती ही वरदान ठरून मानवाची अधिकच प्रगती होते. परिसराचा झपाट्याने विकास होतो. लातूर परिसरात जो प्रचंड भूकंप झाला, त्यामुळे अपरिमित हानी झाली हे जरी खरे असले तरीही त्यानंतरचे त्या परिसराचा अधिक वेगाने विकास झाला हेही ध्यानात घ्यायला हवे.
4) निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित अशी दुहेरी संकटे निर्माण होण्याचे योग्य कारण ओळखा.
1) मानवाचे प्रगती होऊन तंत्रज्ञानाचा विकास झाल्याने संकटे वाढली.
2) प्रगती करून घेण्यासाठी मानवाने निसर्गावस्थेत ढवळाढवळ केली.
3) लोकसंख्येतील प्रचंड वाढ आणि प्रगती करताना मानवाने निसर्गाच्या मार्गात अडथळे आणले.
4) मानवाच्या राहणीमानात सुधारणा झाल्याने संकटे वाढत गेली.
5) कोणत्या स्थितीत आपत्ती ही वरदान ठरून मानवाची प्रगती होते ?
1) विकासामुळे वारंवार उद्भवणार्या संकटाची कारणे समजू शकतात.
2) विकासामुळे मानव संकटाचा मुकाबला करू शकतो.
3) माहितीतंत्रज्ञानामुळे झालेल्या प्रगतीमुळे माणूस संकटातून लवकर बाहेर पडू शकतो.
4) आपत्ती नंतर विकासाला चालना मिळते.
उतारा (3)
एका घराचे दगड काढून दुसर्या घरास लावावयाचे असले तरी किती त्रास पडतो हे सर्वांस माहीत आहेच. पण हेच दगड चुन्यात पक्के बसविलेले असले, तर फारच त्रास पडतो आणि त्यातही पहिली इमारत बांधल्यापासून बरीच वर्षे लोटली असली व चुन्याचा आणि दगडांचा एकजीव होऊन गेला असला, तर एकेक दगड सोडविण्यास किती मारामार पडते, हे कोणास सांगावयास पाहिजे असे नाही, तात्पर्य कोणत्याही जड द्रव्यांचा संनिकट संयोग करून त्यापासून एक पिंड केला असता तो पिंड मोडून त्याच्या घटकांचा निराळा पिंड बनविणे हे अतिशय कष्टाचे काम आहे, हे प्रत्येकाने कबूल केले पाहिजे.
सामाजिक घडामोडींचाही असाच प्रकार आहे, प्रथम व्यक्तीच्या शरीररचनेचा विचार करा. आरंभी हे शरीर समजातीय द्रव्याचे झालेले असून, पुढे ते जसजसे वाढत जाते तसतसे त्यात विषमजातित्व उत्पन्न होते व ज्या मानाने त्यात विषमजातित्व उत्पन्न होते त्या मानाने त्यात अधिकाधिक दाढर्य उत्पन्न होऊन बाह्य संस्कारास ते अधिकाधिक प्रतिबंध करू लागते. कोवळे वेळू, लहान झाडांच्या फांद्या किंवा तरुण मुलांचे अवयव यात किती लवचीकपणा असतो बरे? वाढ खुंटून प्रत्येक अवयवात काठिण्य आल्यावर, कोणत्याही मनुष्यास चांगली कसरत शिकता येत नाही, ही प्रत्येकाच्या पाहण्यातली गोष्ट आहे. सामाजिक शरीरातही परिणतीमुळे अशाच तर्हेचे काठिण्य उद्भूत होते. कोणताही समाज एकदा वाढीस लागला आणि श्रमविभागामुळे त्यास भिन्नावयवित्व प्राप्त झाले व त्यात निरनिराळे वर्ग उत्पन्न होऊन ते निरनिराळ्या क्रिया करू लागले म्हणजे त्याचे रूपांतर करू पाहणार्या गोष्टीस त्याकडून मोठा प्रतिबंध होऊ लागतो. राज्य, धर्म, सैन्य, लोकाचार यासंबंधाने ज्या रिती एकदा रूढ होऊन जातात त्यात फिरून बदल करणे अत्यंत दुरापास्त होऊ लागते. पूर्वापार चालत आलेल्या चालीत विचारदृष्ट्या कितीही विसंगतता दिसली तरी त्या सोडणे किती जिवावर येते हे बाल-विवाह, केशवपन, सुतक इत्यादी प्ररूढ चालीचा विचार करता, तेव्हाच लक्षात येणार आहे. समाजातील शेकडा नव्याण्णव लोकांची स्थिती अंधपरंपरेप्रमाणे असते. मळलेल्या वाटेच्या बाहेर एक पाऊल टाकल्यानेसुद्धा आपणावर मोठा भयंकर प्रसंग गुदरेल असा धाक त्यास क्षणोक्षणी वाटत असतो.
6) उतार्याला योग्य शीर्षक द्या.
1) सामाजिक घडामोडी
2) राज्यधर्म लोकाचार
3) शरीररचनेचा विचार
4) बदलता समाज
7) कोणत्या संबंधाने रीती रूढ होतात?
1) चालीरीतींमुळे
2) सामाजिक संकेतामुळे
3) रितीभातीमुळे
4) राज्य, धर्म, सैन्य, लोकाचार
8) चांगली कसरत केव्हा करता येत नाही?
1) व्यायाम करताना
2) वाढ खुंटून प्रत्येक अवयवात काठिण्य आल्यावर
3) चांगला प्रतिसाद मिळाल्यावर
4) सामाजिक घडामोड झाल्यावर
9) सामाजिक शरीरांमध्ये काठिण्य कशामुळे उद्भवते?
1) परिणतीमुळे
2) सामाजिकतेमुळे
3) वादामुळे
4) घडामोडीमुळे
10) लवचीकपणा कोणात असतो?
1) सामाजिक घडामोडीत
2) शरीर रचनेत
3) बाह्यरचनेत
4) कोवळे वेळू, झाडांच्या फांद्या तरुण मुलांचे अवयव
उतारा (4)
गाडगे महाराज हे महान समाजसुधारक संत होऊन गेले. दारिद्य्र, अज्ञान, अंधश्रद्धा, देवधर्म, कर्मकांड, भोळेपणा, जातपात व व्यसने यात बुडून गेलेल्या समाजाला त्यांनी नवा मार्ग दाखवला. त्यासाठी त्यांनी केवळ भाषणबाजी केली नाही. त्यांच्या हातातील खराटा हेच त्यांचे साधन होते. गावातील गलिच्छ वस्त्या ते झाडून स्वच्छ करीत. पुढे जनमानसातील कचरा साफ करण्याचे अखंड व्रत आयुष्यभर चालवले. फुकटचे त्यांनी स्वतः कधी खाल्ले नाही व इतरांना खाऊ दिले नाही. श्रमांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. गरिबीचे मूळ अज्ञानात, व्यसनात, गलिच्छपणात व आळसात आहे हे त्यांनी लोकांना पटवले. लक्षावधी रुपये वर्गणीरूपाने जमवून त्यांनी धर्मशाळा, गोशाळा, पाठशाळा, पाणपोया बांधल्या व लोकहिताची कामे केली. यात्रा-मेळे यांना ते जात ते जनता जनार्दनांच्या सेवेसाठी. आंधळ्यांची, अपंगांची, रंजल्यागांजल्यांची सेवा हीच त्यांनी विठ्ठलाची भक्ती मानली. लक्षावधी रुपये जमवून त्यातील पैचाही विनियोग त्यांनी कधी स्वतःसाठी केला नाही. पै-पैचा हिशोब ते वहीत टिपून ठेवत. ती चोपडी सदैव त्यांच्या गळ्यात अडकवलेली असे. कुणीही येऊन त्यांचे हिशोब पाहू शकत असे. त्यांचा व्यवहार कसा खुल्लमखुल्ला होता. स्वतःच्या बायकोने आजारपणात गोशाळेतील गाईचे दूध घेतले, म्हणून तशाही अवस्थेत त्यांनी तिला सबंध गोशाळा साफ करण्याची शिक्षा दिली. सार्वजनिक जीवनात आर्थिक व्यवहार सांभाळणारा मनुष्य किती स्वच्छ असावा याचा गाडगेबाबा हे एक अत्युच्च आदर्शच होते.
11) उतार्यातील ’विनियोग’ या शब्दाचा अर्थ -
1) खर्च
2) बेहिशोबी
3) योगायोग
4) दुरुपयोग
12) गाडगे महाराजांनी गोशाळा साफ करण्याची शिक्षा कुणाला दिली?
1) कन्येला
2) पत्नीला
3) पुत्राला
4) स्वतःला
13) गाडगेबाबा यात्रेला का जात?
1) देवदर्शनासाठी इतर जातात म्हणून जात
2) मजा वाटावी म्हणून
3) लोकांच्या सेवेसाठी
4) केवळ भाषणे करण्यासाठी
14) गरिबीचे मूळ कशात आहे, असे गाडगेबाबा म्हणत?
1) श्रीमंतांच्या शोषणात
2) अज्ञात व आळसात
3) आर्थिक सुबत्तेत
4) राजकीय वृत्तीत
15) गाडगे महाराजांनी कोणती विठ्ठलभक्ती मानली?
1) समाजाला सुमार्गातून परावृत्त करणे
2) धर्मशाळा न बांधणे
3) रंजल्यागांजल्यांची सेवा करणे
4) गावाची स्वच्छता न करणे
उतारा (5)
आपण झाडे का पुजतो? अर्थात इतर वस्तूंची पूजा करण्यास जी कारणे असतील तीच झाडांची पूजा करण्यासही असली पाहिजे. जो मनुष्य स्वतः पराक्रमी आहे किंवा ज्याचा पराक्रमी पुरुषाशी कोणत्याही प्रकारचा संबंध आहे. अथवा ज्यापासून लोकांचे कोणत्याही प्रकारचे मोठे हित होत आहे, अशा प्रकारच्या मनुष्याला बहुधा लोकांत मान मिळतो. हाच मान वाढला म्हणजे त्याला पूजा म्हणतात व ही पूजा करण्याची बुद्धी आपल्या अंतःकरणांत उत्पन्न झाली म्हणजे आपण तिला पूज्यबुद्धी म्हणतो. वड, पिंपळ, उंबर, आपटा, शमी, तुळस, बेल वगैरे झाडांविषयी आमच्या मनांत जी पूज्यबुद्धी उत्पन्न झाली आहे ती वर थोडक्यात सांगितलेल्या कारणांपैकी कोणत्या तरी कारणांनी उद्भवली असावी यात संशय नाही. जिरेनिअमप्रमाणे तुळशीत हवा स्वच्छ करण्याचा गुण फार आहे, म्हणून आम्ही सारे तिचे भक्त बनलो आहोत किंवा, सर टी. माधव रावांनी एकदा सुचविल्याप्रमाणे बेल, तुळस आणि गवती चहा यांचा चहा ऊर्फ गोडा काढा रोज सकाळी घेतल्यास वातपित्त कफाची विशेष बाधा न होता प्रकृती साफ राहण्यासारखे गुण तीत आहेत, म्हणून आम्ही तिला देवांच्या पूजेतील एक अत्यावश्यक द्रव्य केले आणि सर्व ऋतूत बायकांना तिच्या भोवती प्रदक्षिणा घालण्यास लाविले, हे निश्चयाने सांगता येत नाही, तथापि एवढे खरे आहे की, या झाडांच्या अंगच्या कसल्या तरी चांगल्या गुणांबद्दल त्याला आमच्या घरात व देवळात इतके महत्त्वाचे स्थान मिळाले असावे! वड, पिंपळ, उंबर वगैरे मोठ्या गर्द छायेची झाडे आहेत आणि त्यापासून पांथांस व इतरांस मोठे सुख होते म्हणून त्यास देवत्व प्राप्त झाले असावे असे प्रथमदर्शनी वाटण्याचा संभव आहे. पण वास्तविक कारण तसे दिसत नाही, तसे असेल तर आंबा, बकुळ, फणस वगैरे दाट छायेची झाडे पूज्य का झाली नाहीत? आंबा व फणस छायेला चांगले असून खायलाही काही वाईट नाहीत! तेव्हा फायद्याच्या दृष्टीने ही झाडे विशेष पूज्य व्हायल्या पाहिजे होती.
16) तुळशीत हवा स्वच्छ करण्याचा गुण कशाप्रमाणे आहे?
1) झाडांप्रमाणे
2) फुलांप्रमाणे
3) जिरेनिअमप्रमाणे
4) फळांप्रमाणे
17) वातपित्त कफाची विशेष बाधा कशामुळे होत नाही?
1) बेल, तुळस आणि गवती चहा यांच्या काढ्यांमुळे
2) औषध उपचार घेतल्यामुळे
3) सर्दी झाल्यामुळे
4) ताप आल्यामुळे
18) झाडांच्या कोणत्या गुणामुळे त्यांना देवळात स्थान मिळाले?
1) बर्या गुणांमुळे
2) चांगल्या गुणांमुळे
3) वाईट गुणांमुळे
4) सद्गुणामुळे
19) पूजा कशाला म्हणतात?
1) फुले, बेल वाहतो त्याला
2) श्रद्धापूर्वक केलेले काम
3) लोकांत मान वाढला म्हणजे त्याला
4) नारळ वाढवून अगरबत्ती लावतो त्याला
20) लोकात मान कोणाला मिळतो?
1) लोकांशी प्रेमळ वागणार्याला
2) लोकांशी रागाने वागणार्याला
3) सर्वांत श्रीमंत असणार्याला
4) लोकांचे कोणत्याही प्रकारचे मोठे हित होत असेल, तर
उतारा (6)
प्रतिभा दैवी वगैरे नसते, ती छान मानवीच असते. फक्त माणसे अपूर्व सुखाची फुलवण करणार्या त्या यातना घराकडे पाठ फिरवतात. दुःखांना घाबरतात, त्यामुळे अथांग सुखांना मुकतात. स्वतःचे काळीज ज्वाळेवर धरून पाहण्याची कल्पना करा. पण प्रथम काळजाला जखमा होतात. नंतर कधीही न कोमेजणारी या जखमांचीच फुले होतात. प्रतिभा प्रत्येकच व्यक्तीजवळ असते. तिला पैलू पाडता येतात. आपल्या वाट्याला आलेल्या काळाच्या पहाडात सुंदर लेणी खोदता येतात. फक्त वाईटाने आपले मन बेसुमार दुखले पाहिजे. चांगल्याची त्याला अनावर तहान लागली पाहिजे.
प्रतिभा या शब्दात दोन घटक आहेत. एक घटक आहे ’प्रति’ हा आणि दुसरा आहे ’भा’ हा. ’प्रति म्हणजे दुसरा आणि ’भा’ म्हणजे प्रकाश. दुसरा म्हणजे आहे त्याहून वेगळा. हा वेगळा प्रकाश निर्माण करणारी मनःशक्ती म्हणजे प्रतिभा. अनेक मनांमध्ये अंधारच आहे. अनेक जंगलांमध्ये अंधारच आहे. अनेक झोपड्यांमध्ये आणि घरांमध्ये अंधारच आहे. अनेक मुठींमध्ये अंधारच आहे. या सर्व अंधारापर्यंत पोचणे सूर्याला शक्य होत नाही. ही सूर्याची फार मोठी उणीव होय. मानवी प्रतिभेला ही मर्यादा नाही. सूर्याचा प्रकाश जर जीवनातील हा अनंत अंधार नष्ट करू शकत नसेल, तर तो अंधार नष्ट करण्यासाठी दुसरा आणि नवा उजेड निर्माण करण्याची गरज निर्माण होते. मानवी प्रतिभा हे कार्य करते.
21) प्रतिभा म्हणजे काय?
1) घरातील अंधार
2) वेगळा प्रकाश निर्माण करणारी मनःशक्ती
3) मानवी मनातील अंधार
4) मानवी जीवनातील अंधार
22) चांगल्याची अनावर तहान कोणाला लागली पाहिजे?
1) असुराला
2) देवाला
3) मानवी मनाला
4) अंधाराला
23) जीवनातील अंधार कोण नष्ट करू शकते?
1) काजवा
2) सूर्याचा अस्त
3) मानवी प्रतिभा
4) चंद्र
24) या उतार्याला योग्य ते शीर्षक द्या.
1) अंधार
2) काळोख
3) काजवा
4) मानवी प्रतिभा
25) प्रतिभा कशी असते?
1) असुरवृत्तीची
2) अमानवी
3) मानवी
4) दैवी
उतारा (7)
’व्याकरण म्हणजे काय?’ हे आपल्याला इंग्रजी भाषेने/ भाषिकांनी शिकविले. सुरुवातीला त्यामागचा ’दृष्टिकोन’ वेगळा होता, पण ’भाषेच्या सांगाड्याकडे पाहण्याचा, समजून घेण्याच्या’ दृष्टिकोनामुळे मराठी भाषेचे व्याकरण मांडले गेले, रचत गेले. भाषेच्या ’व्याकरणरूपी सांगाड्या’ च्या आकलनाला काहीजण ’व्याकलन’ म्हणतात. काळ बदलतोय, नव्हे तो बदलत असतो. बदलत्या परिस्थितीनुसार विचार करण्याची पद्धत बदलत जाते व त्यामुळे त्यानुसार आपली भाषाही बदलत जात आहे. भाषा बदलण्यामध्ये विविध प्रकार आहेत. त्यातील ढोबळमानाने तीन प्रकार खालील प्रमाणे - 1) नवीन शब्दांचा वापर, 2) नवीन उच्चार, 3) नवीन वाक्यरचना. यातील पहिले दोन प्रकार आपण सवयीने, प्रयत्नाने एखादा विद्यार्थी वा भाषिक आत्मसात करू शकतो. पण शेवटचा प्रकार आत्मसात करण्यासाठी योग्य शिक्षणाचीच गरज असते. आयुष्यातील प्रसंग वा परिस्थिती जेव्हा किचकट व गुंतागुंतीची होत जाते, तेव्हा वाक्यरचना ’नेमकं ते सांगणारी’, ’हवं ते / नको ते झाकणारी’, ’पाहिजे त्या गोष्टीकडे सहजपणे अंगुलिनिर्देश करणारी’ अशी असावी लागते व हे सुद्धा कमीत कमी शब्दांत, मोजक्याच वाक्यांत जमवावे लागते.
किचकट व गुंतागुंत असूनही विचारांचा डोलारा तोलून धरण्यासाठी, भाषेचा व्याकरणरूपी ’सांगाडा’ प्रमाणबद्ध असावयास हवा. बदलत्या काळानुसार हा सांगाडा ही बदलतो. ज्यांना वाक्यरचनेतील व्याकरणरूपी ’सांगाडा’ व्यवस्थित उमजतो, ती मंडळी आयुष्यातील अनेक प्रसंगात भाषेच्या सफाईदार वापराने इतरांच्या पुढे जातात, इतरांवर कुरघोडी करू शकतात तसेच अडचणीच्या वेळी वेळ मारून स्वतःची सुटका करून घेऊ शकतात. इंग्रजी भाषेतील व्याकलनामध्ये हे चापल्य आहे, म्हणूनच इंग्रजी शाळांचं प्रमाण वाढतंय. परिणामी मराठी भाषेचा सफाईदार वापर होण्यासाठी ’व्याकलनात’ सुधारणा हवी व त्यासाठी ’व्याकरणाची मांडणी’ व्यवस्थित हवी. सध्यातरी आपण व्याकरणाच्या पुस्तकातील अक्षरांनाच ’व्याकरण’ म्हणतो, ते ’व्याकरण’ नसून ती ’व्याकरणाची मांडणी’ आहे. मुळात ’भाषेचे व्याकरण’ हे विचार करण्याच्या पद्धतीमध्ये दडलेले असते. ते अदृश्य असते. इंग्रजी भाषेत फक्त कृतीला महत्त्व दिले जाते. भाव व्यक्त करणार्या व्याकरणाच्या मांडणीकडे लक्ष दिले जात नाही. व्यवहारातील मराठी भाषा बदलत आहे, पण शालेय पुस्तकातील ’व्याकरणाच्या मांडणीत’ काळानुसार बदल झालेला नाही. त्यात ’फापटपसारा’ ही बराच आहे. या अनावश्यक पसार्याने विद्यार्थ्यांमध्ये भाषेविषयीची अनास्था वाढीस लागते.
26) ज्या व्यक्तींना वाक्य रचनेतील व्याकरण रूपी सांगाडा व्यवस्थित उमजतो त्या व्यक्ती .........
1) आयुष्यातील अनेक प्रसंगात भाषेचा सफाईदार वापर करू शकतात.
2) इतरांवर कुरघोडी करू शकतात.
3) अडचणीच्या वेळी स्वतःची सुटका करून घेऊ शकतात.
4) वरील सर्व
27) व्याकलन या संज्ञेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
1) व्याकलन = व्याकरण + आकलन
2) मराठी भाषेच्या व्याकरण रूपी सांगाड्याचे आकलन म्हणजे व्याकरण.
3) मराठी भाषेचा सफाईदार वापर होण्यासाठी व्याकलनात सुधारणा व्हावी.
4) मराठी भाषेच्या व्याकरणात व्याकलनाचा समावेश करणे अनिवार्य आहे.
28) भाषा बदलण्याचे कोणते दोन प्रकार आत्मसात करण्यासाठी योग्य शिक्षणाची गरज असते ?
1) नवीन उच्चार व नवीन वाक्यरचना
2) नवीन शब्दांचा वापर व नवीन उच्चार
3) नवीन शब्दांचा वापर व नवीन वाक्यरचना
4) नवीन उच्चार, नवीन शब्दांचा वापर व नवीन वाक्यरचना
उतारा (8)
खालील कविता वाचून त्यावर आधारीत प्रश्नांची उत्तरे द्या.
येतो भरून ऊर होतात सूर वेडे
हे मायमातृभूमी गातो तुझे पवाडे
तीर्थस्वरूप पाणी कनक स्वरूप माती
पाना-फुला-फळांना ऋतुरंग मागताती
पवनास कस्तुरीचे देशात श्वास झाडे
जे मागतात शक्ती आभाळ पेलण्याची
देतेस त्यास आई उंची हिमालयाची
इतिहास येई हाती त्यांचे बुलंद झेंडे
सामर्थ्य मानवांचे जागे करावयाला
आई, तुझ्या दुधाचे बळ लागते पणाला
देतेस तूच शक्ती होण्यास ध्येयवेडे
वाटे अनेक जन्मी व्हावे तुझेच बाळ
माछा दिवा जळावा सेवेत सर्वकाळ
मनचौघडे झडावे होऊन मातृत्ववेडे
29) ‘ऊर भरून येतो’ म्हणजे नेमके काय होते ?
1) सूर वेडे होतात
2) ताकद येते
3) सूर भरकटतात
4) पाणी सुचतात
30) शक्ती कशासाठी मागतात ?
1) बुलंद झेंडे घेण्यासाठी
2) लढण्यासाठी
3) आभाळ पेलण्यासाठी
4) हिमालयाची उंची गाठण्यासाठी
उत्तरे
1-3
2-4
3-4
4-3
5-3
6-1
7-4
8-2
9-1
10-4
11-1
12-2
13-3
14-2
15-3
16-3
17-1
18-2
19-3
20-4
21-2
22-3
23-3
24-4
25-3
26-4
27-4
28-3
29-2
30-3